शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (19:03 IST)

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्वीटची चौकशी ठाकरे सरकार करू शकतं?

दीपाली जगताप
बीबीसी मराठी
आंतराराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट केल्यानंतर भारतीय खेळाडू, कलाकार आणि संगीतकारांनी हा देशांतर्गत विषय असल्याबाबत आपले मत मांडले. पण असे सर्व ट्वीट्स दबावाअंतर्गत केले आहेत का? याची चौकशी महाराष्ट्र सरकार करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
 
एकाच दिवशी साधारण एकाच मताचे आणि एकसमान सलग ट्वीट्स केल्याने सेलिब्रिटींवर दबाव असल्याचे दिसून येते असा आरोप काँग्रेसने केला आहे.
 
काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. सेलिब्रिटींना अशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने प्रवृत्त केले का? यामागे राजकीय दबाव होता का? असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत.
या मागणीनंतर याप्रकरणाची चौकशी राज्याचा गुप्तहेर विभाग करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
 
सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरील आपल्या अधिकृत अकाऊंट्सवरून आपले मत व्यक्त केले आहे. तेव्हा अशा ट्वीट्सची चौकशी होऊ शकते का? आक्षेपार्ह भाषा न वापरता नागरिकांनी ट्वीट किंवा एखादी पोस्ट केल्यास कायदेशीरदृष्ट्या त्याचा तपास करता येतो का? याबाबत गुन्हा दाखल होऊ शकतो का? यासंदर्भात सायबर क्राईमचे नियम नेमकं काय सांगतात? याचा आढावा आपण या लेखामध्ये घेणार आहोत.

सेलिब्रिटींचे ट्वीट्स एकसमान असल्याचा काँग्रेसचा दावा
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपच्या दबावाखाली सेलिब्रिटींनी ट्विट्स केले असल्याचा दावा केला आहे.
 
ते म्हणतात, "सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मत व्यक्त करणे हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. यात काहीच गैर नाही. पण अनेक सेलिब्रिटींच्या ट्विट्सची भाषा एकसमान आहे. त्यांनी वापरलेले शब्दही एकसारखे आहेत. त्यामुळे त्यांना एकसारखे ट्वीट करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही."
 
"अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांच्या ट्विटमधील प्रत्येक शब्द समान आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून हे ट्वीट करवून घेतल्याची शंका येण्यास वाव आहे. तसंच अभिनेता सुनील शेट्टी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये भाजपचे उपाध्यक्ष हितेश जैन यांचा उल्लेख आहे. बहुतांश सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये 'अमिकेबल' या शब्दाचा उल्लेख आहे. ही सर्व परिस्थिती पाहता यात भाजपचा काही संबंध आहे का? याची चौकशी होणं गरजेचे आहे," अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.
 
याशिवाय, भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनीही शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्वीट करून आपले मत व्यक्त केले आहे.
 
काँग्रेसच नव्हे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सेलिब्रिटींच्या ट्वीट मालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने आपली बाजू सावरण्यासाठी भारतरत्नांची प्रतिष्ठा पणाला लावू नये अशी टीका राज ठाकरेंनी केली.
 
सोशल मीडियावरील पोस्ट किंवा ट्वीटविरोधात गुन्हा शक्य?
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुप्तचर यंत्रणेमार्फत सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीट्सची चौकशी करू असे सांगितले आहे. पण प्रत्यक्षात सेलिब्रिटींच्या ट्वीट्समध्ये कोणतीही आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत ट्वीट दबावामुळे केले आहे का? याची चौकशी करता येऊ शकते का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
 
मुंबई सायबर सेलच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "ट्वीटमध्ये जर आक्षेपार्ह भाषा नसेल, धमकी देणारा संदेश नसेल तर संबंधित ट्विट प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही. एखाद्या ट्वीटबाबत कोणी आक्षेप घेतल्यास आणि चौकशीची मागणी केल्यास त्यासंबंधी चौकशी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. पण प्रत्यक्षात गुन्ह्याची नोंद होऊ शकत नाही."
 
ते पुढे सांगतात, "ट्वीट दबावाखाली केले असले तरी ट्वीट करणाऱ्यांवर त्यासाठी गुन्हा दाखल करता येत नाही," असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
सोशल मीडियावर दररोज अनेक हॅशटॅग प्रसिद्ध होत असतात. या हॅशटॅगला धरून अनेक लोक ट्वीट करत असतात किंवा फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपले मत मांडत असतात.
 
सायबर एक्सपर्ट अनय जोगळेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "सेलिब्रिटींनी केलेले ट्वीट्स हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. कोणीही ट्वीट करण्यास सांगितले असले तरी ट्वीट करण्याचा निर्णय त्यांचा असल्याने याबाबत आक्षेप असू शकत नाही. सत्ता हातात असल्याने चौकशीचा निर्णय होऊ शकतो पण गुन्ह्याची नोंद करता येणार नाही."
 
"ट्विटर ही अमेरिकन संस्था आहे. पण ट्वीट भारतीय नियमांनुसार बेकायदेशीर असल्यास त्याची चौकशी आणि कारवाई होऊ शकते," असेही त्यांनी स्पष्ट केले.
सायबरतज्ज्ञ प्रशांत माळी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरून ट्वीट केले असल्यास त्याबाबत गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. पण ट्वीट काय केले जाते यावर सर्वकाही अवलंबून असते. ट्विटमध्ये मानहानी करणारी भाषा, शांतात भंग करणारा संदेश, समाजिक आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर, नग्नता, महिला आणि लहान मुलांची बद्नामी करणारा मजकूर यापैकी कोणतीही बाब आढळल्यास असल्यास त्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो."
 
"सोशल मीडियावर तुम्ही एखाद्याचा सेंसिटिव्ह पर्सनल डेटा सार्वजनिक केल्यासही तुम्ही अडचणीत येऊ शकता. उदा. एखाद्याचे बँक डिटेल्स, अकाऊंट नंबर तुम्ही सार्वजनिक केल्यास, त्याची तक्रार झाली तर तुमच्याविरोधात कारवाई होऊ शकते."
 
या सर्व प्रकरणात ट्विटरची बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही ट्विटरलाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अद्याप त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. ट्विटरची प्रतिक्रिया आल्यास बातमीत अपडेट केली जाईल.
 
सिंक्रोनाईज ट्वीट म्हणजेच शेकडो ट्वीट एकसमान असल्यास त्याचा अर्थ काय?
 
सोशल मीडियावर एखादा हॅशटॅग ट्रेंड होत असताना शेकडो, हजारो ट्वीट एकसमान दिसू शकतात. निवडणुकीदरम्यान किंवा एखादा सिनेमा, गाणं लाँच होत असतानाही हॅशटॅग ट्रेंड होत असतात. अशावेळी अनेक ट्विट्स, त्यात वापरलेली भाषा, शब्द, अर्थ सर्वकाही समान असते. हे ट्वीट्स एकमेकांनी कॉपी पेस्ट केले आहेत अशीही शंका येते.
एकसारख्या दिसणाऱ्या अशा ट्वीट्ससाठी सिंक्रोनाईज किंवा डॉट्स प्रणालीचा वापर केला जातो असं सायबर एक्सपर्ट सांगतात.
 
"सिंक्रोनाईज ट्वीट म्हणजेच एकाच वेळी हजारो लोकांनी एकसमान ट्वीट करणे. ही प्रणाली भारतात आता नवीन नाही. तंत्रज्ञानाच्यादृष्टीने हे सहज शक्य आहे. आपला अजेंडा किंवा मत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तसंच जनमत तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर जगभरात केला जातो. अशा ट्वीट्समध्ये आक्षेपार्ह भाषा नसल्यास केवळ एकसमान ट्वीट केले म्हणून कारवाई करता येत नाही," असे अनय जोगळेकर यांनी सांगितले.
 
सिंक्रोनाईज किंवा डॉट्स प्रणाली वापरून एकसमान ट्वीट किंवा पोस्ट केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो का?
 
याबाबत बोलताना सायबरतज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, "तंत्रज्ञान वापरून शेकडो ट्विट करणे हा गुन्हा नाही. पण असे सर्व ट्विट कायद्याच्या चौकटीत राहूनच करता येतील. आक्षेपार्ह ट्वीट कॉपी-पेस्ट केल्यास मूळ ट्विट करणारा आणि कॉपी करणारा अशा सगळ्यांवर कारवाई करण्याची तरतूद सायबर कायद्यात आहे."
 
सेलिब्रिटींच्या ट्वीट्सची चौकशी हा राजकीय निर्णय?
 
"दबावाखाली येऊन ट्वीट केले असले तरी दबाव टाकणाऱ्यावर कारवाई होऊ शकते. पण ज्यांनी ट्वीट केले आहे त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही." असं प्रशांत माळी सांगतात.
"भारतरत्नांनी केलेल्या ट्वीट्सची चौकशी करत असताना महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्र धर्म कुठे गेला?" असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
 
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचाही आरोप केला आहे.
 
"भारतरत्नांची चौकशी करण्याचा आदेश देणं म्हणजे पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. ज्यांचे आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेले त्या काँग्रेसला सगळेच दबावाखाली आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ही बालिश मागणी गृहमंत्र्यांनी पूर्ण करणे हे दुर्देव आहे," अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली.
 
दुसऱ्या बाजूला काँग्रेसने सेलिब्रिटींची चौकशी करा अशी मागणी केली नसल्याचा खुलासा केला आहे.
 
"आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली आहे. सेलिब्रिटींच्या नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपापासून सुरक्षा मिळावी ही आमची मागणी आहे. देशपातळीवर भाजपकडून लोकशाही मानकं पायदळी तुडवली जात आहेत," असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
सेलिब्रिटींचे ट्विट्स आणि काँग्रेसचा आरोप या सर्व प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे चौकशीचा निर्णय हा राजकारणाचा भाग आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, "हा राजकीय निर्णय आहे याबाबत काहीच शंका नाही. आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी मत व्यक्त करतात तेव्हा भाजपकडून विरोध होतो. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली की काँग्रेसकडून विरोध केला जातो. तेव्हा यात राजकारण निश्चितपणे आहे."
 
"भाजप ज्यापद्धतीने व्यवस्थेचा वापर करू शकते त्याप्रकारे आम्हीही करू शकतो हेच दाखवण्याचा महाविकास आघाडी सरकारचा हा प्रयत्न असल्याचे दिसून येते," असं अभय देशपांडे सांगतात.
 
कोणत्या प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टविरोधात कारवाई होऊ शकते?
दबावाखाली ट्विट केल्यास कारवाई होऊ शकते का? कोणाच्या सांगण्यावरून आपण ट्विट किंवा सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्यास हा गुन्हा ठरतो का? असे प्रश्न यानिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहेत.
याविषयी बोलताना सायबरतज्ज्ञ काही महत्त्वाच्या सूचना देतात.
 
सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट सार्वजनिक करत असताना नागरिकांनी काही मूलभूत गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
 
सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना भारतीय दंड संविधानाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
 
ट्विट किंवा पोस्टमध्ये वापरली जाणारी भाषा महत्त्वाची आहे. आपल्या ट्विटमधून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावणार नाहीत याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.
 
ट्विट मानहानीकारक असल्यास, महिला आणि लहान मुलांची बद्नामी करणारे असल्यास, नग्नता आणि सेंसिटिव्ह पर्सनल डेटा उलगडणारे ट्विट असल्यास निश्चितपणे याची तक्रार करता येते. यासंदर्भात गुन्हाही दाखल होऊ शकतो.
 
काही बाबतीत पोलीस सुओमोटो दाखल करू शकतात.
 
कायद्याच्या चौकटीत राहून सोशल मीडियावर पोस्ट करणे गरजेचे आहे.
 
एखादा मजकूर इतर कोणाचा कॉपी करून पोस्ट केला असला तरी तो नियमांमध्ये बसणारा हवा. तसे नसल्यास मूळ मजकूर पोस्ट करणारा आणि कॉपी करणारा अशा सर्वांवर कारवाई होऊ शकते असं सायबरतज्ज्ञ सांगतात.