1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (18:38 IST)

बर्ड फ्लू : नवापूरमध्ये वारंवार लाखो कोंबड्या ठार का कराव्या लागतात?

अनघा पाठक
बीबीसी मराठी
 
नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूरमध्ये बर्ड-फ्लूची लक्षणं असलेल्या सुमारे अडीच लाख कोंबड्यांचं कलींग करण्याचं नियोजन झालं आहे.
 
जसजसे पोल्ट्री फार्मचे अहवाल येतील तशी ही संख्या वाढूही शकते, अशी माहिती नंदुरबारचे कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडे यांनी दिली आहे.
 
येत्या काही दिवसाचा बर्ड फ्लूचं संकट टाळण्यासाठी येत्या काही दिवसात दहा लाख कोंबड्यांना ठार करावं लागू शकतं.
बर्ड फ्लूची साथ आल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांना मारण्याचं काम सरकारने हाती घेतलं आहे.
 
सुरूवातीला आठ पोल्ट्री फार्ममधल्या सुमारे पाच हजार संसर्गित कोंबड्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
 
याआधीही 2006 मध्ये देशात बर्ड फ्लूची मोठी साथ आली असताना नवापूरमध्ये जवळपास 10 लाख कोंबड्यांचा मृत्यू झाला होता, यापैकी अडीच लाखाहून जास्त कोंबड्यांचं कलिंग करण्यात आलं होतं.

पण नवापूरमध्ये वारंवार कोंबड्यांना ठार का करावं लागतं?
याबद्दल बोलताना नंदुरबारचे कलेक्टर डॉ. राजेंद्र भारूडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, नवापूरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पोल्ट्री व्यवसाय पसरलेला आहे. जवळपास एका किलोमीटरच्या परिघात लाखो कोंबड्या असतात.
 
निलेश पवार नंदुरबारमध्ये अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. ते म्हणतात, "नंदुरबार जिल्ह्यात 68 कुक्कुटपालन केंद्र आहेत, त्यापैकी 27 नवापूरमध्ये आहेत. त्यातल्या दहा केंद्रांमध्ये प्रत्येकी दीड लाख कोंबड्या आहेत. म्हणजे मुळात इथल्या केंद्रामधली कोंबड्यांची संख्या प्रचंड आहे."
 
नवापूरमधला व्यवसाय हा अंडी सप्लाय करण्याचा आहे. म्हणजे इथे कोंबड्या मुख्यत्वे अंड्यांसाठी पाळल्या जातात. निलेश पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दिवसाकाठी नवापूरमधून सात लाख अंडी बाहेर पाठवली जातात.
 
"ही अंडी गुजरात, सुरत आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला पुरवली जातात. 2006 नंतर इथे मोठ्या प्रमाणावर बर्ड फ्लूचा संसर्ग झाला नाही, पण गेल्या दोन आठवड्यात इथे बर्ड फ्लूमुळे 34 हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आणि कोंबड्यांच कलिंग करण्याचं ठरवलं."
 
बर्ड फ्लू म्हणजे काय आणि तो कोणाला होतो?
बर्ड फ्लू हा पक्ष्यांना होणारा संसर्गजन्य आजार आहे. H5N1, H5N8 सह बर्ड फ्लूच्या व्हायरसच्या आठ प्रजाती आहेत. स्थलांतरित पक्ष्यांमुळे या आजाराचा संसर्ग होतो. याला एव्हियन एनफ्लूएन्झा म्हणतात.
 
पक्ष्यांमध्ये आढळणारा हा बर्ड फ्लू माणसांना होऊ शकतो का? याबद्दल राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "एनफ्लूएन्झा विषाणूचं नैसर्गिक घर म्हणजे पाणपक्षी. बदक आणि त्यासारख्या पाणपक्ष्यांच्या शरीरात हा विषाणू राहतो.
 
या पाणपक्ष्यामध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव मुख्यत्वे आतड्याला होतो. बदक आणि इतर पाणपक्षी हे या विषाणूचे मूळ यजमान आहेत. नंतर या मूळ यजमानाकडून हा विषाणू मध्यस्थ यजमानाकडे म्हणजे कोंबड्या किंवा डुक्कर यांच्याकडे प्रवास होतो."
 
महाराष्ट्रात आतापर्यंत कोंबड्या, बगळे, आणि कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचं समोर आलं आहे.
 
नवापूरच्या बाबतीत बोलायचं झालं तर हे गाव महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर वसलेलं आहे. "बगळे आणि कावळ्यांची इथे सतत ये-जा असते. या भागात पाणथळीवर सापडणारे स्थलांतरित पक्षीही आढळून येतात. त्यामुळे बर्ड फ्लू व्हायरस इथे आरामात पोहचू शकतो. आपण जमिनीवर या आजारावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो, पण आकाशात उडणाऱ्या पक्षांवर कसं नियंत्रण ठेवणार," राजेंद्र भारूडे पुढे सांगतात.
 
स्थलांतरित पक्ष्यांचा वावर आणि मोठ्या प्रमाणात असलेली कोंबड्यांची संख्या यामुळे नवापुरात बर्ड फ्लू झपाट्याने पसरतो आणि त्याचा मानवाला असलेला धोका टाळण्यासाठी इथे कोंबड्यांना मारून टाकावं लागतं.
 
बर्ड फ्लूचा माणसाला धोका किती?
इंडियन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "बर्ड फ्लूच्या आठ प्रजाती आहेत. H5N8 या प्रजातीच्या बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांमध्ये होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. H5N1 ही सुद्धा बर्ड फ्लूची एक प्रजाती आहे. याचा माणसांना तुलनेने अधिक धोका संभवतो."
 
यापूर्वी कधी बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांमार्फत माणसांमध्ये झाल्याचं आढळलं आहे का?
 
यासंदर्भात बोलताना मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,
 
"बर्ड फ्लूची लागण माणसांना होण्याची शक्यता कमी आहे. 2006 मध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला होता. त्यानंतर अनेकदा भारतात बर्ड फ्लूची साथ आली. पण माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव आढळून आलेला नाही. जगात 40-45 लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला. यात 39 लोक एकट्या इजिप्तमधले होते."
 
ते पुढे सांगतात, "बर्ड फ्लूमध्ये जनुकीय बदल झाल्यास नवा विषाणू तयार होतो. यातून तयार झालेल्या विषाणूचे गुणधर्म सांगणं सध्या कठीण आहे."
 
काय खबरदारी घ्याल?
भारतात आतापर्यंत बर्ड फ्लू माणसांमध्ये आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असं आवाहन राज्य सरकारसह वैद्यकीय तज्ज्ञांनीही केलं आहे. पण त्यासोबतच काळजी घेण्यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत. त्या अशा -
 
• पक्ष्यांच्या स्त्रावासोबत तसंच विष्ठेसोबत संपर्क टाळा.
 
• पक्षी, कोंबड्या यांचे पिंजरे आणि ज्या भांड्यात त्यांना रोज खाणे दिले जाते अशी भांडी रोज डिटर्जंट पावडरने स्वच्छ धुवा.
 
• शिल्लक राहिलेल्या मांसाची योग्य विल्हेवाट लावा.
 
• एखादा पक्षी मरण पावला तर अशा पक्षाला उघड्या हाताने स्पर्श करू नका. जिल्हा तसंच विभागीय नियंत्रण कक्षाला ताबडतोब कळवा.
 
• कच्च्या पोल्ट्री उत्पादनांसोबत काम करताना पाणी आणि साबणाने आपले हात वारंवार धुवा. व्यक्तिगत स्वच्छता राखा. परिसर स्वच्छ ठेवा.
 
• कच्चे चिकन किंवा चिकन उत्पादनासोबत काम करताना मास्क आणि ग्लोजचा वापर करा.
 
• पूर्ण शिजवलेले मांसच खा.
 
• कच्च चिकन किंवा कच्ची अंडी खाऊ नका.
 
• अर्धवट शिजलेले मांस/चिकन किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.
 
• आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.
 
• पूर्णपणे शिजलेलं मांस आणि कच्च मांस एकत्र ठेवू नका
 
• आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणं वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळविणं आवश्यक आहे.