मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (10:44 IST)

रमेश देव यांचे ते गुपित

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. ते 93 वर्षांचे होते.
 
30 जानेवारी रोजी रमेश देव यांनी 93वा वाढदिवस साजरा केला होता. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या.
 
रमेश देव यांनी 1956 साली प्रदर्शित झालेल्या 'आंधळा मागतो एक डोळा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती. त्यांनी 180 हून अधिक मराठी चित्रपटांतून भूमिका साकारल्या.
 
सुवासिनी, माझा होशील का, पडछाया, अपराध, या सुखांनो या, झेप यांसारखे त्यांचे चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले होते.
 
राजश्री प्रॉडक्शनच्या आरती चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. आनंद, खिलौना, कोशिश, जमीर, तीन बहुरानीयाँ या आणि अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.
 
त्यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केलं होतं.
 
रमेश देव यांचे ते गुपित
"फुलं आणि सुंदर मुली हे माझे वीक पॉइंट होते," असं म्हणत अभिनेते रमेश देव यांनी आपलं खास गुपित 'पुढारी'ला 93 व्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.
 
कॉलेजमध्ये अनेक मुली तुमच्यावर फिदा असतील असं विचारल्यावर रमेश देव यांनी त्यांच्या कॉलेजच्या काही आठवणींनाही उजाळा दिला.
 
"त्यावेळी आतासारखं वातावरण नव्हतं, लेडीज रुम वेगळी असायची आणि जेन्ट्स वेगळी. आम्ही पोर्चमध्ये वगैरे उभं राहायचो. त्यामुळे मुली थोड्या लांबच असायच्या," असं देव यांनी सांगितलं.
 
हिंदीत स्थिरावलेला मराठी नट
"मराठी चित्रपटसृष्टीतील जे नट हिंदीमध्ये स्थिरावले, त्यामध्ये रमेश देव यांचा समावेश होतो. 1960च्या दशकातील 'आरती' सारख्या चित्रपटापासून ते आनंद, शिकार, मस्ताना, खिलौना अशा अनेक यशस्वी चित्रपटांत देव दिसले. नाटक, चित्रपट, टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांत ते लीलया वावरले, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई देतात.
 
ते पुढे सांगतात, "जाहिरातपट, दूरचित्रवाणीपट, लघुपट आणि फिचर फिल्म यांची निर्मिती आणि दिग्दर्शनदेखील त्यांनी केले. त्यांचा अभिनय कृत्रिम होता, परंतु हृषीदांसारखा चांगला दिग्दर्शक असेल, तर त्यांच्या अभिनयातला कृत्रिमपणा जाऊन सहजता यायची."
 
"मुख्यत: रमेश देव यांनी कधी 'गेले ते दिन गेले' असे सूर छेडले नाहीत. नवीन नवीन कलावंतांमध्ये ते रमायचे. कोल्हापूर, पुण्याचे अनेक नट मराठीतच अडकून पडले, तसे रमेश देव यांनी केले नाही. ते हिंदी चित्रपटसृष्टीच्या मोठ्या जगात गेले आणि यशस्वी झाले. 1950 च्या दशकातील रमेश देव यांचे चित्रपट हे खूप साधे आणि चांगले होते. त्यातला त्यांचा अभिनयही वास्तववादी होता," असंही ते सांगतात.