बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

'डॉ. पायल तडवीची मी आई आहे, खूप अभिमानानं सांगते, पण आता काय सांगणार मी?'

- प्रवीण ठाकरे आणि जान्हवी मुळे
 
आबेदा तडवी यांना बोलता बोलताच अश्रू अनावर झाले. गेल्याच आठवड्यात 22 मे रोजी त्यांच्या मुलीनं, डॉ. पायल तडवीनं आत्महत्या केल्यापासून त्या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत.
 
अवघ्या 26 वर्षांची त्यांची लेक मुंबईच्या नायर हॉस्पिटलशी संलग्न टोपीवाला वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. तिला स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून आदिवासी भागात जाऊन काम 
 
करायचं होतं.
 
"ती माझा आधारस्तंभ होती. माझाच नाही, माझ्या सगळ्या समाजाचा. कारण आमच्या समाजात ती पहिली महिला एमडी डॉक्टर होणार होती. आमच्या समाजात अजूनही कोणी एमडी महिला 
 
नाही," आबेदा सांगतात.
 
पायल ती कसर भरून काढेल असा विश्वास त्यांना होता. पण ते स्वप्न आता अधुरं राहिलं आहे.
 
हुशार, महत्त्वाकांक्षी आणि सेवाभावी
हा सगळा प्रकार कळल्यापासून जळगावातल्या त्यांच्या घरी लोकांची गर्दी होत आहे. घरचे, शेजारचे, आसपासचे सगळेच जण शोक आणि हळहळ व्यक्त करतायत. आणि पायलच्या आठवणी 
 
सांगताना भावूक होतायत. आम्ही काहीजणांशी बातचीत केली.
 
"पायल खूप हुशार होती. तिला दहावीला 88 टक्के मिळाले होते. तिनं जिद्दीनं मेडिकलचं शिक्षण घेतलं होतं. तिनं कमी काळातच अनेकांवर उपचार केले होते,"आबेदा पुढे सांगतात.
 
पायलचा धाकटा भाऊ जन्मापासूनच पायानं अधू आहे. त्याची अवस्था पाहून पायलला डॉक्टर बनण्यासाठी आणखीनच प्रेरणा मिळाली असावी. लोकांची सेवा करायची हाच तिचा उद्देश होता. 
 
आपल्या पहिल्या स्टायपेंडमधूनही तिनं कुष्ठरोगग्रस्तांना मदत केली होती.
 
"चार महिने मी तिला आदिवासी भागात सेवा करायला लावली. ती म्हणाली आई माझ्या समाजासाठी मला सेवा करायची आहे. जो रुग्ण यायचा तो म्हणायचा, आम्हाला पायल मॅडमकडूनच 
 
उपचार घ्यायचे आहेत."
 
त्याचदरम्यान पायलला गेल्या वर्षी मुंबईच्या टोपीवाला महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पायलचे पती डॉ. सलमान तडवी हे मुंबईतल्याच कूपर रुग्णालयात असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. 
 
पायलच्या स्वप्नांना त्यांचाही पाठिंबा होता. त्यामुळे वर्षभरापूर्वी पायल मुंबईत राहायला आली.
 
पण त्यानंतर तिला आपल्याशी बोलण्यासही वेळ मिळेनासा झाला, असं आबेदा सांगतात.
 
सीनियर्सवर आरोप
आपल्या तीन सहकारी त्रास देत असल्याचं पायलनं आपल्याकडे बोलून दाखवलं होतं, असं आबेदा सांगतात.
 
"ती सांगायची, आई, या तिघी मला येण्या-तेण्या कारणावरून अगदी क्षुल्लक कारणावरून सगळ्या रुग्णांच्या समोर टोचून बोलतात. खूप अपमान करतात, फाईल तोंडावर फेकून देतात. डबाही 
 
खाऊ देत नाहीत."
 
आदिवासी तडवी भिल्ल समाजाची असलेल्या पायलला तिच्या जातीवरूनही टोचून बोललं जात होतं, असा आरोप आबेदा यांनी केला आहे.
 
त्याच दरम्यान कॅन्सरवर उपचारांसाठी आबेदाही अधूनमधून मुंबईला नायर हॉस्पिटलमध्ये येऊ लागल्या. "मला इथे आल्यावर मुलीशी भेट होईल असं वाटायचं, पण तिला तेवढाही वेळ मिळत 
 
नसे. मी दुरूनच तिला पाहायचे आणि निघून जायचे."
 
मुलीला मिळत असलेली वागणूक आपण पाहिली आणि त्याविरुद्ध तक्रार करायचं ठरवलं, पण आधी पायलनंच आपल्याला रोखलं, असं आबेदा सांगतात.
 
"ती तक्रारीसाठी नाहीच म्हणत होती. आई, तू लेखी तक्रार करू नकोस, त्यांचं नुकसान होईल, त्या पण शिकायला आलेल्या आहेत. त्यांच्यापण आईवडिलांची खूप उमेद आहे. आणि तक्रार केली 
 
तर त्या मला आणखीनच त्रास देतील."
 
तरीही डिसेंबर 2018 मध्ये पायलच्या आई आणि पती सलमान यांनी आधी तिच्या सीनियर्सशी, प्राध्यापकांशी आणि विभागप्रमुखांच्या कार्यालयात पायलला सहन कराव्या लागत असलेल्या 
 
त्रासाची कल्पना दिली होती. पायल ज्या युनिटसाठी काम करत होती ते बदललं जावं, अशी त्यांची मागणी होती. पायलला काही काळ paediatricians सोबत काम करण्याची संधी देण्यात आली, 
 
तेव्हा तिच्यावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटलं होतं.
 
पण तीन्ही सीनियर्सकडून त्रास होतच असल्यानं 10-12 मे रोजी आपण लेखी पत्र घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला आपलं म्हणणं गांभीर्यानं घेतलं गेलं नाही, असं आबेदा सांगतात.
 
त्यानंतर जेमतेम दहा दिवसांत पायलनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.
 
महाविद्यालयाची भूमिका
पोलीस तसंच नायर हॉस्पिटल-टोपीवाला महाविद्यालयाचं प्रशासन या प्रकरणी तपास करत आहेत. हॉस्पिटलनं अँटी रॅगिंग समिती बसवली असून लवकरच ते आपला अहवाल सादर करतील अशी 
 
माहिती डीन डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.
 
"आम्ही एवढे शॉकमध्ये आहोत. त्यादिवशी रात्री पंचनामा वगैरे सुरू होता. पाच तास आम्ही सगळे तिथेच होतो. एकत्र बसून चर्चा करत होतो की असं का झालं? आपण काय करायला हवं होतं, 
 
इथून पुढे काय करायचं? पायल फार हुशार मुलगी होती, अत्यंत गुणी. ती असं काही करेल असं कुणाला वाटलं नव्हतं. हे सगळं सहज थांबवता आलं असतं, त्याचं फार दुःख होतं," भारमल 
 
सांगतात.
 
पायलच्या मृत्यूनंतर डॉ. भारमल आपल्याला भेटून गेले, असं सलमान सांगतात. "त्यांचं म्हणणं होतं की त्यांना आधी सांगितलं का नाही? मी म्हटलं, सर तुम्हाला सांगण्याआधी पायलच्या 
 
विभागातले जे लोक आहेत, तिचे विभागप्रमुख, प्राध्यापक, त्यांच्याशी बोललो. कोणतीही गोष्ट क्रमानंच व्हायला हवी. आम्ही थेट तुमच्याकडे कसे येऊ शकतो? त्या क्रमानंच गेलो आम्ही, पण 
 
त्यांनी काहीच का केलं नाही?"
 
तर आबेदा महाविद्यालयाच्या प्रशासनाला उद्वेगानं प्रश्न विचारतात, "मी तुम्हाला सूचना द्यायला आले होते. मग अजून काय काय करायला हवं होतं आम्ही? कॉलेजमध्ये काय चाललं आहे हे 
 
त्यांना नाही कळत का तिथे रात्रंदिवस ते राहतात की आम्ही? त्यांच्या डोळ्यासमोर घटना घडतायत, त्यांनी लक्ष देणं आवश्यक होतं ना."
 
पोलीस सहकार्य करत असले, तरी त्यांच्यावर दबाव येईल अशी भीती त्यांना वाटते. "असंख्य, हजारो पायल आता शिक्षण घेत आहेत. त्यांचं भवितव्य आहे, त्यांच्या सुरक्षेची शासन जबाबदारी 
 
घेणार का, त्यांनी का माझ्या पायलला सांभाळलं नाही, तिचा का बळी घेतला, प्रशासनाने बळी घेतला."
 
आरोपी सीनियर डॉक्टर्सचं काय म्हणणं आहे?
दरम्यान, रॅगिंग आणि छळवणूकीच्या आरोपांचा सामना करणाऱ्या तीन्ही डॉक्टर्सना महाराष्ट्रातील रेसिंडंट डॉक्टर्सची संघटना Central MARDनं निलंबित केलं होतं. त्यांनी MARD ला 
 
लिहिलेल्या एका पत्रात आपली बाजू मांडली असून, एएनआय या वृत्तसंस्थेनं हे पत्र प्रसिद्ध केलं आहे.
 
"आत्महत्त्येचं कारण माहिती नाही म्हणून, कुठलं योग्य कारण नसताना आम्हाला त्यासाठी दोष देणं आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं हे अन्यायकारक आहे. कामाच्या मोठ्या भाराला कोणी 
 
रॅगिंग म्हणत असेल, तर आम्हा सगळ्यांनीच आपलं कर्तव्य बजावताना कधी रॅगिंग केलं किंवा रॅगिंग सहन केलं आहे. महाविद्यालयानं नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, पण पोलीस फोर्स आणि 
 
मीडियाच्या दबावाखाली आमची बाजू ऐकूनही न घेणं हा तपासाचा योग्य मार्ग नाही."
 
पायलसाठी न्यायाची मागणी
पायलचे सहकारी आणि विद्यार्थी संघटनांनी न्यायाची मागणी केली आहे. काही संघटनांनी मंगळवारी रुग्णालयाबाहेर निषेधही व्यक्त केला.
 
पण पायलची आई आबेदा यांना दु:खासोबतच आणखी एक वेगळी चिंता सतावते आहे. "माझ्या भावाच्या मुली, समाजाच्या मुली आता बारावी सायन्सचं शिक्षण घेतायत. पुढच्या शिक्षणासाठी 
 
हॉस्टेलला राहतायत. ते सगळे येऊन हाच प्रश्न विचारतायत आता आमच्या मुला-मुलींना आम्ही घरी बसवावं का ते असं का विचारतायत, कारण त्यांना आता भरवसा नाही राहिलेला."