मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (14:39 IST)

तरुण गोगोई : 15 वर्षे आसामचे मुख्यमंत्रिपद सांभाळलेलं मितभाषी, शालीन नेतृत्व

सुबीर भौमिक
आपल्याबद्दल चार गोष्टी वाढवून-चढवून सांगितल्या तरी हरकत नाही, असं बहुतांश राजकीय नेत्यांना वाटतं. स्वतःबद्दल अगदी कमीच बोललं जावं, असा विचार करणारे राजकारणी तसे दुर्मीळ. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई त्यापैकी एक.
 
मितभाषी, सुसंस्कृत आणि चतुर असलेल्या तरुण गोगोईंचं सोमवारी (23 नोव्हेंबर) रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यामागे त्यांची पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे.
 
1994 सालची गोष्ट आहे. त्यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी आयोजित केलेल्या रात्रीच्या जेवणासाठी मलाही आमंत्रण होतं.
 
गोगोई तेव्हा पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये फूड प्रोसेसिंग मिनिस्टर होते. युरोपमधील काही देशांचा दौरा करून ते परतले होते. त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत हसत मला विचारलं की, सध्या आसाम काँग्रेसमध्ये काय सुरू आहे?
 
त्यांनी पुढे केलेल्या चहाचा कप घेत मी उत्तर दिलं, "सर, अनेक जण म्हणतात की, तुम्हाला आसामचं मुख्यमंत्री बनायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही हाय कमांडसोबत लॉबिंग करत आहात."
 
माझं उत्तर ऐकून गोगोई जोरजोरात हसायला लागले. त्यांनी म्हटलं की, "आसामसारख्या राज्याला सांभाळण्यासाठी हितेश्वर सैकिया हे अतिशय योग्य आहेत."
 
त्यावेळी हितेश्वर सैकिया आसामचे मुख्यमंत्री होते.
 
सगळ्या अफवा फेटाळून लावताना त्यांनी म्हटलं, "तुम्हाला माहितीये की आसाम किती गुंतागुतीचं राज्य आहे. ते सांभाळण्यासाठी सैकियांसारख्या चतुर मुख्यमंत्र्याचीच गरज आहे. मोई याते भाल आसु (मी इथे ठीक आहे.)"
 
ते केंद्रामधल्या त्यांच्या मंत्रिपदाबद्दल बोलत होते.
 
सात वर्षांनंतर त्यांनी 2001 साली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावेळी मी त्यांना त्यादिवशी संध्याकाळी आमच्यात झालेल्या संभाषणाची आठवण करून दिली. तुम्ही मुख्यमंत्री होण्याबद्दल त्यावेळी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती याची आठवण करून दिल्यावर त्यांनी लगेचच उत्तर दिलं.
 
"पक्षाला मला मुख्यमंत्री बनवायचं होतं. यात मी काय करू शकत होतो? हितेश्वर सैकिया यांची जागा मी घेऊ शकतो असं पक्षाला वाटतंय."
 
त्यानंतर त्यांनी त्यांचं सुपरिचित हास्य करत मी सर्व आश्वासनं पूर्ण करेन, असं म्हटलं. या घटनेनंतर 15 वर्षे आसामसारख्या संघर्षात गुंतलेल्या राज्याचं मुख्यमंत्रिपद सांभाळताना त्यांनी खरंच आपला हा शब्द पाळण्याचा प्रयत्न केला.
 
आसाम प्रदेश काँग्रेसच्या महासचिव बोबिता सर्मा सांगतात की, गोगोई एक सर्वमान्य नेते होते आणि आपल्या सहकाऱ्यांमध्ये त्यांचं वजन होतं. त्यांचं व्यक्तिमत्त्व अतिशय वेगळं होतं."
 
गोगोई यांचा राजकीय प्रवास
गोगोई हे सहा वेळा खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी केंद्रात मंत्रिपदंही भूषवली होती.
 
वकिलीचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर ते काँग्रेसमध्ये हळूहळू यशाच्या पायऱ्या चढत गेले. इंदिरा गांधी यांच्या काळात ते पहिल्यांदा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव बनले आणि नंतर राजीव गांधी यांच्या काळात जनरल सेक्रेटरीही बनले.
कॅबिनेटमध्ये त्यांचे सहकारी असलेले भूमिधर बर्मन सांगतात, "त्यांनी कधीच गोष्टी मिळवण्याची घाई केली नाही."
 
गोगोई हे पूर्णपणे लोकशाही मानणारे होते. ज्येष्ठ नेते असूनही ते टीकेचा स्वीकार करायचे. आसाममध्ये गुंतवणूक आणू न शकल्यामुळे त्यांच्या सरकारला जी टीका सहन करावी लागली, त्याचाही यात समावेश आहे.
 
आसामचे माजी माहिती आयुक्त जेपी सैकिया सांगतात, "तुम्ही त्यांच्या सरकारवर टीका करणाऱ्या बातम्यासुद्धा छापू शकत होता. बातमी कितीही नकारात्मक असली तरी प्रेस कॉन्फरन्समध्ये ते तुमच्या प्रश्नांची हसतमुखानं उत्तरं द्यायचे. सध्याच्या राजकारण्यांप्रमाणे त्यांचा आवेश आक्रमक नव्हता."
 
माझ्यासह अनेक पत्रकार ही गोष्ट मान्य करतील.
 
तरुण गोगोई यांनी आसाममध्ये कट्टरपंथाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या समस्या दूर करणाऱ्यावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामध्ये उल्फा (ULFA) सशस्त्र आंदोलन, बोडो फुटीरतावादी आंदोलन आणि दिमासा तसंच कार्बी समूहांच्या सशस्त्र आंदोलनाचा समावेश होता.
 
2010 साली जेव्हा उल्फामध्ये फूट पडली, तेव्हा गोगोईंना काहीसं यश मिळालं. कारण संघटनेतले काही कट्टरपंथी नेते केंद्रासोबत चर्चा करण्यासाठी तयार झाले होते. त्यावेळी उल्फाचे बहुतांश नेते बांग्लादेशमध्ये राहत होते.
 
मात्र त्यांना आसाममध्ये काँग्रेसची सत्ता राखण्यात यश आलं नाही. कारण अल्पसंख्यांकांचा पक्ष म्हणून वाढू लागलेल्या एका प्रादेशिक पक्षाला जोखण्यात ते कमी पडले.
 
अत्तराचे व्यापारी असलेल्या बदरुद्दीन अजमल यांचा पक्ष एआयएयुडीएफ अल्पसंख्यांक मतं सातत्यानं आपल्या बाजूनं वळविण्यात यशस्वी होत गेला. केंद्रातील नेत्यांच्या सांगण्यानंतरही त्यांनी बदरुद्दीन अजमल यांच्याशी चर्चा केली नाही.
 
त्यांनी एकदा विचारलंही होतं, "कोण अजमल?" त्यांच्या या विधानाचीही खूप चर्चा झाली होती.
 
गोगोईंना मूळ आसामींचं काँग्रेसला असलेलं समर्थन कायम ठेवायचं होतं, असं काही जणांचं म्हणणं होतं. 1979 ते 1985 अशा सहा वर्षांच्या दीर्घ संघर्षात काँग्रेसनं हे समर्थन गमावलं.
 
2016 पर्यंत राज्यात काँग्रेसची सत्ता होती. आसामच्या लोकांमध्ये काँग्रेस आणि गोगोई दोघांची लोकप्रियता कायम असल्याचंच ते उदाहरण होतं.
 
मात्र 2016 च्या निवडणुकीत भाजपनं आसाममध्ये विजय मिळवला.