सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : मंगळवार, 2 मार्च 2021 (18:09 IST)

कोरोना लशीमुळे 80 वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीव्र आजाराची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते

कोरोना लशीमुळे 80 वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीव्र आजाराची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते. कोरोनाविरोधी लस तीव्र स्वरूपाच्या संसर्गाची शक्यता कमी करते.
 
लशीचा एक डोस घेतल्याने, रुग्णालयात उपचारांची गरज 80 टक्क्यांपेक्षा कमी होते, असं इंग्लंडमध्ये एका अभ्यासात समोर आलंय.
 
यूकेमध्ये 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' आणि 'फायझर बायो-एन-टेकने' तयार केलेली कोव्हिड-19 विरोधी लस देण्यात येत आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लसीकरणानंतर तीन-चार आठवड्यांनी लसीचा परिणाम दिसून आला आहे.
 
इंग्लंडमध्ये पहिल्या टप्प्यात 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आली. याच्या अभ्यासात ही माहिती समोर आली.
 
भारतात ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरूवात
भारतात उपलब्ध असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची 'कोव्हिशिल्ड' लस 'ऑक्सफर्ड-अस्ट्राझेन्का' ने बनवलेली आहे.
 
देशात 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 59 वयोगटातील इतर आजार असलेल्यांना लस देण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
 
लसीचे परिणाम चांगले
इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी लसीचे परिणाम चांगले असल्याचं सांगितलं आहे. पण, कोव्हिड-19 पासून योग्य संरक्षण मिळण्यासाठी लशीचे दोन डोस घेण्याची गरज असल्याचं त्यांच मत आहे.
 
गेल्या आठवड्यात स्कॉटलंडच्या आरोग्य विभागाने लसीकरणाचे परिणाम जाहीर केले होते.
 
यूकेचे आरोग्य सचिव मॅट हॅन्कॉक यांनी सोमवारी माहिती देताना सांगितलं, "लसीकरणाचे परिणाम खूप चांगले आहेत."
 
"दोन आठवड्यांपासून 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांची अतिदक्षता विभागात दाखल होण्याची संख्या कमी झालीये. यावरून लसीकरणाचे परिणाम स्पष्ट होतात," असं ते पुढे म्हणाले.
 
पत्रकारांना संबोधित करताना इंग्लंडचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी प्रो. जोनाथन वॅन-डॅम म्हणाले, "कोव्हिड-19 विरोधी लशीचा दुसरा डोस लसीकरण कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. याचं महत्त्व कमी झालेलं नाही."
 
"लशीच्या दुसऱ्या डोसनंतर शरीरात रोगप्रतिकारकशक्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. पहिला डोस घेतल्यानंतर तयार झालेल्या रोगप्रतिकारशक्तीपेक्षा, दुसऱ्या डोसनंतर जास्त रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता आहे. ही जास्त दिवस टिकेल." असं ते पुढे म्हणाले.
 
यूकेमध्ये 20 दशलक्ष लोकांना कोव्हिड-19 विरोधी लसीचा पहिला डोस मिळाला आहे.
 
यूकेमध्ये गेल्या 28 दिवसांत 104 कोरोनाबाधित व्यक्तींचा मृत्यू झाला. तर, 5455 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
 
इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, फायझरची लस 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' पेक्षा 1 महिना अगोदर देण्यात आली. यामुळे कोरोना संसर्गाने मृत्यू होणाऱ्यांच्या संख्यात 83 टक्के घट झाली. 80 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या मृत्यूंचा अभ्यास केल्यानंतर ही गोष्ट समोर आली.
 
मिळालेल्या माहितीनुसार, लसीमुळे 70 वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून येण्याचं प्रमाण पहिल्या टप्प्यातील लसीकरणानंतर तीन आठवड्यांनी 60 टक्के कमी झालंय.
 
प्रो. वॅन-डॅम सांगतात, "वयस्कर लोकांना 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' ची लस देण्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत."
 
यूरोपातील काही देशांनी 65 वर्ष वयापेक्षा जास्त लोकांना ही लस देण्यास नकार दिलाय. कारण, या लशीची ट्रायल फक्त युवांमध्ये करण्यात आली होती.
 
इंग्लंडमध्ये लसीकरण प्रमुख डॉ. मेरा रामसे म्हणतात, "लसीमुळे संसर्ग कमी होतो आणि जीव वाचवण्यात मदत मिळते याचा पुरावा हळूहळू समोर येतोय."
 
पण, ब्राझीलमध्ये निर्माण झालेल्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनचा मुकाबला करण्यासाठी ही लस किती उपयुक्त आहे यावर अभ्यास करावा लागेल. यूकेत ब्राझीलमध्ये म्युटेट झालेला कोरोना व्हायरसचा स्ट्रेन आढळून आला आहे.