बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 1 जून 2024 (12:53 IST)

महागडे लक्झरी परफ्युम तयार करण्यासाठी असे राबवले जातात चिमुकल्यांचे हात

लॅनकोम आणि एरिन ब्युटी या आंतरराष्ट्रीय सौंदर्य प्रसाधन कंपन्यांचे पुरवठादार कच्चा माल गोळा करण्यासाठी बालमजुरीचा आधार घेत असल्याचं बीबीसी आय इनव्हेस्टिगेशननं ही बाब समोर आणली आहे.या कंपन्या विकत असलेले परफ्युम जास्मिनच्या (मोगरा) फुलांपासून बनवले जातात. या फुलांची तोडणी करण्यासाठी कंपन्यांचे पुरवठादार बालमजूर राबवत असल्याचं समोर आलं आहे. महागडे परफ्युम आणि इतर सौंदर्य प्रसाधनं विकणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी मात्र, ठोस पुराव्यानंतरही बालमजुरीला ठाम विरोध असल्याचं सांगत हात झटकले आहेत. लानकोमची मुख्य कंपनी असलेल्या लोरिआलनं आरोपांचं खंडन केलं आहे. मानवाधिकार जतन करण्यासाठी आम्ही 100 टक्के कटिबद्ध असल्याचं कंपनीनं म्हटलंय. तर एरिन ब्युटीची मुख्य कंपनी एस्टी लाऊडरनं, सर्व पुरवठादारांशी संपर्क करून आरोपांची चौकशी करत असल्याचा खुलासा केला आहे.
 
लानकोम कंपनीच्या आयडल एल इंटेन्स आणि इकत जास्मिन या परफ्युमसाठी तर एरिन ब्युटीच्या लिमोन डि सिसिलीया या परफ्युमसाठी लागणारी मोगऱ्याची फुलं इजिप्तमधून येतात. महागडे परफ्युम तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून प्रामुख्यानं या फुलांचा वापर होतो. जगभरातील परफ्युम उत्पादनासाठी अर्ध्याहून अधिक फुलांचा पुरवठा एकट्या इजिप्तमधून होतो. हे इजिप्तमधील प्रमुख शेती उत्पादन आहे. महागड्या परफ्युम उत्पादन क्षेत्राच्या अभ्यासकांच्या मते, या कंपन्या नफा वाढवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्पादन आणि पुरवठा साखळीतील सगळ्याच खर्चांवर कात्री लावली आहे. परिणामी या साखळीतील सर्वात खालच्या फुलं गोळा करणाऱ्या शेतमजुरांचं वेतनही कमी झालं आहे. कंपन्यांनीच बजेटला कात्री लावल्यामुळं कमी पगारात काम करणाऱ्या बालमजुरांना कामाला लावावं लागत असल्याचं स्थानिक फुल उत्पादक / पुरवठादारांचं म्हणणं आहे.
 
त्यामुळं अशा प्रकारांवर देखरेख ठेवून त्यांना आळा घालण्यासाठी मोठमोठ्या अत्तर कंपन्यांनी तयार केलेली यंत्रणा अतिशय कुचकामी असल्याचं बीबीसीला आढळून आलं. पुरवठा साखळीतील घटकांवर या कंपन्यांचं कुठलंच नियंत्रण दिसलं नाही. संयुक्त राष्ट्रांच्या विशेष प्रतिनिधी टोमोयो ओबोकाटा यांनीही बीबीसीला मिळालेल्या या पुराव्यांवर चिंता व्यक्त केली. जगभरात उत्पादन प्रक्रियेत राबवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर गुलामगिरीवर देखरेख ठेवणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या विशेष समितीच्या त्या प्रतिनिधी आहेत. इजिप्तमधील मोगऱ्याच्या शेतीचं गेल्या वर्षीच्या तोडणीच्या हंगामातील चित्रणच बीबीसीनं केलं आहे. या व्हिडिओंमध्ये बालमजुरांकडून फुलांच्या तोडणीचं काम करून घेत असल्याचं, स्पष्ट दिसतं. “या कंपन्या कागदावर नैतिकतेचे मोठ मोठे दावे करतात. पुरवठा यंत्रणेतील पारदर्शकता आणि बालमजुरीविरोधातील लढ्याची भाषा करतात. पण यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत, हे फुटेजवरून स्पष्ट होतं,’’ अशी प्रतिक्रिया ओबोकाटा यांनी दिली. हेबा इजिप्तमधील घार्बिया जिल्ह्यातील एका गावात राहतात. या भागात मोगऱ्याची शेती मोठ्या प्रमाणावर होते. हेबा आणि तिचं संपूर्ण कुटुंब पहाटे तीन वाजता उठतं. ते फुलांची तोडणी सुरू करतात. सूर्योदयापर्यंत ती सुरू राहते. त्याचं कारण म्हणजे, सूर्य उगवल्यावर उन्हात ही फुलं कोमेजतात त्यामुळं त्यांचा फायदा होत नाही.
 
हेबा त्यांच्या चारही मुलांना या कामासाठी सोबत नेतात, असं सांगतात. त्यांची मुलं 5-15 वयोगटातील आहेत. इतरांच्या शेतात फुलं तोडणीचं काम करणारे, हेबासारखे असे अनेक लोक या भागात आहेत. जितकी जास्त फुलं गोळा होतील तितके जास्त पैसे त्यांना मिळतात. ज्या रात्री आम्ही गोपनीय पद्धतीनं व्हिडिओ तयार केला त्या रात्री हेबा यांनी मुलांसह 1.5 किलो मोगऱ्याची तोडणी केली होती. यातून मिळालेल्या कमाईतील एक तृतीयांश भाग शेतमालकाला दिला जातो. त्यानुसार त्या फुलांचे हेबा यांना 1.5 डॉलर्स मिळाले. इजिप्तमधली वाढती महागाई पाहता ही रक्कम अगदीच क्षुल्लक म्हणावी लागेल. इजिप्तमधील हे फुलं तोडणीचं काम करणारे बहुतांश कामगार आज दारिद्ररेषेखाली हलाखीचं जीवन जगत आहेत. त्यांच्या कामाचा मोबदला किमान वेतनापेक्षाही कमी आहे. हेबा यांची 10 वर्षांची मुलगी बसमल्ला हिला नुकताच डोळ्यांचा विकार जडला आहे. बीबीसीची टीम स्वतः हेबा आणि बसमल्लासोबत डॉक्टरांकडे गेली होती. त्यावेळी मोगऱ्याच्या तोडणीमुळं तिला हा विकार जडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
 
एवढंच नाही तर हे काम करत राहिल्यास तिला, दृष्टीदेखील गमावावी लागू शकते, असा इशाराही डॉक्टरांनी दिला. फुलांची तोडणी झाल्यानंतर त्यांचं वजन केलं जातं. नंतर ती फुलं स्थानिक कारखान्यांमध्ये तेल काढायला पाठवली जातात. ए फाखरी अँड कंपनी, हाशेम ब्रदर्स आणि मचालिको हे तेल काढण्याचे मुख्य कारखाने आहेत. हेबासारख्या तोडणी कामगारांना कामाचे (तोडलेल्या फुलांचे) किती पैसे मिळतील हे हेच कारखाने ठरवतात. इजिप्तमधील एकूण 30 हजार लोक मोगरा उत्पादनाच्या या क्षेत्रात काम करतात. त्यात नेमके किती बालमजूर आहेत, याबाबत ठोस माहिती नाही. पण 2023 च्या हंगामात बीबीसीनं केलेलं व्हिडिओ चित्रण आणि स्थानिकांशी साधलेला संवाद यातून इथं बालमजुरी सर्रास सुरू असल्याचं स्पष्ट आहे. फुलांचा भाव आणि पर्यायानं कामाचे दर प्रचंड घसरल्यानं लोकांना नाइलाजानं मुलांना कामावर सोबत न्यावं लागत आहे. आम्ही चित्रण केलेल्या चार वेगवेगळ्या ठिकाणी तोडणीत 15 वर्षांखालील अनेक मुलं काम करत असल्याचं स्पष्ट दिसतं. याठिकाणचा सगळा माल वरील तीन कारखान्यांकडं जातो. बालमजूर असलेल्या काही शेतजमिनी तर थेट माचलिको कारखान्याच्या मालकीच्या असल्याचंही सूत्रांकडून समजलं. आम्ही गुप्तपणे केलेल्या चित्रणावेळी इथं काम करणाऱ्या लहान मुलांबरोबर संवादही साधला. तेव्हा सगळ्यांचं वय 12 ते 14 दरम्यानच असल्याचं समजलं. इजिप्तमध्ये 15 वर्षांखालील कोणीही रात्रपाळीत म्हणजे सायंकाळी 7 ते सकाळी 7 यादरम्यान काम करणं हा गुन्हा आहे.
 
मोगऱ्याच्या फुलांपासून तयार केलेलं तेल कारखाने आंतरराष्ट्रीय सौंदर्य प्रसाधन कंपन्यांना निर्यात करतात. त्यापासूनच या कंपन्या परफ्यूम तयार करतात. स्वित्झर्लंडमधील जिवाडान ही परफ्युम तयार करणाऱ्या जगातील प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. अनेक वर्षांपासून या कंपनीचे ए फाखरीबरोबर व्यावहारिक संबंध आहेत. पण या क्षेत्रातली सर्वाधिक शक्ती ही यांच्या वरच्या स्तरातील परफ्यूम कंपन्यांकडं आहे. लोरिआल आणि एस्टी लाऊडर यांचा त्यात समावेश असल्याचं लहान उद्योजक सांगतात. असेच एक स्थानिक उद्योजक ख्रिस्तोफर लोडामाईल यांनी आम्हाला, या उद्योगाचं जाळं उलगडून सांगितलं. अशा कंपन्यांना उद्योजकांच्या भाषेत 'द मास्टर्स' म्हटलं जातं. या कंपन्या परफ्युम तयार करणाऱ्यांना अतिशय तोकडं बजेट देतात. त्यामुळं उत्पादन साखळीत खालच्या स्तरावर असलेल्यांचा मोबदला कमी होत जातो. "परफ्युमसाठी सर्वात स्वस्त तेल मिळवायचं आणि त्यापासून तयार केलेले परफ्युम अत्यंत महागात विकायचे, या एकमेव तत्त्वावर मास्टर कंपन्या चालतात,” असं या क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले लोडामाईल म्हणाले. “प्रत्यक्षात या मास्टर कंपन्या शेतमालाचा आणि मजुरीचा भाव ठरवत नाहीत. पण मुळात बजेटच कमी करून त्यांनी टाकलेला दबाव खालपर्यंत झिरपत जातो आणि त्यात सर्वाधिक नुकसान मजुरांचं होतं. या कंपन्यांची नैतिकतेची जाहिरातबाजी आणि प्रत्यक्ष वास्तव यात कमालीचं अंतर आहे,’’ अशा शब्दांत लोडामाईल यांनी या क्षेत्राची पोलखोल केली.
 
जाहिरातींमधून या परफ्यूम कंपन्या आणि अत्तर बनवणारे कारखाने पूर्णपणे नैतिक कारभार असल्याचा दिखावा करतात. प्रत्येक उत्पादकानं संयुक्त राष्ट्रांबरोबर मार्गदर्शक सूचना पालन करण्याबाबतचा करार केलेला असतो. उत्पादन प्रक्रिया कामगारांसाठी अतिशय सुरक्षित आणि बालमजुरीला थारा नसलेली असेल सं कंपन्यांकडून लेखी सांगितलेलं असतं. पण प्रत्यक्ष काय घडतं याकडं कंपन्याचं दुर्लक्ष झाल्याची कबुली जिवाडान कंपनीच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगिकलं. काही गैर तर घडत नाही हे तपासण्याची जबाबदारी स्थानिक कारखान्यांवर टाकून मोठ्या परम्यूम कंपन्या जबाबदारी झटकतात. या पुरवठा साखळी आणि उत्पादन प्रक्रियेची तपासणी (ऑडिट ) करणाऱ्या दोन मुख्य कंपन्या आहेत सेडेट आणि यूईबीटी.
 
त्यांचा तपासणी अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध नसतो. पण आम्ही खरेदीदार असल्याचं सांगून ए फाखरी यांच्याकडं गेलो. खरेदीदार म्हणून आपल्याला नैतिकदृष्ट्या विश्वास बसावा म्हणून आम्ही अहवालाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी आम्हाला नावापुरते दोन्ही रिपोर्ट दिले. मोगऱ्याच्या तोडणीपासून तेल आणि नंतर परफ्युम बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत कामगार हक्क आणि मानवाधिकारांचं उल्लंघन झालं नसल्याचं खात्री देणारा सेडेट आणि यूईबीटीचा तो अहवाल होता. यूईबीटीच्या अहवालात (गेल्या वर्षी कारखान्याला दिलेल्या भेटीवरून तयार केलेला) नावापुरता मानवाधिकारांच्या उल्लंघना ओझरता उल्लेख होता. पण त्याच्या खोलात जाऊन माहिती घेतलेली नव्हती. अहवालात ना हरकत पडताळणी प्रमाणपत्रही आहे. म्हणजे तेल 'नैतिक जबाबदारीचं' पालन करून काढण्यात आल्याचं त्यात म्हटलं होतं. नियम आणि कायद्याचं इतकं उघड उल्लंघन होत असताना प्रमाणपत्र कसं दिलं असा प्रश्न त्यांना केला. त्यावर हे प्रमाणपत्र 2024 च्या मध्यापर्यंतच लागू असून त्यानंतर पुन्हा पडताळणी करून नियम पाळले जात नसल्यास ते रद्द केलं जाईल, अशी सारवासारव करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
 
सेडेक्सच्या अहवालानं तर कारखान्याला सरसकट हिरवा कंदील दाखवत नैतिक ठरवलं. पण अहवाल नीट वाचल्यानंतर सेडेक्सनं तपासणीकरता कारखान्याला दिलेली भेट पूर्वनियोजित होती, असं लक्षात येतं. तसंच तपासणी फक्त कारखान्याची झाली‌. कारखान्यात येणाऱ्या फुलांच्या तोडणीची पाहणी केल्याबाबत काहीही उल्लेख अहवालात नाही. बीबीसाला उत्तर देताना सेडेक्सनं कामगार हक्क उल्लंघनाच्या विरोधात असल्याचं म्हटलं. तसंच कामगार आणि मानवी हक्कांचं जतन करण्याची जबाबदारी फक्त एकाच घटकावर टाकणं योग्य नाही, असं म्हणत त्यांनी जबाबदारी झटकण्याचाही प्रयत्न केला. कामगार हक्कांवर काम करणाऱ्या वकील आणि रिस्पॉन्सिबल कॉन्ट्रॅक्टिंग प्रोजेक्टच्या संस्थापक सारा डाडुश यांच्याशीही बीबीसीने संवाद साधला. जागतिक पुरवठा साखळीत कामगार हक्क आणि मानवाधिकारांचं उल्लंघन रोखण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. “ही व्यवस्था कुचकामी असल्याचं बीबीसीच्या बातमीमधून स्पष्ट झालं आहे. पण तपास यंत्रणा फक्त मालकांच्या सूचनांवर काम करतात, ही मुख्य समस्या आहे. कारण त्यासाठी पैसाही त्यांनीच दिलेला असतो. त्यामुळं पुरवठा साखळीतील कामगारांचे प्रश्न दुर्लक्षित राहतात. बालमजुरीचं मुख्य कारणही हेच आहे. कामगारांच्या प्रश्नांकडं लक्ष वेधण्यासाठी या तपास यंत्रणांना पुरेसा निधी दिला गेला पाहिजे," असं मत सारा यांनी व्यक्त केलं.
 
आमच्या कारखान्यात आणि शेतात बालमजूर काम करत नाहीत, असं स्पष्टीकरण ए फखरी आणि कंपनीनं दिलं. पण त्यांच्या कारखान्यात येणारा बहुतांश जास्मिन फुलांचा ढीग तर छोट्या स्वतंत्र शेतकऱ्यांकडून येतो. "यूईबीटीला सोबत घेऊन आम्ही 2018 साली जास्मिन प्लांट प्रोटेक्शन प्रोडक्ट्स मिटिगेशन प्रोजेक्ट राबवला. या अंतर्गत 18 वर्षांखालील व्यक्तींना जास्मिन शेतात काम करण्यास मनाई करण्यात आली. शिवाय इजिप्तमधली सरासरी उत्पनाच्या तुलनेत फुल तोडणी कामगारांना दिलं जाणारं वेतनही बरंच चांगलं आहे," असा दावा ए फखरीनं बीबीसीला दिलेल्या उत्तरात केला. मचालिकोनं तर 18 वर्षांखालील तोडणी कामगारांकडून काम करून घेतलं जात नसल्याचं सांगितलं. तसंच गेल्या दोन वर्षांपासून दर वाढवून दिला आहे. यावर्षीही पुन्हा दर वाढवणार असल्याचं ते म्हणाले.
 
हाशीम ब्रदर्सनं आम्हाला चुकीची माहिती मिळाल्याचं म्हणत, सरळसरळ सगळे आरोप धुडकावून लावले. लानकोम आयडल एल इन्टेन्स साखरे उंची परफ्यूम्स बनवणाऱ्या जिवाडान कंपनीनं बीबीसीची माहिती अतिशय चिंताजनक असल्याचं म्हटलं. बालमजुरी संपूर्णपणे हटवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. फिरमेनिच ही आणखी एक उंची अत्तर बनवणारी कंपनी आहे. एरिन ब्युटीसाठी ते इकत जास्मिन आणि लिमोन डि सिसिलिया हे प्रसिद्ध परफ्यूम्स तयार करतात. या कंपनीनं 2023 मध्ये मचालिकोकडून जास्मिन घेतलं होतं. पण आता आम्ही नवीन पुरवठादाराकडून घेत असल्याचं त्यांनी बीबीसीला सांगितलं. तसंच स्थानिक उद्योजक आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन या मुद्द्यांवर काम करणार असल्याचं आश्वासनही दिलं. सर्वात वर असलेल्या मास्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या कंपन्यांनाही आम्ही आमच्या तपासात समोर आलेली, माहिती पाठवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना लोरिआलनं, आंतरराष्ट्रीय कायदे, नियम आणि मानवाधिकारांचं जतन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. तसंच मोगऱ्याच्या फुलांचा भाव कमी करण्यासाठी स्थानिक कंपन्यांवर दबाव टाकला नसल्याचंही म्हटलं. बाजारभावापेक्षा कमी किंमतीत माल विकत घेऊन आम्हाला शेतकऱ्यांचं नुकसान करायचं नाही. पण त्याचवेळी काही पुरवठादारांकडून असे गैरप्रकार होत असण्याची शक्यताही त्यांनी नाकारली नाही. या गैरप्रकारांवर आळा घालून आदर्श पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी आणखी सजग राहण्याचं आश्वासन लोरिआलनं दिलं आहे. एस्टी लाऊडरनं दिलेली प्रतिक्रियाही काहीशी अशीच होती.
 
“मुलांचे हक्क सर्वोच्च असून कुठल्याही परिस्थितीत त्यांचं जतन झालंच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. सदर प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आम्ही आमच्या पुरवठादारांना दिलेले आहेत. लवकरंच त्यातून सत्य काय ते निष्पन्न होईल. हा एक अतिशय नाजूक आणि गुंतागुंतीचा सामाजिक व आर्थिक विषय असल्याची आम्हाला कल्पना आहे. पण या सर्व उत्पादन प्रक्रियेत पारदर्शकता येऊन आमच्यासोबत गरिब स्थानिक जनतेचंही भलं व्हावं या उद्देशानं आम्ही काम करत आहोत,” असं एस्टी लाऊडरनं बीबीसीला दिलेल्या उत्तरात म्हटलं. तुम्ही तोडणी केलेल्या फुलापासून तयार केलेला परफ्युम आंतरराष्ट्रीय बाजारात किती किंमतीत विकला जातो, हे सांगितल्यावर घार्बियातील फुल तोडणी कामगार हेबा आवाकच झाल्या. “आम्हा लोकांच्या जीवाची काही किंमतच नाही, म्हणायचं!,” अशी दर ऐकल्यानंतर हेबाची पहिली प्रतिक्रिया होती. “श्रीमंत लोकांनी खुशाल महागडे परफ्युम वापरावे, चैन करावी माझा त्याला विरोध नाही‌. पण ते बनवताना लहान मुलांना होणाऱ्या त्रासाचा विसर त्यांना पडता कामा नये,’’ असं हेबा पुढं म्हणाल्या. सारा डाडुश यांचं मत मात्र हेबा यांच्यापेक्षा वेगळं आहे. “या सर्व गैरप्रकारांसांठी ग्राहकांना दोषी धरणं चुकीचं आहे. ग्राहकांची यात काही भूमिकाच नसते. ही जबाबदारी मोठमोठ्या कंपन्या आणि सरकारांची आहे. त्यांनी कठोर कायदे आणून या सर्व गैरप्रकारांवर आळा घातला पाहिजे,’’ अशी स्पष्ट भूमिका सारा यांनी मांडली.
 
Published By- Dhanashri Naik