शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 30 मे 2022 (09:21 IST)

सिद्धू मुसेवालांच्या वाहनावर झाले तीस राऊंड फायर, पंजाब पोलिसांची माहिती

पंजाबच्या मानसा भागात गायक सिद्धू मुसेवाला यांच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या या वृत्ताला पंजाब पोलिसांनी दुजोरा दिला आहे. या गोळीबारात अन्य तिघेजण जखमी झाल्याचंही वृत्त आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसेवालांच्या वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांचे तीस राऊंड फायर करण्यात आले. मुसेवाला सुरक्षा रक्षकांशिवाय घराबाहेर पडले होते.
 
मुसेवाला यांना गोळीबारानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

पंजाब सरकारने शनिवारी 424 धार्मिक, राजकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांची सुरक्षा कमी केली होती. यामध्ये सिद्धू मुसेवालांचंही नाव होतं.
 
काही वर्षांपूर्वी पंजाबच्या मनोरंजन क्षेत्रात शुभदीप सिंहचं सिद्धू मुसेवाला असं नामकरण झालं. गन कल्चरशी संबंधित त्याची गाणी लोकप्रिय झाली. सिद्धू मुसेवालांची आई सरपंच आहे. निवडणुकीच्या काळात मुसेवालांनी आईसाठी जोरदार प्रचारही केला होता.
 
त्यानंतर मुसेवालांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा विधानसभेची निवडणूक लढवली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
 
बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी सुरिंदर मान यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धू मुसेवाला यांनी चेतन सिंह सर्वहितकारी विद्या मंदिर शाळेतून बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर पदवीचं शिक्षण घेतलं. कॅनडात एक वर्षाचा डिप्लोमा अभ्यासक्रमाचं शिक्षणही घेतलं.
 
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील ट्वीट करत त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. उभरते नेतृत्व आणि प्रतिभावान कलाकाराच्या जाण्याने अतिशय दुःख झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
 
मुसेवाला यांच्या मृत्यूनंतर युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी आम आदमी पार्टीवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान-मुसेवाला यांच्या खूनाचं रक्त तुमच्या हातांना लागलं आहे. थोडी लाज बाळगा आणि पदाचा राजीनामा द्या असं श्रीनिवास यांनी म्हटलं आहे.