रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2019 (11:18 IST)

विधानसभा 2019 : शिवसेना-भाजपत पश्चिम महाराष्ट्रातून वाढलेले पक्षप्रवेश भविष्यासाठी धोक्याची घंटा?

हर्षल आकुडे
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि मोहोळचे भाजप नेते नागनाथ क्षीरसागर यांनी बुधवारी (28 ऑगस्ट) शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मागच्या आठवड्यात सोलापुरच्याच करमाळ्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रश्मी बागल यांनीही शिवबंधन बांधून घेतलं होतं. शिवसेनेपूर्वी भाजपने या भागातील अनेक मोठ्या नेत्यांना आपल्या गोटात सामील करून घेतलं होतं. आगामी काळात या भागातील इतर अनेक नेते भाजप आणि शिवसेना या पक्षांमध्ये प्रवेश करतील अशी चर्चाही रंगली आहे.
 
सोलापूरसोबतच सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. मागच्या सहा महिन्यात निवेदिता माने, रणजितसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शिवेंद्रसिंहराजे भोसले या प्रमुख नेत्यांसोबतच इतर काही नेत्यांनी भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. येत्या काळात आणखी काही प्रवेश होतील, असं भाजप आणि शिवसेनेचे नेते सांगतात.
 
या सगळ्या घडामोडींमुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकीय समीकरणानं अत्यंत रंजक वळण घेतलं आहे. या भागात एकेकाळी एका एका जागेसाठी झगडणाऱ्या या पक्षांनी पश्चिम महाराष्ट्रावर संपूर्ण लक्ष केंद्रीत केल्याचं दिसून येत आहे.
 
"कार्यकर्त्यांसाठी पक्षांतर"
पक्षांतर करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिलीप सोपल म्हणाले, "1978 पासून मी बार्शीच्या राजकारणात सक्रिय आहे. माझ्या सर्व सहकाऱ्यांचा शिवसेनेत जाण्याचा आग्रह होता. राज्यात युती आहे की नाही याचा विचार न करता मी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी कुस्ती ठरवून व्यायाम करत नाही. जो समोर असेल त्याच्याशी लढायला मी तयार आहे."
सोपल यांच्याप्रमाणेच दिलीप माने यांनीसुद्धा पक्षांतराचं कारण सांगितलं, "मतदार, कार्यकर्त्यांच्या कामांसाठी मी शिवसेनेत जात आहे. माझी कोणतीही अपेक्षा नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यातील कोणत्याही मतदारसंघातून लढण्याचा आदेश दिल्यास माझी तयारी आहे. पक्षातील स्थानिकांशी मी जुळवून घेणार आहे. ग्रामीण भागात पक्ष वाढवण्याचे शिवसेनेचे धोरण आहे. भाजप-सेनेची युती कायम राहिल्यास युतीचा प्रचार करणार आहे. पण शिवसेनेने सोपवलेल्या मतदारसंघालाच प्राधान्य असेल."
 
ग्रामसभा आयोजित करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भाषणबाजीनंतर पक्षांतर करावं किंवा नये, असा प्रश्न विचारण्याचा नवा ट्रेंड मोहिते पाटील कुटुंबियांनी राजकारणात आणला. यातून प्रेरणा घेऊन 'कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार', 'जनतेचा कल बघून' किंवा 'मतदारसंघाच्या विकासासाठी' अशी आदर्श वक्तव्य करून पक्षांतर करताना राजकीय नेते दिसत आहेत.
 
पण या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात ताकद वाढवण्याची संधी मिळत असल्याने भाजप शिवसेनाही अशा घडामोडींचा इव्हेंट साजरा करत आहेत. गाजावाजा करून माध्यमांमध्ये चर्चा घडवण्यात येत आहे. अखेरीस जास्तीत जास्त तगडा उमेदवार मिळवून अधिकाधिक जागा मिळवण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.
 
सत्तेच्या जवळ राहण्याची ओढ
"ज्याची सत्ता केंद्रात त्याची राज्यात येते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. त्यामुळे वाऱ्याची दिशा पाहून तिथं जाण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. निकाल अपेक्षित असल्यामुळे भाजप शिवसेनेच्या बाजूने नेत्यांचा कल आहे. स्थानिक सत्ताकेंद्र आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी नेते या पक्षांमध्ये जात आहेत," असं प्रकाश पवार सांगतात.
 
प्रकाश पवार हे शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि राजकीय अभ्यासक आहेत.
ते पुढे सांगतात, "भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विचारधारेशी बांधील असलेले, संघर्ष करणारे असे अत्यंत कमी नेते बहुजन समाजाला निर्माण करता आले. त्यामुळे सध्याच्या पक्षांतराला पेव फुटलं आहे, खरंतर हे बहुजन समाजाचं अपयश आहे. उच्च वर्गातील लोक लढतात ते पद्धतशीरपणे इतर वर्गाचा वापर करून घेतात.
 
नव्वदीच्या दशकानंतर राजकारणाची समीकरणं बदलली. मागच्या वीस ते पंचवीस वर्षांचा विचार केला तर देशात भाजप तीनवेळा आणि काँग्रेस दोनवेळा सत्तेत आली. त्याचप्रमाणे राज्यात ही 95 पासूनचा विचार केला तर समान पातळीवर दोन्ही बाजूच्या पक्षांना संधी मिळाली आहे."
 
"काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता भोगली मात्र ऐनवेळी ते त्यांना सोडून जात आहेत. यातील अनेक नेत्यांना चांगला जनाधार आहे. पण त्यांच्या पूर्वीच्या पक्षाला आता जनाधार नाही. त्यामुळे अस्तित्व टिकवण्यासाठी सहाजिकच हे नेते पक्षांतर करण्याचा निर्णय घेतात. या परिस्थितीचा भाजप सेनेने चांगलाच फायदा करून घेतला आहे," असं प्रा. पवार सांगतात.
 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
"लोकसभा निवडणुकीच्या आधीपासून पश्चिम महाराष्ट्र भाजपचं लक्ष्य होतं. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला राज्यात इतरत्र चांगला प्रतिसाद मिळाला. पण मोदी लाटेतही राष्ट्रवादीनं पश्चिम महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली होती.
 
पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण उलथून टाकण्याची मोहीम भाजपने हाती घेतली. मोहिते पाटील आणि जोडीला विखे पाटील यांच्यामार्फत या राजकारणाची सुरूवात झाली. त्यांच्या मदतीने अनेकांना पक्षात ओढण्यात भाजप यशस्वी ठरला," असं ज्येष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांनी सांगितलं.
"मागच्या वेळी विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतिकूल परिस्थितीतही निवडून आले होते. तरी 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षानं त्यांना ताटकळत ठेवलं. निवृत्त आयएएस प्रभाकर देशमुख, दीपक साळुंखे यांनासुद्धा इच्छुक बनवून त्यांना मतदारसंघात फिरायला लावलं. त्यामुळे नाराज मोहिते पाटील भाजपात दाखल झाले.
 
त्यांच्याही पूर्वी माढ्याचे आमदार बबन शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना बळ देण्याचा भाजपने प्रयत्न केला होता. पण नंतरच्या राजकीय डावपेचांमध्ये मोहिते पाटील यांना भाजपमध्ये घेण्यात त्यांना यश आलं."
 
"महाराष्ट्रातील राजकीय घराण्यांमध्ये मोहिते पाटील घराण्याचं स्थान मोठं मानलं जातं. भोसले, नाईक-निंबाळकर यांच्यासह इतरांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांना घेऊन भाजपनं मोठा डाव खेळला. भाजपमध्ये गेल्यानंतर मोहिते पाटलांनीही गंभीरपणे राजकारण केलं. पवारांचं प्रस्थ संपवण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न केले.
 
रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा लोकसभेत विजय मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आता अधिक जोमाने ते भाजपसाठी प्रयत्न करत आहेत. आणखी काही नेतेही भाजपच्या वाटेवर आहेत. कदाचित स्वबळावर लढू शकतात इतकी त्यांची ताकद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे," असं मुजावर यांनी सांगितलं.
 
"राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांना दणका दिल्याशिवाय काहीच शक्य नसल्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यामुळेच पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीसह सांगली, सातारा सोलापूर या भागात भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं खच्चीकरण केलं. पण राष्ट्रवादी टिकून होती.
 
त्यामुळेच या पक्षातील नेत्यांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्याच नेत्यांना सोबत घेऊन अजित पवार, जयंत पाटील यांना थेट आव्हान देण्याची भाजप-सेनेची रणनिती आहे," असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात.
 
गटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका
एजाजहुसेन मुजावर पुढे सांगतात, "करमाळ्याच्या रश्मी बागल म्हणजेच राष्ट्रवादी असं समीकरण होतं. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे म्हटलं जात होतं, पण परिचारक गेल्यानंतर तिथं त्यांच्या पक्षाला फटका बसला. माळशिरसमध्ये मोहिते पाटलांनी पारडं पलटवलं आहे."
संजय शिंदे, बबन शिंदे, दिलीप सोपल, परिचारक असे गट इथं कार्यरत आहेत. एकूणच या भागात गटा-तटांचं राजकारण पाहायला मिळतं. नेत्यांनी पक्षवाढीपेक्षाही आपल्या गटाचं बळ वाढवण्यासाठी राजकारण केलं. मतदारही त्यांच्या गटांनाच मतदान करतात. त्यामुळे भाजपने याचा चांगला अभ्यास करून त्यांना हाताशी धरलं आणि या भागात चंचुप्रवेश केला."
 
सहकार-असहकार
"सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखान्यांचा, सहकार क्षेत्राचा आणि संस्थांचं राजकारण असलेला पट्टा आहे. यापूर्वी या क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड होती. विधानसभेला कारखान्यांचे ऊस उत्पादक शेतकरी महत्त्वाचे असतात. हे मतदानावरती प्रभाव पाडतात.
 
त्यांना खूश ठेवायचं असेल तर त्यांना योग्य दर देणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारकडून पॅकेज मिळवणं तसंच सत्तेचा लाभ घेणं यांसारख्या बाबींसाठी नेते पक्ष बदलण्याचा निर्णय घेतात, विशेष म्हणजे सध्या पक्षांतर करणारे बहुतांश नेतेही सहकार क्षेत्रातील जोडलेले आहेत. आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांना सत्तेची गरज आहे. भाजप सेनेने या गोष्टी हेरल्या. त्यांच्यावर विशेष नजर ठेवून पक्षात प्रवेश करण्यास त्यामुळे या गोष्टीचा वापर करून घेतला जात आहे," असं अद्वैत मेहता सांगतात.
 
'प्लॅन बी'ची तयारी
"राजकारणात सत्ता राखणं हेच अंतिम ध्येय असतं. सध्या दोन्ही पक्ष युती होणार असं सांगत असले तरी पुढे काय होईल याची शाश्वती नाही. त्यामुळे दोन्ही पक्ष अप्रत्यक्षपणे स्वबळाची तयारी करत आहेत. शिवसेना मागच्या निवडणुकीवेळी गाफील राहिली होती. त्याचा त्यांना फटका बसला. गेल्या काही काळापासून भाजपचं राजकारण पाहून शिवसेनेनं ही सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वत्र पक्षप्रवेश करून घेण्यावर भर दिला आहे," मुजावर सांगतात.
मुजावर पुढे सांगतात, "भाजपला कोणत्याही परिस्थितीत विजयी उमेदवारांची संख्या वाढवायची आहे. त्यामुळे त्यांनी सातत्याने पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. गेल्या तीन महिन्यात भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांची संख्या जास्त होती. पण शिवसेनेलासुद्धा ही गोष्ट लक्षात आली.
 
युती तुटल्यास आवश्यक असणाऱ्या तयारीच्या दृष्टीकोनातून दोन्ही पक्षांमध्ये प्रवेश करून घेण्याची स्पर्धा लागली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत युती तुटली तरी आश्चर्य वाटायला नको," असं ज्येष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर सांगतात.
 
"पक्षांतर करताना नेते युतीतील विधानसभेचं जागावाटप प्रामुख्याने लक्षात घेत आहेत. युती झाली किंवा नाही झाली तरी आपली जागा सेफ ठेवण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. पण या मेगाभरतीमुळे भाजप शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा तिढा वाढू शकतो.
 
जिंकलेल्या जागा सोडून फिफ्टी फिफ्टी हिशोबाने इतर जागांची वाटणी करणं तारेवरची कसरत ठरणार आहे. त्यामुळे समजा जागांवरून युती तुटली तर स्वबळावर लढण्याची वेळ आली तर 'निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार' आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी ही रस्सीखेच सुरू आहे," मेहता सांगतात.
 
सत्तेशिवाय न राहण्याची मानसिकता
"साधारणपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी अनेक वर्षे सत्ता भोगल्यामुळे ते सत्तेवाचून जास्त वेळ राहू शकत नाहीत. हे नेते प्रामुख्याने कारखाने, संस्था यांच्या प्रमुख पदांवर आहेत. या संस्था सत्तेशिवाय चालवणं शक्य नसतं. विरोधात असलेल्या नेत्यांना दाबायचं, फक्त आपल्या पक्षातल्या नेत्यांना बळ द्यायचं हे धोरण सत्ताधारी पक्षांचं असतं.
यावेळीसुद्धा हवा भाजप-सेनेच्याच बाजूने आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत दोन्ही पक्षच सत्तेत येतील हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मान्य केलं आहे. विरोधात असल्यानंतर गळचेपी होते. सत्तेवाचून हे नेते फारकाळ राहू शकत नाहीत," असं मेहता सांगतात.
 
"युतीतील जागांचा विचार करूनच हे नेते पक्षांतर करत आहेत. तसंच यात स्थानिक राजकारणाचाही भाग आहे. लाटेमुळे समोरचा विरोधक भाजप-सेनेत जाण्याची चिन्ह दिसत असल्यास त्याच्या आधी मीच या पक्षांमध्ये जातो, असं म्हणत नेते राजकीय डावपेच खेळत आहेत.
 
"2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर अनेकजणांना भाजप 2004 प्रमाणे एकच टर्म सत्तेत राहील असं या नेत्यांना वाटलं होतं. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. लोकसभेनंतर त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांच्या पक्षाला रामराम ठोकला आहे," असं मेहता यांनी सांगितलं.
 
भाजपसमोर धोका
प्रकाश पवार सांगतात, "पक्षवाढ, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड देण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली असल्याचं स्पष्ट आहे. पण सत्ता राखण्यासाठी घेतलेली ही मेगाभरती अंगलटसुद्धा येऊ शकते. सत्तेच्या आजूबाजूला राहण्यात धन्य मानणाऱ्या मानसिकतेचे लोक पक्षात आल्याचा भाजपला फटका बसू शकतो."
 
"काँग्रेस सिस्टीम अशा लोकांनीच संपवली. हेच भाजपसोबतसुद्धा घडू शकतं. हे लोक भाजपची व्यवस्था मोडून टाकू शकतील. पण हे परिणाम इतक्या लवकर दिसून येणार नाहीत. याला काही अवधी लागेल. काळानुसारच याची उत्तरं मिळतील," असं प्रकाश पवार सांगतात.