शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (20:31 IST)

विक्रम गोखले- देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं या मतावर मी अजूनही ठाम

देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं हे आजही माझं प्रामाणिक मत आहे, आणि ती भूमिका बदलणार नसल्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी म्हटलं.
अभिनेत्री कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं होतं. 75 व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राह्मण महासंघाच्यावतीने विक्रम गोखले यांचा सत्कार करण्यात आला होता.
त्यावेळी बोलताना विक्रम गोखलेंनी म्हटलं होतं, "कंगना राणावत जे म्हणाली आहे ते खरं आहे. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही."
विक्रम गोखले यांच्या या वक्तव्यावरून नव्या वादाला सुरूवात झाली.
आज (19 नोव्हेंबर) विक्रम गोखलेंनी पत्रकार परिषद घेत आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं म्हटलं.
मी या विषयावर जे बोललो ते मूळ भाषण व्यवस्थित न दाखवता माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असंदेखील विक्रम गोखले यावेळी पत्रकार परिषदेत म्हणाले.
मात्र, या मतावर समर्थक आणि विरोधकांत वाद सुरू झाला आहे. त्यामुळं माझ्या बाजूनं हा वाद संपवण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचंही ते म्हणाले.
गोखले यांनी यावेळी धर्मनिरपेक्षता आणि शिवसेना-भाजप युती अशा विषयांवरही अत्यंत थेटपणे मते मांडली.
'एका व्यक्तीलाच श्रेय कसं?'
विक्रम गोखले यांनी कंगनाची पाठराखण केली त्या भाषणाचा मतितार्थ समजून घेतला नाही, अशी नाराजी व्यक्त केली. तसंच त्यांचा नेमका आक्षेप कशावर आहे, हेही ते स्पष्टपणे बोलले.
''दे दी हमे आझादी बिना खड्ग बिना ढाल.." असं म्हणत असताना ज्यांनी स्वातंत्र्यासाठी प्राण दिले, फासावर लटकले, ब्रिटिशांना गोळया घातल्या, त्यांची अवहेलना झाली याबाबत आपल्याला शरम कशी वाटत नाही. त्यामुळंच माझा संताप झाला," असं विक्रम गोखले यांनी यावेळी म्हटलं.
माझ्या वक्तव्यानंतर समर्थक आणि विरोधक असा गदारोळ सुरू झाला आहे. मात्र, मला माझ्या बाजूने हा वाद संपवायचा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सध्याला अश्रू ढाळणारे जे स्वातंत्र्यसैनिक आहेत, त्यांचे शिव्याशाप मला मिळाले. मात्र मी कोणत्याही स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला नाही, असं विक्रम गोखलेंनी सांगितलं.
2014 च्या वक्तव्यावर ठाम
कंगनाची भाषणं ही तिची वैयक्तिक मतं आहेत. स्वातंत्र्याबाबतच्या वक्तव्याला तिची कारणं असू शकतात. आणि त्याला मी दुजोरा दिला त्याला माझी स्वतःची कारणं असू शकतात, असं गोखले म्हणाले.
एखाद्याच्या वक्तव्याची दखल घेऊन त्यावर बोलणं आणि मत मांडणं हा माझा अधिकार आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
18 मे 2014 रोजी भारत देशानं जागतिक राजकीय पटलावर नव्यानं उभं राहायला सुरुवात केली त्याचा अभिमान असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.
18 मे 2014 रोजीचं 'गार्डियन' वृत्तपत्र सगळ्यांनी वाचावं. त्यात जे आहे, तेच कंगना बोलली. माझ्याकडे त्याची कॉपीही आहे. त्यामुळं कंगना चूक बोलली नाही असं म्हणाल्याचं विक्रम गोखलेंनी सांगितलं.
भगव्यासंबंधी वक्तव्याबाबत काय म्हणाले?
"हा देश भगवाच राहील असं वक्तव्य मी केलं होतं. धर्मनिरपेक्षतेवर माझा विश्वास आहे. त्याची एक स्वतंत्र संकल्पना आहे. कारण धर्म ही घाणच आहे. तो बाजूला ठेवून समाजात सुसंवाद असावा अशी माझी अपेक्षा असते. पण इंग्रजीतील 'सुडो सेक्युलॅरिझमवर माझा विश्वास नाही," असं त्यांनी सांगितलं.
बंगल्याच्या सीमेपलिकडे सेक्युलॅरिझम ठीक आहे, पण घरात नाही. जात पात धर्मानं देश पोखरला आहे. पण भारतानं जी सो कॉल्ड धर्मनिरपेक्षता जोपासण्याचं नाटक केलं आहे, त्यावर संताप असल्याचं ते म्हणाले.
यावेळी मी कोणत्याही एका पक्षाशी बांधील नाही, असं त्यांनी यावेळी म्हटलं. तसंच देशासाठी कुणी काहीतरी करत असेल, तर त्याविरोधात असुरक्षित वाटल्याने सगळे राजकीय पक्ष एकत्रित येतात, अशी टीकाही गोखले यांनी केली.
'शिवसेना-भाजप युती ही गरज'
विक्रम गोखले यांनी यावेळी राज्यातील तुटलेल्या भाजप शिवसेना युतीबाबतही वक्तव्य केलं. भाजप आणि शिवसेना यांनी पुन्हा एकत्र यावे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि त्याची गरज आहे, असं ते म्हणाले.
या दोन्ही पक्षांमध्ये मोठे नेते होऊन गेले आहेत. या दोन्ही पक्षांनी ध्येयानं राज्यात काम सुरू केलं होतं. या पक्षांवर एकत्रितरित्या आम्ही विश्वास टाकला होता. पण आमचा विश्वासघात झाला, असं ते म्हणाले.
मी काय या दोन्ही पक्षांना पाठिंबा देत आलो आहे. माझे नातेवाईक या पक्षात राहिलेले आहे. मी दोन्ही पक्षातील लोकांशी बोललो आहे. दोघांचीही चूक झाल्याचं सांगितलं आहे, असं गोखले यांनी यावेळी म्हटलं.
त्यामुळं या समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं, असं यावेळी गोखले म्हणाले.