1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified बुधवार, 15 मे 2019 (17:42 IST)

साखळी बॉम्बस्फोटांनंतर श्रीलंकेत मुस्लिमांविरोधात हिंसाचार

- रंजन अरूण प्रसाथ
श्रीलंकेत 21 एप्रिल रोजी इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये जवळपास अडिचशे लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर श्रीलंकेत मुस्लीम विरुद्ध इतर धर्मीय असा वाद उफाळून आला आहे.
 
मुस्लिमांवर सतत हल्ले सुरू आहेत. पुट्टलम, कुरुनेगाला आणि गाम्पाह या जिल्ह्यांमध्ये 13 मे रोजी मुस्लिमांवर हल्ले करण्यात आले.
 
या भागातल्या अनेक मुस्लीमबहुल गावांना लक्ष्य करण्यात आलं आहे. श्रीलंकेतल्या पुत्तलायम जिल्ह्यातल्या नत्तानांदिया-दुन्मेत्रा या गावातही हिंसाचार उफाळला होता.
 
बीबीसी तमिळच्या प्रतिनिधीने या गावाला भेट दिली. या गावात तामिळ भाषिक मुस्लिमांची संख्या मोठी असली तरी गावाच्या आसपासच्या भागात सिंहली लोक मोठ्या प्रमाणात राहतात.
 
दुन्मेत्रामधल्या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सोमवारी जवळपास शंभरएक माणसं चेहऱ्यावर मुखवटे घालून गावात शिरली. निशार नावाच्या तरुणाने बीबीसी तमिळच्या प्रतिनिधीला सांगितलं की, काहीतरी घडणार याची चाहुल लागल्याने गावातले तरूण हल्लेखोरांचा सामना करण्यासाठी एकत्र जमले.
 
त्याने सांगितलं की मुखवटे घातलेले ते सर्वजण शॉर्ट कट घेऊन गावात घुसले होते.
 
"या हल्लेखोरांनी सर्वांत आधी मशिदीला लक्ष्य केलं आणि त्यानंतर आसपासची घरं आणि दुकानांवर हल्ला चढवला," तो तरुण सांगत होता. "आमचे लोक उपवास सोडण्याच्या तयारीत होते. त्यावेळी हा हल्ला करण्यात आला."
 
"हल्ला झाल्याचं गावातल्या महिलांना कळलं तेव्हा त्यांनी जवळच्याच जंगलात पळ काढला. त्या रात्रभर जंगलातच थांबल्या आणि दुसऱ्या दिवशी दिवस उजाडल्यानतंरच गावात परतल्या."
 
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी गावातली मशीद, मुस्लिमांची घरं आणि त्यांच्या दुकानांना लक्ष्य केलं. काही घरांना पेट्रोल बॉम्ब टाकून पेटवून देण्यात आलं. मुस्लिमांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या कुराण शरिफच्या काही प्रतीही त्यांनी जाळल्याचं लोकांना वाटतंय.
 
त्या भीषण हल्ल्याच्या खुणा गावात सगळीकडे दिसत होत्या. पेटवलेल्या गाड्या, घरं आम्ही बघितली.
 
सुरक्षा जवानांच्या मदतीनेच हा हल्ला करण्यात आल्याचा निशारचा आरोप आहे. अधिकारी कर्तव्यावर असताना काही ठिकाणी आगी लावण्यात आल्याचं तो सांगतो.
 
तो म्हणतो, "लष्करी जवानांवरचा आमचा विश्वास उडाला आहे."
 
दरम्यान, लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमीत अटापट्टू यांनी बीबीसीला सांगितलं, "बेकायदा कृत्यांसाठी लष्कराचे जवान मदत करत असतील तर हा खूप मोठा गुन्हा आहे. आम्ही लष्कर प्रमुखांचा सल्ला घेतला आहे. 'मुस्लिमांची घरं आणि दुकानं' यांना लक्ष्य करून करण्यात आलेला हा हल्ला आणि या हल्ल्यामागे सुरक्षा जवानांचा हात आहे का, याचा तपास सुरू आहे."
 
या हल्ल्यात सुरक्षा जवानांकडून काही चूक किंवा गुन्हा घडला आहे का, याची लोकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
 
दरम्यान, नत्तांदियाच्या गावकऱ्यांनी आता सरकारने जातीने लक्ष घालून सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.