सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 4 मार्च 2021 (16:13 IST)

म्यानमारमध्ये हिंसाचार, एका दिवसात 38 लोकांचा मृत्यू

म्यानमारमधील हिंसाचार अजूनही सुरूच आहे. बुधवारी घडलेल्या घटनांमुळे या दिवसाचं वर्णन संयुक्त राष्ट्रांनी ब्लडिएस्ट डे असं केलं आहे. संयुक्त राष्ट्राचे म्यानमारमधील राजदूत क्रिस्टिन श्रेनर म्हणाले, 'संपूर्ण देशातून हृदय हेलावून टाकणारी दृश्यं समोर येत आहे. सुरक्षा दलं थेट गोळीबार करत असल्याचं दिसत आहे.'
 
म्यानमारमध्ये एक फेब्रुवारी रोजी झालेल्या उठावाला विरोध केला जात आहे. आंग सान सू ची तसेच इतर नेत्यांना मुक्त करावे अशी मागणी हे आंदोलक करत आहे. या सर्व नेत्यांना सत्तेतून पदच्युत करुन त्यांना कारागृहात डांबण्यात आलं आहे.
 
थेट गोळीबाराला सुरुवात
क्रिस्टिन श्रेनर यांच्या म्हणण्यानुसार सत्तापालट झाल्यापासून आतापर्यंत 50 लोकांचे प्राण गेले आहेत. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. ते म्हणाले, "एका व्हीडिओत पोलीस आरोग्य दलाच्या निःशस्त्र लोकांना मारताना दिसत आहेत. एका दृश्यात आंदोलकाला गोळी मारल्याचं दिसत आहे, हे सगळं भर रस्त्यात घडल्याचं दिसतं."
 
ते पुढे म्हणाले, "मी काही शस्त्रज्ज्ञांशी चर्चा करुन या शस्त्रांची ओळख पटवण्यास सांगितलं आहे. पोलिसांकडे असणारं हत्यारं 9 एमएम सबमशीन गन आहे की लाइव्ह बुलेट हे स्पष्ट झालेलं नाही."
 
सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेच्या मते बुधवारी मारल्या गेलेल्या लोकांमध्ये 14 आणि 17 वर्षांचे दोन मुलगे आहेत आणि एक 19 वर्षांची मुलगी आहे. रॉयटर्सच्या स्थानिक पत्रकाराच्या माहितीनुसार म्यानमारच्या मोन्यवामध्ये झालेल्या आंदोलनात 6 लोकांचे प्राण गेले असून 30 लोक जखमी झाले आहेत.
 
एएफपी वृत्तसंस्थेला एका आरोग्य स्वयंसेवकाने सांगितले की, 'मयींग्यानमध्ये किमान 10 लोक जखमी झाले असावेत'. त्यांच्यामते, 'लष्कर अश्रूधुराचे गोळे, रबरी बुलेट्स, लाइव्ह बुलेट्सचा वापर करत आहे'. तसेच या शहरातल्या एका आंदोलकाने रॉयटर्सला सांगितले की' 'लष्कर पाण्याचा फवारा मारुन लोकांना हाकलत नाहीत किंवा सूचनाही देत नाहीत, थेट गोळ्या झाडत आहेत.'
 
मंडाले इथं झालेल्या आंदोलनातील एका विद्यार्थ्याने बीबीसीला सांगितले, त्याच्याजवळच्या आंदोलकांच्या यात मृत्यू झाला आहे. तो म्हणाला, 'माझ्यामते 10 किंवा साडेदहाची वेळ असावी. तेव्हा पोलीस आणि सैनिक आले आणि त्यांनी हिंसक पद्धतीने लोकांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली.'
 
यावर लष्कराकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
 
क्रिस्टिन श्रेनर म्हणाले की संयुक्त राष्ट्राने लष्करी अधिकारांच्याविरोधात कडक निर्णय घेतला पाहिजे. पोप फ्रान्सिस यांनी हिंसेऐवजी संवादाचा मार्ग निवडला पाहिजे असं सुचवलं आहे. म्यानमारवर शेजारील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी विशेष बैठक आयोजित केली आहे.
 
सू ची यांच्या समर्थकांकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्यांची सुटका करण्याची मागणी होतेय. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी पार्टी या पक्षाने घवघवीत यश मिळवलं होतं. हा निकाल लष्करानेही मान्य करावा आणि सू ची यांची सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
 
नोंदणी न केलेला वॉकी-टॉकी बाळगणे आणि कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेले नियम तोडणे, या प्रकरणांमध्ये आँग सान सू ची यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरू आहे.