सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Updated : गुरूवार, 4 मार्च 2021 (09:40 IST)

महाशिवरात्री विशेष 2021 : "शिवाची आराधना करण्याचा दिवस "

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्र असे म्हटले जाते. या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात. हा हिंदूंचा मोठा सण म्हणून साजरा करतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि आराधना करतात. या दिवशी बेलाची पाने महादेवाला वाहतात. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र, दही लावून शिवलिंगाचे अभिषेक केले जाते. नंतर पंचामृताने या मध्ये दूध, तूप, दही, साखर, मध ह्याचा समावेश असतो त्याने शिवलिंगावर लेप करतात. धोत्र्याची पाने, बेलाची पाने, पांढरे फुले वाहून महादेवाची पूजा करतात.    
 
भारताच्या विविध राज्यात पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. दक्षिण भारतात महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी एकभुक्त उपवास केला जातो. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतात. कमळ अर्पुनी खिरीचा नैवेद्य दाखवतात. बेलाची पाने, तीळ घातलेला भाताचा नैवेद्य, ऋगवेदाची काही सूक्ते पठण करतात.  
 
काश्मीर मध्ये या दरम्यान बर्फ पडतो हे पवित्र मानले जाते. भक्त दिवसभर दर्शनासाठी येतात. अक्रोड, कमळाची फुले यांचे महत्त्व आहे.
 
*आख्यायिका - 
या मागे अशी आख्यायिका आहे की या दिवशी भगवान शंकराने तांडवनृत्य केले होते. या संदर्भात एक कथा देखील प्रचलित आहे.
एक शिकारी होता.तो शिकार करून आपल्या कुटुंबाचे पालन करत होता. एके रात्री शिकारी शिकार करण्यासाठी गेला आणि झाडावर चढून बसला. ते  बेलाचे झाड होते  त्या झाडाच्या खाली शिवलिंग होते. नकळत त्याच्या हातून काही पाने त्या शिवलिंगावर पडली. पहाटे पहाटे त्याला एक हरीण येताना दिसले तो शिकारी त्या हरिणावर नेम धरणार त्यावर तो हरीण म्हणाला की मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो. हरिणाने घरी गेल्यावर घडलेले सांगितले आणि मला जावे लागणार असे म्हटले. त्यावर त्याच्या समवेत सर्व कुटुंब देखील आले आणि त्या शिकारीला म्हणाले की हवं तर मला मार पण त्याला सोडून दे. हे बघून त्या शिकारीला खूपच आश्चर्य झाले त्याला त्या हरिणाच्या कुटुंबाची दया आली आणि त्याने हरिणाच्या सर्व कुटुंबाला मोकळे केले. नंतर शिकारीने शिकार करणे कायमचे सोडले आणि त्याचा कडून नकळत त्या रात्री उपवास घडला आणि शिवलिंगावर बेलाचे पाने वाहून पूजा झाली. त्यामुळे त्याला पुण्य लाभले. हा शिकारी आजतायगत आकाशात दिसतो अशी आख्यायिका आहे.
अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी जो माणूस दया दाखवून शिवाची उपासना करतो त्याला मोक्ष मिळतो. भोळे शंकर आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करणारे आहेत. हा दिवस संपूर्ण भारतात उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. मंदिरात रोषणाई केली जाते. या दिवशी शंकराची मनापासून पूजा करून सर्व कष्ट आणि त्रास दूर करावे अशी मागणी करावी. शंकराला मनापासून आळवल्यावर ते नक्कीच ऐकतात आणि भक्तांना आपला आशीर्वाद देतात.