शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (17:38 IST)

विशाल गर्गः झूम मीटिंगमध्ये 900 जणांना नोकरीवरुन काढणारे सीईओ कोण आहेत?

झूम मीटिंगच्या माध्यमातून 900 लोकांना कामावरून कमी करणारा अमेरिकेच्या कंपनीचा प्रमुख सोशल मीडियावर चर्चेत आहे.
 
"तुम्ही या झूम कॉलचा भाग असाल तर तुम्ही त्या दुर्देवी लोकांपैकी एक आहात ज्यांना कामावरून कमी केलं जात आहे", असं बेटर.कॉम या मॉर्गेज फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गर्ग यांनी म्हटलं. या मीटिंगचा व्हीडिओ थोड्यावेळाने सोशल मीडियावर अपलोड झाला आणि काही तासात व्हायरल झाला.
 
'भयंकर, काहीही, अतिशय कठोर' अशा शब्दांमध्ये लोकांनी या निर्णय घेणाऱ्या कंपनीवर टीका केली.
 
याआधी जेव्हा मी असा निर्णय घेतला तेव्हा मी रडलो होतो, असं गर्ग यांनी कर्मचाऱ्यांना त्या झूम मीटिंगमध्ये सांगितलं. या मीटिंगमध्ये तसं घडू नये असं मला वाटत होतं. हे खोटं ठरावं असंही वाटत होतं. हे म्हणताना गर्ग यांचा आवाज संयमित होता. त्यांनी त्यांच्यासमोरच्या नोट्स हातात घेतल्या.
 
कर्मचाऱ्यांची कामगिरी, उत्पादकता आणि मार्केटमधील बदल यामुळे बेटर.कॉम कंपनीला 15 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करावं लागत आहे.
 
कंपनीला गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांकडून 750 दशलक्ष डॉलर्सची मदत मिळाल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितलं नाही.
 
कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणं आणि ते सांगणं अतिशय क्लेशदायक असतं आणि विशेषत: या महिन्यात असं बेटर.कॉमचे मुख्य वित्तीय अधिकारी केव्हिन रायन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
ताळेबंद चोख असणं तसंच लक्ष्यकेंद्रित कर्मचारी पटावर असणं हे कंपनीच्या वाटचालीसाठी आवश्यक होतं असं त्यांनी सांगितलं.
 
या बैठकीनंतर गर्ग यांनी निनावी ब्लॉगपोस्ट लिहिल्याचं फॉर्च्युन मासिकाने म्हटलं आहे. कमी करण्यात आलेले कर्मचारी कामाप्रती निष्ठावान नव्हते. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे ग्राहक दुसऱ्या कंपन्यांकडे वळले. जेमतेम दोन तास काम करून ही मंडळी आठ तास काम करत असल्याचं भासवत असत असं गर्ग यांनी म्हटलं आहे.
 
घरखरेदी प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या साह्याने अधिक वेगवान आणि सुलभ करण्याचा बेटर.कॉमचा उद्देश आहे. जपानमधील बलाढ्य कंपनी सॉफ्टबँकचाही या कंपनीत सहभाग आहे. बेटर.कॉमचं मूल्यांकन 6 अब्ज डॉलर्स एवढं आहे.
 
गर्ग यांच्या कार्यपद्धतीवर याआधीही टीका झाली आहे. फोर्ब्स मासिकाने गेल्या वर्षी मिळवलेल्या गर्ग यांच्या इमेलमधील भाषा अशी आहे.
 
'तुम्ही कामात अतिशय संथ आहात. निवांत पहुडलेल्या डॉल्फिनप्रमाणे तुमचं काम चालतं. काम थांबवा. तत्क्षणी काम थांबवा. तुम्ही मला ओशाळं करून टाकलं आहे.'
 
एखाद्या कंपनीच्या अधिकारपदी असलेल्या व्यक्तीची वागण्याची ही पद्धत नव्हे असं लिव्हरपूल जॉन मूर्स विद्यापीठातील रोजगार कायदा आणि व्यापार याच्या प्राध्यापक जेमा डेल यांनी म्हटलं आहे.
 
इतक्या घाऊक प्रमाणावर लोकांना कामावरून कमी करणं युकेत तरी बेकायदेशीर ठरलं असतं असं त्या म्हणाल्या.
 
"अमेरिकेत हे चाललं म्हणजे जगभरात अन्यत्र खपवून घेतलं जाणार नाही. या गोष्टीची एक पद्धत असते. कठीण परिस्थितीही चांगल्या पद्धतीने हाताळता येते"
 
"अशा पद्धतीने वागून तुम्ही कर्मचाऱ्यांना दुखावत आहात तसंच कंपनीचंही नुकसान करत आहात. कर्मचाऱ्यांना कशा प्रकारची वागणूक मिळते हे बेटर.कॉमच्या कर्मचाऱ्यांना कळलं आहे. भविष्यात अशी वागणूक आपल्यालाही मिळू शकते याचा अंदाज त्यांना आला असेल", असं त्या म्हणाल्या.
 
"कार्यक्षमता दाखवू न शकणाऱ्या लोकांशी कसं बोलायचं याची एक पद्धत असते. समाधानकारक काम होत नसेल तर कारवाई करण्याचा अधिकार कंपनीला असतो. पण तसं करताना वागण्याची कायदेशीरदृष्ट्या आणि नैतिकदृष्टया एक पद्धत असते", असं त्यांनी सांगितलं.