शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (17:33 IST)

बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर कोसळलं, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उद्या देऊ शकतात निवेदन

तामिळनाडूच्या कुन्नुर या ठिकाणी लष्कराच्या हेलकॉप्टरला अपघात झाला, या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हे होते असं भारतीय वायूसेनेने सांगितले आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यांपैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दोघा जणांची प्रकृती गंभीर आहे. तामीळनाडूचे मंत्री रामचंद्रन यांनी घटनास्थळी पोहोचल्यानंतर ही माहिती दिली.
रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या असं सांगितलं जात आहे.
स्थानिक सैन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांनी 80 टक्के भाजलेल्या दोन व्यक्तींचे देह रुग्णालयात पोहोचवल्याचे सांगण्याच येत आहे. काही देह पर्वताच्या उतारावर पडल्याचे दिसून येत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे व ओळख पटवण्याचे काम सुरू आहे असं एएनआयच्या सूत्रांनी सांगितले आहे.
घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.
हेलिकॉप्टर क्रॅश तामिळनाडूमधील नीलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरमध्ये झालं. हेलिकॉप्टर सुलुर आर्मी बेसवरून निघालं होतं. जनरल रावत यांना घेऊन हे हेलिकॉप्टप वेलिंग्टन लष्करी छावणीच्या दिशेने जात होतं.
जनरल रावत हे एक जानेवारी 2020 मध्ये देशाचे पहिले चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह संसदेत लवकरच यासंबंधी माहिती देणार असल्याचं समजतं. ऑल इंडिया रेडिओने यासंदर्भात ट्वीटरवरुन माहिती दिली आहे.
राजनाथ सिंह यांनी काही वेळापूर्वी जनरल रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या नातेवाईकांचीही भेट घेतली.
 
रावत यांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी ही घटना धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो असंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेस नेते राहुल नेते यांनीही ट्वीटरवर काळजी व्यक्त केली. ते म्हणाले, "चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि इतर प्रवाशांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी मी प्रार्थना करतो.
 
राजभवनातील कार्यक्रम रद्द
दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजभवन येथे होणारा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना राजभवनाचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर यांनी सांगितलं, "कार्यक्रमस्थळी येऊन राज्यपालकांनी माहिती दिली की दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर असा कार्यक्रम करणं योग्य ठरणार नाही. हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. राष्ट्रपती या कार्यक्रमासाठी येणार होते." आज (8 डिसेंबर) संध्याकाळी 4 वाजता मुंबईत राजभवन येथे नवीन दलबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार होते.