शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2020 (15:37 IST)

कोरोना लॉकडाऊन: हनिमूनसाठी मेक्सिकोला गेले नि लॉकडाऊनमुळे मालदिवमध्ये अडकून पडले

सिकंदर किरमानी
इजिप्तची राजधानी कैरोमध्ये 6 मार्च रोजी झालेल्या एका लग्नापासून ही कहाणी सुरू होते.
 
दुबईमध्ये स्थायिक झालेले 36 वर्षांचे खालेद आणि 35 वर्षांच्या परी लग्नबंधनात अडकले. जवळपास आठ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते.
 
लग्नानंतर काही दिवसांनी दोघंही हनिमूनसाठी दुबईहून मेक्सिकोच्या कैनकुनला रवाना झाले. तोवर खरंतर कोरोना विषाणूची चर्चा सुरू झाली होती. मात्र जगभरात त्याचं थैमान सुरू झालेलं नव्हतं.
 
हनिमून साजरा करत असलेल्या खालेद आणि परी यांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची तशी फारशी काळजी नव्हती. पण गर्दीच्या ठिकाणी जाणं ते टाळू लागले.
 
मात्र लवकरच हे चित्र पालटेल आणि सगळं ठप्प होईल, असा विचारही त्यांनी केला नव्हता.
 
19 मार्च रोजी हे दोघे तुर्कीमार्गे UAEला परत येत असताना लॉकडाऊन सुरू झाला.
 
बीबीसीशी बोलताना परी म्हणाल्या, "आम्ही विमानात बसलो आणि तोवर इंटरनेटही सुरू होतं. त्यावेळी आमच्या मोबाईलवर अनेक मेसेजेस आले होते. तुम्ही दुबईला येऊ शकणार आहात का? नवीन नियम लागू झाले आहेत. बाहेरून येणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे."
 
पण दोघंही विमानात बसले होते. त्यामुळे त्यांना खात्री वाटत होती की ते दुबईला पोहोचतील. मात्र, इस्तंबुलला त्यांना कनेक्टिंग फ्लाईटमध्ये चढण्यापासून रोखण्यात आलं आणि तुम्ही जाऊ शकत नाही, असं स्पष्ट शब्दात सांगण्यात आलं.
 
मेक्सिकोहून त्यांचं विमान उडणार त्याचवेळी नवीन नियम लागू झाले होते. तुर्कीमध्येही निर्बंध लागू करण्यात आले होते, त्यामुळे या जोडप्याला शहरातही जाता येत नव्हतं. ते इस्तंबूल विमानतळावर अडकून पडले.
 
त्यांच्याकडे वैध बोर्डिंग पास नव्हता. त्यामुळे टॉयलेटरीज आणि कपडे घेण्यासाठीही त्यांना बराच संघर्ष करावा लागला. स्वतःचं सामानही ते घेऊ शकत नव्हते.
 
यूएईला ते जाऊ शकत नव्हते. इजिप्तच्या फ्लाईट रद्द झाल्या होत्या. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी त्यांना काहीतरी करावंच लागणार होतं.
परी सांगतात, "शेवटी आम्ही गुगलची मदत घ्यायचं ठरवलं. कुठल्या कुठल्या देशांमध्ये इजिप्तच्या नागरिकांना व्हिसाची गरज नाही, ते बघितलं. त्यानंतर अशा कुठल्या देशांच्या फ्लाईट्स सुरू आहेत, ते तपासलं आणि आम्हाला मालदीवचा पर्याय दिसला."
 
हिंद महासागरातलं हे बेट पांढरी वाळू आणी आकाशी रंगाच्या पाण्यासाठी जगप्रसिद्ध आहे. जगातल्या सर्वात सुंदर ठिकाणांपैकी हे एक. खालेद आणि परी यांनीसुद्धा हनिमूनसाठी मेक्सिकोनंतर मालदीवचाच पर्याय निवडला होता.
 
परी सांगत होत्या, "इमिग्रेशन काउंटरच्या आत गेलो तेव्हा आम्ही एकमेकांकडे पाहिलं. आम्हाला या गोष्टीचा आनंद होता की आता झोपण्यासाठी विमानतळावरच्या खुर्च्यां नाही तर बेड मिळणार आहे."
 
तर टेलिकॉम इंजीनिअर असलेले खालेद सांगत होते, "आमचं सामान बघूनही आम्हाला खूप आनंद झाला."
 
कुठे जायचं हे आता निश्चित झालं होतं. पण समोर नव्या अडचणी वाढून ठेवल्या होत्या.
 
प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या परी सांगात, "आर्थिक ओझं वाढत चालल्याचं आमच्या लक्षात येत होतं. आम्ही आमच्या नोकऱ्यांचाही विचार केलेला नव्हता. आम्ही आमचे लॅपटॉपही आणले नव्हते."
 
मालदीवमध्ये रिसॉर्टवर पोहोचल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मोजकेच पर्यटक दिसत होते आणि त्यातलेही बरेचसे पर्यटक आपापल्या देशांच्या फ्लाईट्स कधी सुरू होणार, याची वाट बघत होते. सर्व पर्यटक गेल्यावर हॉटेल बंद झालं. त्यामुळे दोघांना हॉटेल सोडावं लागलं आणि ते दुसऱ्या बेटावर दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. तिथेही असंच झालं.
 
मागचा पूर्ण महिना दोघांनीही मालदीव सरकारतर्फे ओलहुवेली बेटावरच्या एका रिसॉर्टमध्ये उभारण्यात आलेल्या स्पेशल आयसोलेशन सेंटरमध्ये घालवला.
 
हे सेंटर तुलनेने बरंच स्वस्त आहे. खालेद सांगतात, "आम्हाला चांगला अनुभव यावा, यासाठी ते त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम ठेवतात. रोज डीजे असतो."
 
या रिसॉर्टवर इतर 70 जण आहेत. ते सर्वही हनिमूनसाठी आले आहेत.
 
मालदिवमध्ये या घडीला 300च्या आसपास पर्यटक आहेत. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर मालदीवनेही आता बंदी घातली आहे.
मात्र, खालेद आणि परी दोघांनाही आता आपल्या घरी दुबईला परत जायचं आहे. मॉन्सूनमध्ये कोसळणारा पाऊस आणि रमजान महिन्यात रोजे असल्याने ते समुद्र किनाऱ्यांवर क्वचितच गेले.
 
मात्र, घरी परतणं एवढं सोपंही नाही. हे दोघंही दुबईला राहत असले तरी दुबईचे नागरिक नाहीत. त्यामुळे दुबईला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये त्यांना प्रवेश नाही.
 
इजिप्तला जाण्याचा पर्याय आहे. मालदिवमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना आणण्यासाठी इजिप्तने विशेष विमान सेवा सुरू केली आहे. मात्र त्या परिस्थितीत त्यांना 14 दिवस सरकारी क्वारंटाईनमध्ये रहावं लागणार आहे. पण असं केल्यावरही ते दुबईला जाऊ शकत नाहीत.
 
दोघंही UAEच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत आणि परत येण्याची परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण सध्यातरी विमानसेवा सुरू नाही.
 
परी सांगतात, "आम्ही जेव्हा ऐकतो की विमानसेवा सुरू करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, तेव्हा खूप ताण येतो. हॉटेल किंवा घरात क्वारंटाईन होण्याचीही आमची तयारी आहे."
 
दुसरीकडे त्यांच्या हनिमून ट्रिपचा खर्चही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोघांनीही कामाला सुरुवात केली आहे. पण वाय-फाय कनेक्ट करण्यात बऱ्याच अडचणी येत आहेत.
 
जगात अनेकजण मोठमोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. मात्र आमची अडचणही मोठी असल्याचं हे दोघं सांगतात.
 
खालेद सांगतात, "एखाद्या रिझॉर्टमध्ये तुम्ही शेवटचे पर्यटक असाल आणि सगळा स्टाफ तुम्हाला बाय करतो तेव्हा वाईट वाटतं. त्या स्टाफसाठीही खूप वाईट वाटतं. आमच्याबाबतीत असं दोन वेळा घडलं आहे. अशी ठिकाणं खरंतर पर्यटक आणि आनंदाच्या क्षणांनी भरलेली हवी. पण सध्या अशी परिस्थिती नाही."
 
परी सांगतात, "आम्ही जेव्हा सांगतो की आम्ही मालदिवमध्ये अडकलो आहोत तेव्हा बरेच जण हसतात आणि म्हणतात 'ही वाईट परिस्थिती आहे का?' मात्र, हे इतकं सोपं नाही. अडकून पडणं आनंददायी नाही. याचा ताण येतो. अशा कुठल्याही आनंदाऐवजी मला माझ्या कुटुंबीयांसोबत स्वतःच्या घरात राहायला जास्त आवडेल."
 
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेला खालिद आणि परी यांचा हनिमून मे संपत आला तरी संपलेला नाही आणि लॉकडाऊनने तर हा हनिमून न राहता तुरुंगवासच अधिक झाला आहे.