सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (17:29 IST)

आमच्या वाटेला आलं ते भोगलं, भुजबळ काय म्हणाले?

महाराष्ट्र सदनाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मुंबई सत्र न्यायालयाने छगन भुजबळ यांच्यासह सहा आरोपींना दोषमुक्त केलं आहे.
 
लाचलुचपत प्रतिबंधक (Anti corruption bureau/ACB) न्यायालयाकडे भुजबळ यांनी यासंदर्भात अर्ज दाखल केला होता.
 
आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचं सांगत दोषमुक्त करण्यात यावं मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती.
 
आज (9 सप्टेंबर) न्यायालयाने छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन प्रकरणात दोषमुक्त केल्याचं समोर आलं आहे. भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात महाराष्ट्र सदन कथित गैरव्यवहार प्रकरणी पुरावे असल्याचा एसीबीचा दावा होता.
 
महाराष्ट्र सदनाच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी पैसे घेण्यात आल्याचा दावा एसीबीने केला होता.
 
अंजली दमानिया यांनी याप्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
'निकालाविरोधात हायकोर्टात जाणार'
कोर्टाचा निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे. या निकालाविरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याचंही दमानिया यांनी सांगितलं. यासंदर्भात त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.
 
अशा इतर प्रकरणांमध्ये जिथे पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यावर आरोप होते अशा सुनावणीमध्ये राज्य सरकारचे वकील गैरहजर का राहतात? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
 
संयमितपणे हे स्वीकारत आहे, आमच्या वाटेला आलं ते भोगलं
सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, आम्हाला त्रास द्यायचंच असं ठरवण्यात आलं होतं. पण आम्ही संयमितपणे त्याचा स्वीकार केला. आम्हाला कुणाबद्दलही द्वेष नाही. आमच्या वाटेला आलं ते आम्ही भोगलं, अशी प्रतिक्रियामंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
 
कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत होते.
 
भुजबळ काय म्हणाले?
महाराष्ट्र सदन केस देशभर गाजली. फाईव्ह स्टार हॉटेलसारखे ते बांधले गेले. अंधेरीचे आरटीओ ऑफीसही सुंदर बांधले.
त्या कंत्राटदाराला 100 कोटी एफएसआय देवू म्हटले होते करारानुसार. परंतु आतापर्यंत एक पैशाचा एफएसआय त्याला दिलेला नाही. यातून आम्ही 800 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला. यातून मला व समीरला सव्वा दोन वर्षे तुरूंगात राहावे लागले.
आम्ही सत्र न्यायालयात अर्ज केला होता की आम्हाला यातून वगळण्यात यावे. यातून एक पैसा कुणाला मिळाला नाही. मला, समीर व इतर काही जणांना वगळण्यात आलंय.
त्रास द्यायचाच असं ठरवलं होते. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही.
संयमितपणे हे स्विकारत आहोत. कुणाबद्दलही द्वेष नाही. आमच्या वाटेला आले ते भोगले.
साजिशे लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिए, आपकी दुवा है.
उलगडा होण्याची सुरूवात झालीय. 8 खटले कशासाठी टाकले, त्रास देण्यासाठीच. न्यायदेवतेवर विश्वास आहे, वेळ लागेल. जे मूळ होते ते महाराष्ट्र सदन व इतर केसेस बांधल्या गेल्या.
मी जोरात बोलतो, म्हणून गप्प करावे असे वाटले असेल.
मुख्यम़ंत्री, शरद पवार यांची भेट घेवून माहिती दिली. त्यांचे आभार मानले.
समाधानाची झोप लागेल. पण काही लोक झोपू देणार नाहीत. पण कुणाला कुठं जायचं ते जाऊ शकतात.
तुरूंगात राहयला कुणाला आवडेल. केईएम रूग्णालयातील डॉक्टरांमुळं तेव्हा वाचलो. आता दु:खाचा पाढा वाचू.
तुमचा भुजबळ करू म्हणत होते. आता भुजबळांप्रमाणे सर्व निर्दोष ठरतील.
समय बडा बलवान होता है. कोर्टाने या केसमध्ये दोषमुक्त केले तर ईडीची केस यावरच आधारीत होती.
आम्ही दोघे आत. पंकजच्या मागे पोलिस लागलेले. घरचे रडत बसायचे. परंतु कितीवेळ दु:ख कवटाळून बसायचं? पुढच्या केसेसही लढाव्याच लागतील.
इतक्या जणांवर केसेस सुरू आहेत.राज्य सरकार काय करू शकते. वकीलच सर्व करू शकतात. न्यायदेवता सर्वोच्च आहे.
 
छगन भुजबळ यांचा आजवरचा प्रवास
मुंबईतल्या भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणारा एक तरुण बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी भारावून गेला होता. त्याची आई याच मार्केटमधल्या एका छोट्याशा दुकानात फळं विकत असे. हा कौटुंबिक व्यवसाय सोडून त्यानं राजकारणात उडी मारण्याचा निर्णय घेतला. या मेहनती तरुणाचं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ.
 
तेव्हा छगन VJTI कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते, पण तो त्यांनी अर्ध्यातच सोडला.
 
1985मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी, लीलाधर डाके या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबतच छगन भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं. बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती.
 
हा काळ होता शिवसेनेच्या आक्रमक वाढीचा. सेनेसोबतच भुजबळांचं राजकीय वजनही वाढू लागलं.
 
त्यांच्या तळगाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले. सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती, असं असं ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात.
 
वेषांतर करून गेले कुठे?
छगन भुजबळांना नाटक-सिनेमाची आवड होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातही नाट्य होतं, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात. 1986 मध्ये कर्नाटकमध्ये सीमाप्रश्न पेटला होता, त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजलं.
 
त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी होती. पण भुजबळ मात्र व्यापाऱ्याचा वेश करून बेळगावात अवतरले.
 
बुल्गानिन दाढी, डोक्यावर फेल्ट हॅट, पांढऱ्या रंगाचा कोट आणि हातात पाईप अशा वेशात कानडी पोलिसांना गुंगारा देऊन ते थेट बेळगावमधल्या एका ग्राउंडवर आले. त्यांनी तिथे भाषण ठोकून मराठी भाषिकांची मनं जिंकली. त्यातच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या या 'कामगिरी'नंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात त्यांचा सत्कारही केला होता.
'लखोबा लोखंडे'
शिवसेनेने 1989मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली. अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा, अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली होती. या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले.
 
शिवसेना सर्वांत मोठा विरोधी पक्ष होता. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं. त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले, असं भारतकुमार राऊत सांगतात.
 
मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी शरद पवार राज्यातले मोठे काँग्रेस नेते होते आणि भुजबळांना त्यांनीच काँग्रेसमध्ये आणलं, असं मानलं जातं.
 
तेव्हा संतापलेल्या बाळासाहेबांनी त्यांचं 'लखोबा लोखंडे' असं नामकरण केलं. (अनेक वेळा नाव बदलून अनेक महिलांशी लग्न करणारं लखोबा नावाचं 'तो मी नव्हेच' या नाटकातलं कुप्रसिद्ध पात्र आहे.)
 
"त्यावेळी शिवसेना सोडणं ही सोपी गोष्ट नव्हती. भुजबळांनी शिवसैनिकांचा रोष ओढावून घेतला होता. त्यांच्या बंगल्यावर तेव्हा हल्ला करण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्नही केला होता," असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.
 
'आर्मस्ट्राँग' भुजबळ
पुढे 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले.
 
मुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचं फर्मान जेव्हा त्यांच्या खात्याने काढलं, तेव्हा राजकीय वादळ निर्माण झालं होतं. पण कोर्टानं बाळासाहेबांना दिलासा दिला.
 
एव्हाना भुजबळ मुंबई सोडून त्यांचं मूळ असलेल्या नाशिक जिल्ह्यात परतले होते. मुंबईचा हा माजी महापौर विधानसभा निवडणुकीत मुंबईतून हरल्यामुळे आजोळी गेला होता. 1999ची निवडणूक ते येवल्यातून जिंकले.
 
"नाशिक जिल्ह्यात आल्यावर त्यांनी अनेक विकासाची कामं केली. नाशिक-मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण केलं. नाशिकची द्राक्षं आणि वाईन उद्योग जगाच्या नकाशावर नेले. येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून दिली," असं लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचे संपादक सुरेश भटेवरा सांगतात.
 
हे होत असतानाच भुजबळांवर अनेक आरोप होत होते. तेलगी प्रकरणात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. मुलाला आणि पुतण्याला निवडणुकीची तिकिटं दिल्यामुळे घराणेशाहीचा आरोप झाला.
 
भुजबळ 2004पासून 2014पर्यंत सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. यावेळी त्यांनी पदाचा गैरवापर करत जमिनी बळकावल्याचे आरोप झाले. पण हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असल्याचं भुजबळ सांगत होते.
2014 मध्ये सत्तांतर झाल्यानंतर भुजबळांभोवतीचा फास आवळला जाऊ लागला. त्यांना मार्च 2016मध्ये दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन प्रकरणी आणि बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याच्या आरोपांवरून अटक झाली. त्यांची रवानगी मुंबईतल्या आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली. अनेक वेळा प्रयत्न करूनही त्यांना पुढची दोन वर्षं जामीन मिळाला नाही.