शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (10:10 IST)

महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टी वारंवार का होते? 5 ठळक कारणं

महाराष्ट्रात आपण अनेकदा एकाच भागांत एकदा पूर, पाठोपाठ दुष्काळ, एकदा अतिवृष्टी, मागोमाग पाणीटंचाई अशा गोष्टी पाहातोय.
 
वातावरणाची घडीच विस्कळीत होतेय. अतिवृष्टी आणि पुराच्या घटना नेमक्या का वाढतायत? 5 मुद्द्यांमधून आपण हे समजून घेऊ.
 
1. अतिवृष्टी आणि पूर वारंवार का येत आहेत?
आपण म्हणतो की पाऊस वाढलाय, इतका पाऊस गेल्या 50-60 वर्षांत पाहिला नाही. पण तज्ज्ञ मंडळी म्हणतात की पाऊस पूर्वीइतकाच आहे, फक्त तो आता कमी वेळात पडतो. याचा तापमान वाढीशी संबंध कसा?
 
हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी कोल यांनी याबद्दल सांगितलं, "ग्लोबल वॉर्मिंगचं एक महत्वाचं लक्षण म्हणजे, जेव्हा हवा तापते, ती अधिक आर्द्रता धरुन ठेवते. पण ती आर्द्रता अधिक काळ धरुन ठेवू शकत नसल्यामुळे पाऊस हा अधिक काळ पडत नाही. त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो, तो थोड्या काळासाठी पडतो, पण जोरात पडतो आणि अतिवृष्टी होते."
 
"त्यामुळे या अशा घटना आता वारंवार पाहायला मिळताहेत की खूप काळ पाऊस पडत नाही, कोरडा काळ जातो आणि त्यामध्ये 3-4 दिवस एकदम अतिवृष्टी होते.
 
या घटना देशभर पाहायला मिळताहेत, विशेषत: पश्चिम घाट आणि महाराष्ट्राच्या काही भागात."
 
2. एकदा दुष्काळ, एकदा पूर असं का?
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासारख्या भागांमधून अनेकदा दुष्काळ आणि पाणीटंचाईच्याच कहाण्या आपण ऐकतो. पण अलिकडे या भागांमध्येही आपण अतिवृष्टी, पूर अशा गोष्टी पाहतोय. उभी पिकं झोपतात, पुन्हा लागवड होते आणि त्यानंतर पाऊस दडी मारतो.
हा काय प्रकार आहे?
 
ज्येष्ठ पर्यावरण पत्रकार अतुल देऊळगांवकर म्हणतात, "मराठवाड्यामध्ये तर 2012 पासून ढगफुटीची संख्या वाढत चालली आहे. एका पावसात पूर्ण दाणादाण उडते. शेतावरची माती पूर्णपणे निघून गेली आहे आणि गोटे येऊन पडलेले आहेत. आपण सतत खरीप आणि रब्बी पिकं खराब होणं हे मराठवाड्यामध्ये पाहतो आहोत.
 
उष्णता 48 अंश सेल्सियस एवढी पोहोचली आहे. ढगफुटीचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण अतिवृष्टी पण सहन करत आहे, उष्णतेच्या लाटाही सहन करत आहे आणि पूर पण सहन करत आहे. याला सामोरं जाण्याचं आपलं एक डिझाईन तयार करणं आवश्यक आहे कारण या घटना खूप वरचेवर वाढत चाललेल्या आहेत."
 
ज्या भागांमध्ये कायम खूप पाऊस पडत आलाय तिथे परिस्थिती आणखी गंभीर होत गेलीय. महाबळेश्वरचं उदाहरण घ्या, गेल्या 15 वर्षांत महाबळेश्वरमध्ये अनेकदा जोरदार पावसाच्या नोंदी झाल्या.
 
ज्या वर्षी मुंबईत महापूर आला त्या 26 जुलैला महाबळेश्वरमध्ये 24 तासांत 432 मिमी पाऊस झाला. 11 ऑगस्ट 2008 ला 24 तासांत 490.7 मिमी पाऊस पडला आणि 23 जुलै 2021 ला विक्रमी 594.4 मिमी पाऊस पडला.
 
3. महाराष्ट्राला नेमका धोका काय?
Intergovernmental Panel on Climate Change ने आपल्या अहवालात हिंद महासागर कसा जगातला सर्वाधिक वेगाने तापणारा समुद्र आहे हे सांगितलं.
 
पण त्याहीपेक्षा जास्त वेगाने अरबी समुद्र तापतोय आणि त्याचा थेट परिणाम पश्चिम भारतावर, विशेषतः महाराष्ट्रावर होतोय. गेल्या काही काळात याच तापमान वाढीमुळे अरबी समुद्रात चक्रीवादळांची संख्या वाढली आहे.
 
तौक्ते, निसर्ग या चक्रीवादळांनी गेल्या काही काळात महाराष्ट्रात मोठं नुकसान केलं होतं. पूर्वी बंगालचा उपसागर चक्रीवादळांसाठी पोषक होता, आता अरबी समुद्रात या घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे.
 
या पूर आणि अतिवृष्टीमुळे साहिकच महाराष्ट्रात दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढतंय. आता अशा भागांमध्येही दरडी कोसळतायत जिथे पूर्वी असं काहीही पाहायला मिळालं नव्हतं. असं का?
 
भूशास्त्रज्ञ डॉ. सतीश ठिगळेंनी बीबीसीला माहिती देताना सांगितलं, "सच्छिद्र खडक असतो त्याचं वजन वाढतं पावसाचं पाणी गेल्यामुळे आणि ते घसरून पडतात. हवामानाशी संबंध या गोष्टींचा लावावाच लागेल. हे यंदा घडलेलं दिसत असलं तरी भविष्यात या घटना वारंवार घडण्याची शक्यता दिसते आहेच.
 
4. नैसर्गिक व्यवस्था कोलमडली
हवामान बदलात मोठा वाटा आपल्या बदललेल्या जीवनशैलीचा आहे हे आपण नाकारू शकत नाही. पर्यावरण अभ्यासक विजय दिवाण म्हणाले की शहरांचा विकास ओबडधोबड पद्धतीनं झाला आहे. त्यामुळं पावसाचं पाणी वाहून जाण्याची पुरेशी सोय नसल्याचं पाहायला मिळतं.
 
ते पुढे सांगतात, ''पूर्वीच्या काळी नाले, ओढे, उतारानं पाणी वाहून जायचं. पण शहरात सिमेंटीकरणामुळं पाणी वाहून जाण्याची सोयच नाही. भूमिगत गटारांमधून केवळ घरांमध्ये वापरलेलं पाणी वाहून जातं. पावसाचं पाणी वाहून जायला जागा नाही, त्याचा परिणाम म्हणजे पाण्याची पातळी वाढत राहते."
5. नियोजनाचा अभाव?
पण हे माहीत आहे तर त्यासाठी काही नियोजन करता येईल का असा प्रश्न ओघाने येतो. प्रशासकीय यंत्रणा नियोजनाच्या बाबतीत उदासीन असल्याची तक्रार या क्षेत्रातले जाणकार करतात.
 
आर्किटेक्ट प्रदीप देशपांडे नियोजन न करता वाढत चाललेल्या शहरीकरणाकडे बोट दाखतात.
 
ते म्हणतात, "इमारतींची परवानगी देताना, रस्ते तयार करताना कशाचाही गांभीर्यानं विचार केला जात नाही.
 
अनेक ठिकाणी शहरांमध्ये पाणी वाहून जाण्यासाठी (स्ट्रॉर्म वॉटर ड्रेन) योग्य सोय केलेली नसते. शहरांमधल्या छोट्या नद्यांचे ओढे होतात, त्या ओढ्यांचे नाले होतात आणि त्यावरही अतिक्रमण होत ते अखेर बंद होतात. मग पाणी कसं जाणार?"
 
महाराष्ट्रातच नाही तर या संपूर्ण पृथ्वीवर घडणाऱ्या हवामान बदल, तापमान वाढ यांसारख्या गोष्टींबद्दल आपण यापूर्वीही अनेकदा बोललो आहोत. या संकल्पना नाहीत, हे वास्तव आहे असं जगभरातले तज्ज्ञ घसा खरवडून सांगतायत.
 
पण काय होतं ना, अनेकदा आपल्या आजूबाजूला संथपणे घडत असलेल्या गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही.
 
हे बदल आता संथपणे घडत नाहीयत, पूर्वी फिक्शन म्हणून पाहिलेल्या सिनेमातल्या गोष्टी आता अनेकदा प्रत्यक्षात उतरताना दिसतात. 'सावध ऐका पुढल्या हाका', हाच यातला संदेश आहे.