सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (10:05 IST)

विक्रम बत्रा कोण होते, ते कारगिल युद्धाचा चेहरा कसे बनले?

-रेहान फझल
'ये दिल माँगे मोअर' म्हणत कॅप्टन विक्रम बत्रा जेव्हा कारगिल युद्धाचा चेहरा बनलेल्या कॅप्टन विक्रम बत्रांची कहाणी शेहशाह नावाने चित्रपटरुपात प्रसिद्ध झाली आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटात विक्रम बत्रांची भूमिका साकारत आहे. आज विक्रम बत्रा यांचा जन्मदिन आहे.
 
त्या निमित्ताने विक्रम बत्रांच्या कारगिलयुद्धातील आठवणींना उजाळा देणारा लेख.
 
कारगिलमधील लढाईच्या काही महिने आधी कॅप्टन विक्रम बत्रा पालमपूरमधील त्यांच्या घरी आले होते, तेव्हा त्यांनी मित्रांना न्यूगल कॅफेमध्ये पार्टी दिली.
 
तेव्हा त्यांचा एक मित्र म्हणाला, "आता तू लष्करात आहेस. काळजी घे."
 
त्यावर विक्रम म्हणाले, "काही काळजी करू नकोस. एकतर मी विजयी होऊन तिरंगा फडकावत परत येईन किंवा त्याच तिरंगात गुंडाळलेल्या स्थितीत परत येईन. पण परत येईन एवढं नक्की."
 
परमवीर चक्र विजेत्यांवर 'द ब्रेव्ह' हे पुस्तक लिहिणाऱ्या रचना बिष्त रावत म्हणतात, "विक्रम बत्रा कारगिलच्या लढाईतील सर्वांत ओळखीचा चेहरा झाले होते."
 
"त्यांच्या व्यक्तिमत्वाचा करिश्माच असा होता की, त्यांच्या संपर्कात आलेला कोणीही मनुष्य त्यांना विसरू शकायचा नाही. त्यांनी 5140 शिखरावर ताबा मिळवल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना 'ये दिल माँगे मोअर' असं म्हटलं होतं. या उद्गारांनी त्यांनी संपूर्ण देशाची मनंही काबीज केली."
 
"आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर जाऊन हौतात्म्य पत्करलेल्या कारगिल युद्धातील जवानांचा ते चेहरा बनले होते."
बसमधून पडलेल्या मुलीचा जीव वाचवला
विक्रम बत्रा लहानपणापासूनच साहसी व निर्भीड होते. एकदा त्यांनी स्कूलबसमधून पडलेल्या मुलीचा जीव वाचवला होता.
 
विक्रम बत्रा यांचे वडील गिरधारी बत्रा त्यांच्या मुलाची आठवण सांगताना म्हणतात, "ती मुलगी बसच्या दरवाज्यापाशी उभी होती आणि दार आतल्या बाजूने नीट बंद नव्हतं. एका वळणावर दरवाजा अचानक उघडला आणि ती मुलगी रस्त्यावर पडली.
 
विक्रमने क्षणभरही विचार न करता चालत्या बसमधून खाली उडी टाकून त्या मुलीला गंभीर इजा होण्यापासून वाचवलं होतं."
 
"इतकंच नव्हे तर तो त्या मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. 'तुमचा मुलगा आज शाळेत नाही गेला का', असं आमच्या एका शेजाऱ्यांनी आम्हाला विचारलं, तर तो शाळेत गेल्याचं आम्ही सांगितलं. यावर शेजारी म्हणाले, की पण आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये बघितलं. त्यानंतर आम्ही धावत हॉस्पिटलात गेलो तेव्हा आम्हाला सगळा घटनाक्रम कळला."
 
'परमवीर चक्र' मालिकेमुळे सैन्यात जायची प्रेरणा मिळाली
दूरदर्शन वाहिनीवरून 1985 साली प्रसारित होणाऱ्या 'परमवीर चक्र' या मालिकेमुळे विक्रम यांच्या मनात भारतीय सैन्यामध्ये जायची तीव्र इच्छा निर्माण झाली.
 
विक्रम यांचे जुळे बंधू विशाल बत्रा सांगतात, "त्या वेळी आमच्याकडे टीव्ही नव्हता, त्यामुळे आम्ही शेजाऱ्यांकडे जाऊन टीव्ही बघायचो. त्या मालिकेत पाहिलेल्या गोष्टी एखाद्या दिवशी आमच्याच जगण्याचा भाग होतील, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं."
 
"कारगिलच्या युद्धानंतर माझा भाऊ विक्रम भारतीय जनमानसात जाऊन बसला. एकदा लंडनमध्ये मी एका हॉटेलात रजिस्टरमध्ये माझं नाव लिहिलं, तर जवळ उभ्या असणाऱ्या एका भारतीय मनुष्याने माझं नाव वाचून विचारलं, 'तुम्ही विक्रम बत्रांना ओळखता का?' सातासमुद्रापार लंडनमध्येही लोक माझ्या भावाला ओळखतात, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती."
मर्चन्ट नेव्हीत निवड झाली असूनही सैन्यात जायचं ठरवलं
विशेष म्हणजे हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चन्ट नेव्हीमध्ये विक्रम यांची निवड झाली होती, पण त्यांनी सैन्यात जायचा मार्ग स्वीकारला.
 
गिरधारीलाल बत्रा सांगतात, "1994 सालच्या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडमध्ये एनसीसी कॅडेट म्हणून सहभागी झाल्यानंतर विक्रमने सैन्यातील करिअरचा गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली. वास्तविक त्याची निवड मर्चन्ट नेव्हीमध्ये झाली होती. तो चेन्नईला ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या ट्रेनचं तिकीटही काढून झालं होतं."
 
"पण तिकडे जायच्या तीन दिवस आधी त्याने विचार बदलला. असं का करतोय, असं त्याच्या आईने विचारलं. तेव्हा तो म्हणाला, की आयुष्यात फक्त पैसाच सर्वस्व नसतो. मला काहीतरी मोठं करायचंय, सर्वांना आश्चर्य वाटेल असं, माझ्या देशाचं नाव मोठं होईल असं काहीतरी करायचंय. 1995 साली तो आयएमएची परीक्षा पास झाला."
 
आईवडिलांशी शेवटची भेट
सन 1999 मध्ये होळीच्या सुट्टीदरम्यान विक्रम शेवटचे पालमपूरला आले होते. त्या वेळी त्यांचे आईवडील त्यांना सोडायला बसस्थानकावर गेले. आपण आपल्या मुलाला शेवटचे भेटतो आहोत, हे त्या मातापित्यांना त्या वेळी माहीत नव्हतंच.
गिरधारीलाल बत्रा त्या दिवसाची आठवण सांगताना म्हणतात, "बराचसा वेळ त्याने त्याच्या मित्रांसोबत घालवला. वास्तविक आम्ही जरा चिंतेतही पडलो होतो. सदानकदा घरात त्याच्या मित्रांची वर्दळ असायची. त्याच्या आईने त्याला खायला आवडतं म्हणून खास राजमा चावल, कोबीची भजी आणि घरगुती चिप्स तयार केले होते."
 
"परत जाताना त्याने सोबत घरात तयार केलेलं आंब्याचं लोणचंही घेतलं. आम्ही सगळे त्याला बसस्टँडपाशी सोडायला गेलो. बस सुरू झाल्यावर त्याने खिडकीतून हात हलवून निरोप दिला. माझे डोळे ओलावले. आमच्या लाडक्या विक्रमला आम्ही शेवटचे बघतोय, हे मला तेव्हा कसं माहीत असणार. त्यानंतर तो परतून आला नाही."
 
'ये दिल मांगे मोअर'
विक्रम बत्रा यांच्या आवाजात पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी वायरलेसवरून एक संदेश मिळाला - 'ये दिल माँगे मोअर'
 
कारगिलमधील त्यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल योगेश जोशी यांनी विक्रम आणि लेफ्टनंट संजीव जामवाल यांच्यावर 5140 शिखरावरची चौकी ताब्यात घ्यायची जबाबदारी दिली होती.
 
रचना बिश्त रावत म्हणतात, "विक्रम बत्रा यांच्या '13 जॅक अलाय' या युनिटला 5140 शिखरावरील पाकिस्तानी तळावर हल्ला करून ते शिखर पुन्हा भारताच्या ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली. कर्नल योगेश जोशी यांच्याकडे दोन तरुण अधिकारी होते- एक होते जामवाल, आणि दुसरे होते कॅप्टन विक्रम बत्रा."
 
"त्यांनी दोघांनाही बोलावलं आणि एका मोठ्या खडकाआडून बोटाने शिखर दाखवलं. त्या शिखरावर चढाई करायची असल्याचंही सांगितलं. रात्रीच मोहीम सुरू होईल आणि सकाळपर्यंत तुम्हाला वर पोचावं लागेल, असं कर्नलनी दोघांना सांगितलं."
 
"मोहीम फत्ते झाल्यावर तुमचा कोड काय असेल, असं त्यांनी दोघा अधिकाऱ्यांना विचारलं. दोघं वेगवेगळ्या बाजूंनी चढाई करणार होते. लेफ्टनंट जामवाल म्हणाले, 'सर मी, ओ ये ये ये, असा कोड देईन.' विक्रम म्हणाले, 'मी, ये दिल माँगे मोअर, असं म्हणेन'."
 
कारगिलचा 'शेरशाह'
रचना बिश्त रावत पुढे सांगतात, "लढाई सुरू असताना कर्नल जोशी यांना वॉकी-टॉकीवर एक 'इंटरसेप्टेड' संदेश ऐकायला मिळाला. या लढाईत विक्रम यांचं कोड-नेम 'शेरशाह' होतं."
"पाकिस्तानी सैनिक त्यांना म्हणत होते, 'शेरशाह, तू परत जा, नाहीतर तुझं प्रेत परत जाईल.' यावर विक्रमचा आवाज थोडा धारदार झाल्याचं मला ऐकायला मिळालं. 'एक तासभर थांब. मग कोणाची प्रेतं परत जातात ते कळेल,' असं विक्रम म्हणाला, असं कर्नल जोशी सांगतात."
 
"साडेतीन वाजता लेफ्टनंट जामवाल यांच्याकडून संदेश आला- 'ओ ये ये ये'. म्हणजे जामवाल ठरलेल्या ठिकाणी पोचले होते. थोड्या वेळाने 4 वाजून 35 मिनिटांनी विक्रम यांच्याकडूनही मोहीम फत्ते झाल्याचा संदेश आला- 'ये दिल माँगे मोअर'."
 
4875ची दुसरी मोहीम
 
विक्रम यांच्या यशाबद्दल तत्कालीन लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी स्वतः त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. कॅप्टन बत्रा यांनी सॅटेलाइट फोनवरून त्यांच्या वडिलांना 5140वरील विजयाबद्दल कळवलं, तेव्हा त्यांना ते नीटसं ऐकू आलं नाही.
 
फोनवर खरखर येत होती, त्यामुळे त्यांच्या वडिलांना केवळ 'कॅप्चर' एवढाच शब्द ऐकू आला. कॅप्टन बत्रा यांनाच पाकिस्तान्यांनी कॅप्चर केलं की काय, अशी भीती वडिलांना वाटली. पण नंतर विक्रम यांनी त्यांचा गैरसमज दूर केला. आता विक्रम यांच्यावर 4875 शिखर जिंकायच्या मोहिमेची जबाबदारी होती.
 
त्या वेळी त्यांची तब्येत बिघडली होती. त्यांचं डोकं दुखायला लागलं होतं आणि डोळे लालभडक झाले होते. कर्नल योगेश जोशी त्यांना चढाईसाठी पाठवायला उत्सुक नव्हते, पण बत्रा यांनी ठामपणे सांगितलं की, ते हे काम फत्ते करूनच येतील.
 
सहकाऱ्याला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात लागली गोळी
रचना बिश्त रावत सांगतात, "4875 शिखर मुश्को खोऱ्याजवळ आहे. पहिली मोहीम द्रास भागात झाली. हे लोक खडकांचं सुरक्षाकवच वापरून शत्रूंवर गोळीबार करत होते. इतक्यात विक्रम यांच्या एका सहकाऱ्याला गोळी लागली आणि तो पुढच्या बाजूला पडला. तो जवान उघड्यावर पडला होता आणि विक्रम व रघुनाथ खडकांच्या मागे होते."
 
"आपण आपल्या जखमी सहकाऱ्याला सुरक्षित ठिकाणी घेऊन जाऊया, असं विक्रम यांनी रघुनाथला सांगितलं. तो आता जिवंत राहील असं मला वाटत नाही, तुम्ही बाहेर पडलात तर तुमच्यावर गोळीबार होईल, असं रघुनाथ यांनी विक्रमना सांगितलं."
 
"हे ऐकल्यावर विक्रम नाराज झाले नि म्हणाले, की 'तुम्ही घाबरताय का?' रघुनाथ म्हणाले, 'नाही, साहेब, मी घाबरत नाहीये. मी फक्त तुम्हाला सावध करतोय. तुम्ही हुकूम दिलात तर मी बाहेर जातो.' विक्रम म्हणाले, की आपण आपल्या जवानाला असं एकटं सोडू शकत नाही."
 
"रघुनाथ खडकाच्या आडून बाहेर पडायला निघाले, इतक्या विक्रम यांनी त्यांची कॉलर पकडून म्हटलं, 'साहेब, तुमचं कुटुंब आहे, मुलं आहेत. माझं अजून लग्नही झालेलं नाहीये. मी डोक्याच्या बाजूने उचलतो, तुम्ही पायाच्या बाजूने धरा.' असं म्हणून विक्रम पुढे गेले आणि त्यांनी सहकारी जवानाला उचललं, इतक्यात त्यांना गोळी लागली आणि ते तिथेच कोसळले."
सहकाऱ्यांना धक्का बसला
विक्रम यांच्या मृत्यूचं सर्वाधिक दुःख त्यांच्या सहकाऱ्यांना आणि कमांडिंग ऑफिसर कर्नल जोशी यांना झालं. मेजर जनरल मोहिंदर पुरी यांनासुद्धा ही बातमी ऐकल्यावर मोठा धक्का बसला.
 
जनरल पुरी त्या वेळची आठवण सांगताना म्हणतात, "विक्रम खूप डॅशिंग तरुण अधिकारी होता. आपण सकाळी युनिटला भेटतो आणि संध्याकाळी ते युनिट हल्ल्यात बळी पडतं, सकाळी आपण सगळ्यांशी हस्तांदोलन करतो आणि रात्री तो माणूस लढाईत शहीद झाल्याचा संदेश आपल्याला मिळतो, या सगळ्याचं खूप दुःख होतं."
 
ही दुःखद बातमी त्यांच्या आईवडिलांना मिळाली तेव्हा..
कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या हौतात्म्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोचली, तेव्हा त्यांचे वडील गिरधारीलाल बत्रा घरी नव्हते.
 
गिरधारीलाल सांगतात, "विक्रमच्या हौतात्म्याची बातमी आम्हाला 8 जुलैला कळली. माझी पत्नी कमल कांता शाळेतून घरी परतली होती, इतक्यात शेजाऱ्यांनी तिला सांगितलं की, सेनेचे दोन अधिकारी घरी आले होते, पण घरात कोणी नव्हतं."
 
"हे ऐकल्यावर माझी पत्नी रडायला लागली. अशारितीने अधिकारी घरी येतात तेव्हा काहीतरी वाईट बातमीच असते, याचा तिला अंदाज होता. तिने ईश्वराची प्रार्थना केली आणि मला फोन करून लगेच घरी यायला सांगितलं. मी घरी पोचलो तेव्हा अधिकारी आलेले बघूनच माझ्या लक्षात आलं की, विक्रम हे जग सोडून गेलाय."
 
"त्या अधिकाऱ्यांनी मला काही सांगण्याआधी मी त्यांना जरा थांबायला सांगितलं. मग मी आतल्या बाजूला देवघरात गेलो, देवापुढे माथा टेकला. बाहेर आलो तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी माझा हात हातात घेऊन मला बाजूला यायला सांगितलं. मग ते म्हणाले, 'बत्रा साहेब, विक्रम आपल्याला सोडून गेलाय.' हे ऐकल्यावर मी बेशुद्ध होऊन खाली कोसळलो."
 
दुसरा मुलगा देशासाठी...
विक्रम बत्रा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा शहरातील जवळपास प्रत्येक जण उपस्थित होता.
 
रचना बिश्त रावत सांगतात, "लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक सांत्वन करण्यासाठी विक्रम यांच्या आईवडिलांच्या घरी गेले, तेव्हा जनरल मलिक म्हणाले, 'विक्रम इतका प्रतिभावान होता की, त्याला हौतात्म्य आलं नसतं, तर तो एके दिवशी माझ्या खुर्चीवर बसला असता'."
 
"विक्रम यांच्या आईने मला सांगितलं की, त्यांना दोन मुली होत्या आणि एक मुलगा असावा असं त्यांना वाटत होतं. तर, त्यांना जुळे मुलगे झाले.
 
'मी एकच मुलगा मागितला होता, मग मला दोन मुलगे कसे मिळाले?' असं त्या ईश्वराला विचारत असत. विक्रम कारगिलच्या लढाईत मरण पावले तेव्हा 'एक मुलगा देशासाठी होता आणि एक माझ्यासाठी' हे आपल्या लक्षात आल्याचं त्या म्हणाल्या."
 
विक्रम बत्रा यांची प्रेमकथा
कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल चमा चंदीगढमध्ये राहत असे. आता डिंपल 46 वर्षांच्या आहेत. पंजाब सरकारच्या एका शाळेत सहावी ते दहावीच्या मुलांना त्या समाजशास्त्र व इंग्रजी हे विषय शिकवतात.
 
रचना बिश्त रावत सांगतात, "गेल्या वीस वर्षांमध्ये विक्रमची आठवण आली नाही, असा एकही दिवस गेलेला नाही, असं त्या माझ्याशी बोलताना म्हणाल्या."
"एकदा नादा साहेब गुरुद्वाऱ्यात प्रदक्षिणा घालून झाल्यावर विक्रम त्यांना म्हणाले होते, 'शुभेच्छा, मिसेस् बत्रा. आपण चार फेरे घेतलेले आहेत, म्हणजे शीख धर्मानुसार आपण आता नवरा-बायको झालो आहोत.'
 
डिंपल आणि विक्रम एकाच कॉलेजात शिकत होते. विक्रम कारगिलहून सहीसलामत परतले असते, तर त्या दोघांचं लग्न झालं असतं."
 
"विक्रम युद्धभूमीवर मरण पावल्यानंतर त्यांच्या एका मित्राने डिंपल यांना फोन केला आणि विक्रम गंभीर जखमी झाल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी विक्रमच्या आईवडिलांना फोन करावा, असंही त्या मित्राने सुचवलं. डिंपल पालमपूरला पोचल्या तेव्हा त्यांना शवपेटीत ठेवलेलं विक्रम यांचं पार्थिव दिसलं. तिथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने होते, म्हणून त्या जाणीवपूर्वक पार्थिवाजवळ गेल्या नाहीत."
 
"मग त्या चंदीगढला परतल्या आणि इतर कोणाशी विवाह न करता आयुष्यभर विक्रमच्या आठवणी जपत राहायचं, असं त्यांनी ठरवलं. कारगिलला जाण्यापूर्वी विक्रम डिंपल यांना बरोब्बर साडेसात वाजता फोन करायचे, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी त्यांचा हा नेम चुकला नाही, असं डिंपल यांनी मला सांगितलं होतं."
 
"आजही कधी घड्याळाकडे पाहिलं आणि साडेसात वाजलेले असतील, तर आपल्या हृदयाचा एखादा ठोका चुकल्यासारखा वाटतो, असं डिंपल म्हणतात."
 
हजारो लोकांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडून परमवीर चक्र
भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असणारं परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलं. 26 जानेवारी 2000 रोजी विक्रम यांचे वडील गिरधारीलाल बत्रा यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
 
गिरधारीलाल बत्रा सांगतात, "आमच्या मुलाच्या शौर्याबद्दल राष्ट्रपतींकडून परमवीर चक्र स्वीकारणं, हा अर्थातच आमच्यासाठी गौरवाचा क्षण होता. पण या समारंभानंतर आम्ही गाडीत बसून परत येत होतो, तेव्हा आमचा दुसरा मुलगा विशाल माझ्या शेजारी बसला होता. तर, वाटेत माझ्या डोळ्यांमधून अश्रू वाहायला लागले."
 
"विशालने मला विचारलं, 'डॅडी, काय झालं?' मी म्हटलं, 'बेटा, विक्रमला स्वतःच्या हाताने हा पुरस्कार स्वीकारता आला असता, तर किती आपल्याला किती जास्त समाधान वाटलं असतं!'"