शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

मृत्यूनंतर माणसाचं काय होतं? मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल इतकं कुतूहल का असतं?

spiritual
- डिलियन स्टील, मॅक्स रॉबिन
मृत्यूनंतर माणसाचं काय होतं? म्हणजे शरीराचं नाही पण एका क्षणाला ती व्यक्ती असते आणि पुढच्या क्षणी नाही. तेव्हा त्या व्यक्तीचं काय होतं. ती स्वर्गात जाते की आणखी कुठे? व्यक्तीचा पुनर्जन्म होतो का?
 
मृत्यूनंतर आपल्याला कळतं का आपला मृत्यू झाला आहे, ज्या लोकांचं असं म्हणणं असतं की मृत्यूनंतर काहीच उरत नाही, पुनर्जन्म नसतो, मग ते लोक या निष्कर्षापर्यंत कसे आले असतात. म्हणजेच बहुसंख्य लोकांना हा विचार किमान एक वेळा तरी केलेला असतो की मृत्यूनंतर जीवन आहे का? असेल तर कसं असेल नसेल तर का नाही?
 
हे इथंच थांबत नाही, मग भूत, प्रेत, आत्मे यांच्याही बाबत लोकांची मतं असतात.
 
मृत्यूनंतर जीवन आहे की नाही यावर अनेक प्रकारचं संशोधन झालंय, मतमतांतरे आहेत. पण एक गोष्ट मात्र निश्चितपणे सांगता येऊ शकते की मानवाला मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल कुतूहल असतं. पण मानवाला हे कुतूहल का असतं?
 
बीबीसी रीलने याच विषयावर एक डॉक्युमेंट्री बनवली आहे. त्याच्या माध्यमातून आपण आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधू.
 
असं म्हणतात की जगात फक्त दोनच गोष्टी शाश्वत आहेत. एक म्हणजे मृत्यू आणि दुसरं म्हणजे टॅक्स. पण टॅक्सबाबत काही लोकांची वेगळी मतं असू शकतील.
 
जर तुम्ही टेक बिलेनियर आहात तर टॅक्स चुकवण्यासाठी पैसा ऑफशोअर बॅंकेत ठेवण्याचा पर्याय आहे. पण मृत्यू काही केला तरी चुकत नाही. मग तुमचं कुठे अकाउंट असो किंवा नसो. म्हणजे श्रीमंत असो वा गरीब, सगळ्यांना एक ना एक दिवस मृत्यू येणारच हे सत्य आहे.
 
कित्येक वर्षं गेली तर अद्यापही मृत्यू या संकल्पेनबाबतचं गूढ काही उकललं जात नाही. त्याऐवजी एक सर्वसाधारण मत आपण स्वीकारतो की 'या ना त्या रूपात आपण जिवंत राहू'.
 
एक तर मृत्यूनंतर वेगळं जीवन असेल असं समजून किंवा काही नाही तर आठवणीच्या रूपात तरी.
 
आपल्या शरीरामुळे जी बंधनं आपल्यावर निर्माण झाली आहेत ती देखील मृत्यूनंतर राहणार नाही हा विचार देखील अनेकांना सुखावतो. पण मृत्यू येऊन आपण नष्ट होऊन जाऊ, आपलं काही अस्तित्वच राहणार नाही हा विचार फारच भीतीदायक वाटतो.
 
मृत्यू हा इतका शाश्वत आहे, एकमेव सत्य आहे असं म्हटलं जात असेल तर मग ते आपण स्वीकारत का नाहीत. नेमकं मनात काय होतं?
 
मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत प्राचीन काळापासूनच कुतूहल आहे. ते अनेक वेगवेगळ्या रूपातून आपल्याला दिसलं आहे. इजिप्तचे पिरॅमिड्स घ्या की मध्ययुगीन काळातील युरोपातील पेंटिंग्स पाहा, मानवाचं मृत्यूबद्दलच कुतूहल ठळकपणे दिसतं.
 
एका नव्या संशोधनात असं आढळलं आहे की जगातील एक तृतीयांश नास्तिक असं मानतात की, मृत्यूनंतर आपली चेतना जागृत असते. म्हणजे जे लोक ईश्वर किंवा पारलौकिक शक्ती मानतात त्यांच्याबद्दल आपण बोलत नाहीत तर असे लोक ज्यांचा ईश्वर किंवा दिव्य शक्तींवर विश्वास नाही त्यांच्यापैकी एक तृतियांश लोक हे मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास ठेवताना दिसतात.
 
काही लोकांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर का विश्वास असतो?
अवकाश आणि खगोलशास्त्राबद्दल अनेक नवे नवे शोध रोजच लागतात पण या संपूर्ण विश्वाचा एकच आत्मा आहे अशी समजूत अनेकांची असते. असं का?
 
तर याचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी जावं लागेल आपल्या उत्क्रांतीच्या काळात. हो अगदी अश्मयुगाच्याही आधीच्या काळात..
 
असं म्हटलं जातं की उत्क्रांतीच्या काळापासून आपण मृत्यूनंतरच्या आयुष्यात विश्वास करत आलो आहोत. त्यामुळे ही भावना किंवा जाणीव पिढ्यान् पिढ्या मानवात रुजत गेली, हे सत्य आहे की याची एखादी दुसरी बाजू देखील आहे.
 
ही गोष्ट दोन मानसशास्त्रीय संकल्पनांच्या आधारे आपल्या समजून घेता येऊ शकते.
 
टेरर मॅनेजमेंट थिअरी
टेरर मॅनेजमेंट थिअरी जर समजून घेतली तर या गोष्टीची उकल होऊ शकते. या संकल्पनेनुसार, मानव देखील इतर प्राण्यांप्रमाणेच म्हणजेच निसर्गाच्या नियमानुसार स्वतःचे संवर्धन करण्यास तत्पर असतो.
 
केवळ एकटा सजीव नाही तर संपूर्ण प्रजातीच आपल्या प्रजातीचं रक्षण करण्यासाठी तत्पर असते. त्या अनुषंगाने निर्णय घेते.
 
हे होत असताना इतर प्राण्यांपेक्षा मानवाची बुद्धिमत्ता प्रगल्भ झाली आणि मानवाला पहिल्यांदा हे देखील कळलं की मृत्यू पण आहे. म्हणजे एका बाजूला जीवनावर प्रेम आणि दुसऱ्या बाजूला मृत्यूची जाणीव, या विवंचनेत माणूस अडकला.
 
आताच्या सारखं विविध दृष्टिकोनातून विचार करणं, विश्लेषण करणं त्यावेळी तर शक्य नव्हतं. तेव्हा आपल्या पूर्वजांनी मृत्यूनंतरच्या जीवनाची कल्पना शोधली. इतर प्राण्यांच्या तुलनेत माणसाची प्रगती झाली पण त्याचमुळे त्याला भीती देखील इतरांच्या प्रमाणात जास्त वाटू लागली. तो अतिविचार करू लागला.
 
त्याच्या अतिविचारांवर काही प्रमाणात अंकुश बसला तो मृत्यूनंतरच्या जीवनाच्या संकल्पनेमुळे आणि त्याची अस्वस्थता कमी झाली, असं ही संकल्पना सांगते.
 
उपजत द्वैतवाद
आपण मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत का विचार करतो याबद्दल एक स्पष्टीकरण प्रा. जेस्सी बेरिंग यांनी दिलं आहे.
 
त्यांनी एक प्रयोग केला. त्यांनी अनेक लहान मुलांना एक कटपुतळ्यांचा खेळ दाखवला.
 
त्यात असं दाखवण्यात आलं की एक मगर उंदराला खाऊन टाकते. मग त्या लहान मुलांना विचारण्यात आलं की त्या उंदराचं पुढे काय झालं.
 
तर त्या लहान मुलांनी सांगितलं की त्या उंदीर त्याच्या स्मरणशक्तीच्या, त्याला असलेल्या ज्ञानाच्या किंवा भावनेच्या रूपाने जिवंत आहे. म्हणजे त्याला तहान भूक अशा गोष्टी नाहीत पण तो त्याचं त्याचं जगतोय असं त्या मुलांपैकी काहींनी सांगितलं. जितकं वय कमी तितकं त्या मुलांनी तो उंदीर आता काय करत असेल, कुठे असेल याबाबत अत्यंत विस्तृतपणे सांगितले.
 
म्हणजे त्या मुलांना त्यांच्या धर्माकडून किंवा त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणातून मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल काही माहिती मिळाली नव्हती.
 
पण या गोष्टी त्या मुलांच्या भावविश्वाचा भाग होत्या. म्हणजे मृत्यूनंतरच्या जीवनाबाबतच्या धारणा संस्कारातून किंवा त्या शिक्षणातून येत तर त्या उपजतच आपल्यात असतात असा यालाच बेरिंग यांनी इनेट डुअॅलिजम किंवा उपजत द्वैतवाद म्हटलं आहे.
 
पण काही लोक असे असतील की त्यांचा मृत्यूनंतरच्या जीवनावर विश्वास नाहीये पण नैसर्गिकरीत्या कुणालाच मृत्यू नको वाटतो. तेव्हा आपल्या मृत्यूनंतर आपलं अस्तित्व नाहीसं होईल का? यावर काही उपाय करता येणार नाही का असा प्रश्न देखील कुणाला पडलेला असू शकतो. त्याचं उत्तर कुठे सापडतं?
 
त्याचं तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काहींनी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अलीकडच्या काळात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून एक तंत्रज्ञान विकसित केलं आहे. या संकल्पनेला वैज्ञानिकांनी माइंड अपलोडिंग असं नाव ठेवलं आहे.
 
अगदी बरोबर विचार केला तुम्ही. म्हणजेच जसं आपण एका फाइलचा डेटा दुसऱ्या फाइलमध्ये ट्रांसफर करतो. त्याच पद्धतीने आपली बुद्धी, विचार, आठवणी, प्रक्रिया, अनुभव सर्वकाही स्टोअर करून क्लाउडवर ठेवायचं. म्हणजे तत्त्वतः तुम्ही अमर होऊ शकाल. तुम्हाला तेव्हा शरीर नसेल पण विचार करण्याची क्रिया तर सुरू राहू शकते असं माइंड अपलोडिंगमध्ये होऊ शकतं.
 
माइंड अपलोडिंग म्हणजे काय?
माइंड अपलोडिंग वर अमेरिकेत संशोधन होत आहे.
 
डॉ. मायकल शर्मर हे विज्ञान लेखक आहेत. त्यांनी मन, बुद्धी आणि विचार प्रक्रिया यावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. ते माइंड अपलोडिंगची संकल्पना उलगडून सांगतात की, ते म्हणतात की 'तुम्ही' किंवा ती व्यक्ती म्हणजे माहिती आणि ज्ञानाची संरचना.
 
ते सांगतात "शरीराच्या रचनेसाठी जसं जिनोम कारणीभूत आहे तसं विचारांची रचना कशी असावी यासाठी जे तत्त्व आहे त्याला 'कनेक्टोम' असं नाव आहे. तर एका ब्रेन स्कॅनरच्या साहाय्याने हे कनेक्टोम स्कॅन करून घेतलं जाईल आणि त्यातील डेटा एका फाइलमध्ये ट्रांसफर करून ती फाइल क्लाउडवर अपलोड केली जाईल आणि तुम्ही तुमच्या आठवणींसह अनंतकाळासाठी जिवंत राहू शकाल. अशी माइंड अपलोडिंगची संकल्पना आहे."
 
"शरीराच्या पलीकडेही काही गोष्टी आहेत. जसं की मन, बुद्धी, आठवणी, विवेक या तत्त्वावर माइंड अपलोडिंगची संकल्पना आधारित आहे. पण ही तीच संकल्पना आहे, की तुम्हाला अनंतकाळासाठी जगता येईल. फक्त तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली," असं शर्मर सांगतात.
 
हे या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे की सध्या तरी हा प्रकल्प खूप महत्त्वाकांक्षी आहे. सध्या तरी या प्रकल्पातून आताच काही खास हाती आलेलं नाही पण या लेखाच्या सोयीसाठी आपण समजू की असं प्रत्यक्षात घडलं तर काय होईल.
 
जसं आयुष्य आपल्याला हवं आहे तसं आयुष्य आपल्याला जगता येईल का? यावर डॉ. शर्मर काय म्हणतात ते आपण पाहू.
 
ते सांगतात की "हे सर्व याच गोष्टींवर अवलंबून आहे की तुमचं ध्येय काय आहे. तुमची स्वतःबद्दलची धारणा काय आहे, तुम्हाला काय हवंय? तुम्ही कोण आहात? या गोष्टीकडे मी असं पाहतो. की भवतालचं जग कसं आहे आणि क्षणाक्षणाला जे मी पाहतोय आणि अनुभवतोय ते तर तुम्ही कधीच कॉपी करू शकणार नाहीत ना?
 
"कारण ज्या क्षणाला तुम्ही ते कॉपी कराल आणि फाइलमध्ये घेऊन अपलोड कराल तर तुमचा संपर्क तुटेल. समजा हा प्रयोग यशस्वी झाला आणि तुम्हाला तुमचा 'अवतार' एका कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसला तर तुम्ही त्याचं अस्तित्व तुमच्यासारखंच आहे असं तुम्ही कबूल कराल का? नाही ना..
 
"तुम्ही तर हेच म्हणाल की हा माझी कॉपी आहे. याच्या थोडं पुढे जाऊ, तुमची कॉपी आता अगदी स्वतंत्रपणे त्या व्हर्चुअल वर्ल्डमध्ये राहत आहे. तुम्ही वेगळ्या विश्वात आहात. तुम्ही एक गोष्ट करत आहात, तुमची कॉपी वेगळी गोष्ट करत आहे.
 
"वयानुसार तुमचा मृत्यू झाला पण कॉपी व्हर्च्युअल वर्ल्डमधील असल्यामुळे जिवंतच आहे. तर ती अनंतकाळासाठी जगणार आहे. तर आता तुम्ही म्हणू शकाल का जिचा मृत्यू झाला ती व्यक्ती आणि व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये जगणारी व्यक्ती एकच आहे. अर्थातच नाही. ती संपूर्णपणे वेगळी व्यक्ती आहे," असं शर्मर सांगतात.
 
म्हणून कितीही प्रगत तंत्रज्ञान आलं तरी मृत्युमुळे तुमच्या जीवनाला ब्रेक लागेल. हे सत्य आहे. अत्यंत उत्कट भावना किंवा तुमच्याकडील क्लिष्ट माहिती कॉपी करता येणे कठीण आहे त्यामुळे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाणे हे मूलभूतरीत्या अशक्य आहे.
 
मानव असणं हे कठीण काम आहे. खरंय ना? तुम्ही जन्म घेता, जगता आणि नंतर मृत्यूच्या भीतीत संपूर्ण आयुष्यभर वावरता अन् एकेदिवशी तुमचा मृत्यू येतोच. फक्त एक पाऊल मागे येऊन विचार करा आणि एक प्रश्न विचारा..
 
खरंच तुम्ही अमर झाला तर ती चांगली गोष्ट असेल की वाईट?
प्रा. लिओन केस यांच्यामते मृत्यू आहे याच्या जाणिवेतून आपल्या आयुष्याला एक निश्चितता येते. आपण अमर नाहीत यामुळे आपल्या जगण्याला एक नवा आयाम मिळतो.
 
आपल्याकडे मर्यादित वेळ आहे असं समजल्यानंतर आपण आपले अनुभव अधिक उत्कटतेनी जगू शकतो. आपल्याकडे ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञतेचा भाव व्यक्त करू शकतो. इतकंच नाही तर या अनुभवांना आणखी समृद्ध करण्यासाठी आपण आपली कामगिरी चांगली करू शकतो.
 
याबद्दल धर्ममीमांसा तज्ज्ञ स्टॅनले हुवारेस सांगतात की प्रेमाची भावना ही आपल्याला फक्त मृत्युमुळेच समजू शकते. कारण मृत्युमुळे प्रत्येकाककडे मर्यादित स्वरूपाची सामाजिक संसाधने (Finite social economy) उपलब्ध असतात. त्याच जाणीवेतून आपण एकमेकांशी बांधिलकी जपतो.
 
मृत्युमुळेच जीवन सुंदर बनतं का?
मृत्युमुळेच या जीवनाचे सौंदर्य आणि मूल्य समजू शकते, असं तत्त्वज्ञ सांगतात.
 
डॉ. शर्मर सांगतात की "मृत्युमुळेच तर जीवनाला अर्थ मिळतो. कारण जीवन हा प्रवास आहे आणि तो पूर्ण मृत्युमुळेच होतो. म्हणजे मृत्यू हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. यामुळेच आपल्याला हे समजू शकतं की जीवन अधिक अर्थपूर्ण कसं करावं? मग आपल्या मनात हे येईल की मग या जगण्याला काय अर्थ आहे."
 
शर्मर समजावून सांगतात, "आयुष्याचा काय अर्थ आहे? तर प्रत्येक दिवस अनमोल आहे असं समजून जगा. भरभरून जगा. एंट्रॉपीच्या विरोधात जगा. मी माझ्या एका पुस्तकात याबद्दल विस्ताराने बोललोय.
 
"एंट्रॉपी हा थर्मोडायनामिक्समधील नियम समजावून सांगण्यासाठी वापरण्यात येणारी संज्ञा आहे. एंट्रॉपीचा अर्थ या ठिकाणी असा घेता येऊ शकेल की जीवनात असणारी अनिश्चतता, गोंधळाची स्थिती. तिच्या विरोधात वागून जीवन सुसूत्र आणि प्रमाणबद्ध बनवणे. त्याला संतुलित बनवणे.
 
"या कठीण आणि बेभरवशाच्या वाटणाऱ्या महाकाय विश्वातून स्वतःची वेगळी जागा निर्माण करा. तुमचा जीवनाला आकार द्या.
 
"जीवनाचे एखादे उदात्त ध्येय असणे, मित्र परिवार असणे, कुटुंब असणं, आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती असणं, प्रेमात असणं या सर्व गोष्टींनी एक मोठा फरक आपल्या आयुष्यात पडतो, बस इतक्याच गोष्टी पुरेशा आहेत ना, आणखी काय हवंय, आणखी किती काळ हवंय, आणखी का एखाद्या दुसऱ्या ठिकाणी हे जगावं असं का वाटतंय," असं बेरिंग सांगतात.
 
"आजच सर्व गोष्टींचा भररुन आनंद का घेत नाहीत, मी तर म्हणेल या क्षणाला का घेत नाहीत," असा प्रश्न शर्मर विचारतात.