मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 31 जुलै 2022 (09:38 IST)

एकनाथ शिंदे पहिल्या महाराष्ट्र दौऱ्यातून काय साध्य करू पाहत आहेत?

eknath shinde
- श्रीकांत बंगाळे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
 
30 जुलै रोजी नाशिक आणि 31 जुलै रोजी औरंगाबाद अशा दोन जिल्ह्यांतील वेगवेगळ्या ठिकाणी ते भेटी देत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टीचा आढावा तर काही ठिकाणी विकासकामांचं भूमीपूजन ते करत आहेत.
 
एकनाथ शिंदेंच्या आधी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही नाशिक आणि औरंगाबादचा दौरा केला आहे.
 
शिवसैनिकांचे प्रेम आणि आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा शिवसेनेला बांधण्यासाठी शिवसंवाद यात्रा सुरू केल्याचं आदित्य यांनी म्हटलं होतं.
 
आदित्य ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्यात एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा 'गद्दार'म्हणून समाचार घेतला होता.
 
आता आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला काही दिवस उलटत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत.
 
त्यामुळे मग एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामागे नेमकी काय कारणं आहेत? ते यातून काय साध्य करू पाहत आहेत? हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.
 
याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक निशिकांत भालेराव सांगतात, "आदित्य ठाकरेंना उत्तर देणं गरजेचं होतं. ते बोलण्यातून नव्हे तर कृतीतून देणं गरजेचं होतं. याशिवाय बंडांनंतर लोकांमध्ये गेल्यावर आपल्याला त्रासदायक वागणूक मिळते की नाही हेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टेस्ट करायचं होतं. सोबतच फुटीर आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामुळे मग ते औरंगाबाद आणि नाशिकच्या दौऱ्यावर आले आहेत."
 
हाच मुद्दे पुढे नेत औरंगाबादमधील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने सांगतात, "एकनाथ शिंदे या दौऱ्यातून आदित्य ठाकरेंना उत्तर देऊ पाहत आहेत की, तुमचं वर्चस्व असलं तरी माझ्याकडे 5 आमदार आहेत, त्यांची प्रतिष्ठा मी राखतोय. त्यांचं महत्त्वही वाढवतोय. आता आम्ही विकासकामं करणार आहोत हा मेसेज त्यांना द्यायचा आहे.
 
"रमेश बोरनारे हे वैजापूरचे आमदार आहेत. त्यांच्या कारखान्याचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. असं असूनही एकनाथ शिंदेंनी त्याचं भूमीपूजन केलं. यातून आपल्यासोबत आलेल्या आमदारांची निष्ठा राखण्याचा ते प्रयत्न करत आहेत."
 
लोकमतच्या नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने यांच्या मते, "एकनाथ शिंदेंचा हा दौरा त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना दिलासा देण्यासाठी आहे. तसं नसतं तर त्यांनी नाशिक विभागीय बैठक मालेगावात का घेतली? याचं कारण दादा भुसे मालेगाव मतदारसंघातून आमदार आहेत आणि ते एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. दुसरं म्हणजे शेजारच्याच नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे आमदार आहेत आणि तेही शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत."
 
विकासकामं की अतिवृष्टीग्रस्तांना मदत?
मराठवाड्यात गेले काही दिवस सातत्यानं पाऊस पडत आहे. यामुळे लाखो हेक्टरवरील शेतपीकांचं नुकसान झालं आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या या दौऱ्यात या नुकसानीची पाहणी करतील आणि मदतीची घोषणा करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
नाशिक येथील विभागीय आढावा बैठकीत बोलताना एकनाथ शिंदेंनी म्हटलं की, "अतिवृष्टीमुळे पीकांचं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मी याधीच दिले होते. त्यानुसार 100 % पंचनामे पूर्ण झाल्याचं विभागीय आयुक्तलयानं सांगितलं आहे. लवकरच मदतीबाबतचा निर्णय घेऊ."
 
दुसरीकडे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकताच विदर्भातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. सध्या ते मराठवाड्यातील भागात पिकांची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची मदत सरकारनं करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
 
अशास्थितीत एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याविषयी बोलताना निशिकांत भालेराव सांगतात, "अतिवृष्टी आणि विकासकामांचा आढावा यासाठी दौरा करतोय असं दाखवलं जात आहे. मला इतके इतके कोटी रुपये शिंदेंनी दिले असे काही आमदार म्हणत आहेत. औंरगाबादचे आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार यांना शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना 1800 कोटी रुपये दिले होते. खरं तर या पैशांचं या आमदारांनी काय केलं, हा प्रश्न विचारला पाहिजे."
 
"त्याचवेळी विरोधी पक्षनेते अजित पवार अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची धार कमी करण्यासाठीही शिंदेंचा हा दौरा असू शकतो," असं भालेराव पुढे सांगतात.
 
तर श्रीमंत माने यांच्या मते, "एकनाथ शिंदे यांचा पूरग्रस्तांसाठीचा दौरा असता तर ज्या भागात जास्त पाऊस पडला, त्या भागात शिंदे गेले असते. म्हणजे विदर्भातील गडचिरोली किंवा मराठवाड्यातील नांदेडचा भाग. पण ते या भागात गेले नाहीत. कारण तिथं फुटीर आमदार नाहीयेत."
 
अस्वस्थ आमदारांना दिलासा
एकनाथ शिंदे यांनी 1 जुलै रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या घटनेला आता 1 महिना उलटला आहे.
 
असं असतानाही मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी अनेकदा दिल्ली वारी करुनही मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा निघालेला नाहीये.
 
त्यामुळे मग शिंदे गटातील आमदार अस्वस्थ असल्याचं मत राजकीय विश्लेषकांच्या बोलण्यातून सातत्यानं समोर येत आहे.
 
निशिकांत भालेराव यांच्या मते, "मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर तिघांना मंत्रीपद हवं आहे. त्याचं नियोजन कसं करायचं हाही शिंदे यांच्यापुढचा प्रश्न असणार आहे.
 
"दुसरीकडे 1 ऑगस्टला आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पण, या सुनावणीबद्दल आम्ही बेफिकिर आहोत, निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे, हे दाखवण्यासाठीसुद्धा शिंदे दौरा करत असावेत," भालेराव सांगतात.
 
शिंदे गटातील आमदार अस्वस्थ आहेत, हे खरं आहे. कारण शपथविधी होऊन 30 दिवस उलटले तरी अद्याप खातेवाटप झालेलं नाही. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. 1 तारखेला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीपर्यंत वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे, असं मत श्रीमंत माने व्यक्त करतात.
 
'एकनाथ शिंदेंचं हे बेरजेचं राजकारण'
एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर अनेक आमदारांनी त्यामागचं कारण सांगितलं होतं.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्यासाठी उपलब्ध नसायचे, हे त्यातील एक प्रमुख कारण होतं.
 
"आता हीच चूक एकनाथ शिंदेंना करायची नसल्यामुळे ते औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत," असं प्रमोद माने सांगतात.
 
त्यांच्या मते, "औरंगाबाद हा शिवसेनेचं वर्चस्व असलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यातील 5 आमदारांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. या आमदारांना कायम सोबत ठेवणं, जी उद्धव ठाकरेंची अवस्था झाली ती आपली होऊ न देणं, हाही मुख्यमंत्र्यांचा यामागचा विचार असू शकतो.
 
"आपला गट वाढवणं हा यामागचा उद्देश असू शकतो. उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना जे बेरजेचं राजकारण जमलं नाही, ते एकनाथ शिंदे या माध्यमातून करत आहेत," माने सांगतात.