सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2022 (14:20 IST)

दिशा सालियन मृत्यू प्रकरण: आतापर्यंत नेमकं काय घडलं? जाणून घ्या 8 मुद्यांमध्ये

disha salian
भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा दिशा सलियान प्रकरणाचा उल्लेख केला आहे. आज (22 डिसेंबर) विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात राणेंनी दिशा सलियान प्रकरण कोणाच्या राजकीय दबावामुळे दाबलं गेलं याचा तपास व्हायला पाहिजे असं म्हटलं.
 
दरम्यान, एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनीही दिशा सलियानच्या मृत्यूमध्ये काहीतरी गूढ आहे याचा तपास झाला पाहिजे. दिशा सलियानच्या फोनवर 40 मिसकॉल कोणाचे होते हे समोर आले पाहिजे, असं नितेश राणेंनी म्हटलं.
 
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात दिशा सलियानच्या मृत्यूची चौकशी व्हावी यावर सत्ताधारी आमदार आक्रमक झाले.
 
तर रवीराणा यांनी आदित्य ठाकरे यांच्या नार्कोटेस्टची मागणी केली आहे.
 
चौकशीसाठी SIT नेमणार - फडणवीस
दिशा सलीयान प्रकरणी SIT च्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसंच ज्यांच्याकडे या संदर्भातले पुरावे असतील त्यांनी ते द्यावेत असं आवाहन फडणवीस यांनी केलं आहे.
 
दिशा सलीयान प्रकरणी राजकीय दृष्टीकोनातून बघू नये. ही चौकशी सीबीआयकडे होती. सीबीआयने यावर नोव्हेंबर 2022 ला खुलासा केला आहे. त्यामध्ये दिशा सलीयान 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली की, राजकारणामुळे आम्हाला त्रास दिला जातोय असं त्यांनी सांगितलं आहे. बदनामी झाली तर आम्ही जगणार नाही असं तिच्या आईवडिलांनी सांगितलं आहे, असं अजित पवार यांनी विधानसभेत या प्रकरी म्हटलं आहे.
 
पूजा चव्हाणच्या बाबतीतही मग चौकशी करा. तेव्हा हेच मान्यवर विरोधी पक्षात होते. सभागृह बंद पाडत होते. तिच्या आईवडिलांचीही विनंती म्हणून आपण हा विषय काढू नये, असंही पुढे अजित पवार म्हणाले.
 
तर दिशा सलीयान प्रकरणी कोणालाही टार्गेट करण्याचा प्रयत्न यात होणार नाही. दिशा सलियान प्रकरण हे कधीच सीबीआयकडे नव्हतं, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
 
सुशांत सिंग राजपूत केस सीबीआयकडे होती. कोणताही राजकीय अभिनिवेष न ठेवता या प्रकरणाचे पुरावे द्यावे. आपण निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करू, असं पुढे फडणवीस म्हणाले आहेत.
 
आतापर्यंत काय घडलं आहे?
याआधीही नारायण राणे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आरोप केले होते. त्यानंतर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी राणेंविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे.
 
दिशा सालियनवर लैंगिक अत्याचार झाला नव्हता हे पोलिसांच्या तपासात समोर आलं असलं तरीही नारायण राणे याबाबत आरोप करत असल्याने सालियन कुटुंबाला यातना होत आहेत असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होतं. .
 
या संदर्भातलं लेखी पत्र त्यांनी राज्य महिला आयोगाला दिलं होतं.
 
दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2021 रोजी मुंबईत झाला. दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? आणि यात आतापर्यंत काय घडलं? जाणून घेऊया 8 मुद्यांमध्ये.
 
1. कोण आहे दिशा सालियन?
अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होत्या.
 
8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बालकनीमधून खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली.
 
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली.
 
दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.
 
दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली.
 
2. नारायण राणे यांनी काय आरोप केले आहेत?
दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप राणे कुटुंबाकडून केला जात आहे.
 
बलात्कार करुन मग हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे. मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे.
 
नुकत्याच एका पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, "दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते?" असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.
 
सुशांत सिंह राजपूतला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची हत्या करुन त्यालाही शांत करण्यात आलं असा खळबळजनक आरोप राणेंनी केला आहे.
 
3. पोलीस तपासात काय समोर आलं?
वर्षाच्या सुरुवातीला पुराव्यांअभावी किंवा कोणतेही आरोप सिद्ध न झाल्याने दिशा सालियन केस बंद करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
 
तपास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली परंतु आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत असंही पोलिसांचं म्हणणं आहे.
 
दिशा सालियनने आत्महत्या केली, त्या रात्री कोणतीही पार्टी सुरू नव्हती. ती गरोदर नव्हती, ना तिच्यावर बलात्कार झाल्याचा पुरावा आहे असंही पोलिसांनी सांगितलं.
 
दिशा सालियनची हत्या न झाल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास अधिकारी पोहचले आहेत. तसंच यात राजकीय संबंध नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
 
दिशा सालियन ही सुशांत सिंह राजपूतचे काम पाहत होती. परंतु त्याची मॅनेजर नव्हती असंही पोलिसांचं म्हणणं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाशी या घटनेचा संबंध नसल्याचंही पोलिसांनी आपल्या चौकशी अहवालात स्पष्ट केलं आहे.
 
4. सालियन कुटुंबाने काय म्हटलं?
राणे कुटुंबीयांकडून सुरू असलेले आरोप सालियन कुटुंबाने सातत्याने फेटाळले आहेत.
 
'दिशा सालियनची बदनामी थांबवा,' अशी मागणी तिच्या कुटुंबियांनी केली.
 
22 फेब्रुवारीला दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दिशाच्या आईला अश्रू अनावर झाले.
 
या राजकारणामुळे आम्हाला खूप त्रास होत असून आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर नेते जबाबदार असतील, असंही त्यांनी म्हटलं.
 
यासंदर्भात दिशाच्या पालकांनीही आता राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दिला होता.
 
दिशाच्या मृत्यूवरुन सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो असून आम्हाला जगू द्या असं त्यांनी म्हटलं होतं.
 
यापूर्वी 5 ऑगस्ट 2021 रोजी दिशाचे वडील सतिश सालियन यांनी मुंबई पोलिसांना पत्र यासंदर्भात पत्र लिहिलं.
 
आपल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं, "माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. या बातम्या पूर्णत: चुकीच्या आणि फेक आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत."
 
"दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलिवुडमधील मोठ्या अॅक्टरसोबत पार्टीच्या बातम्या पूर्णत: बनावट आहेत," असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं होतं.
 
दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बोलताना पोलिसांनी, दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचसोबत पंचनामा करताना आई-वडील उपस्थित असल्याची माहिती दिली होती.
 
5. महिला आयोगाकडे तक्रार
मुंबई पोलिसांच्या शवविच्छेदन अहवालानुसार, दिशा सालियनवर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरीही राणेंकडून सातत्याने सुरू असलेल्या आरोपांविरोधात महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली.
 
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर म्हटलं होतं, "नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांमधील कोणतीही बाब पोलिसांच्या तपासात आढळलेली नाही. यासंदर्भात मालवणी पोलिसांना 48 तासांत अहवाल देण्यासाठी सांगितलं आहे."
 
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास प्राप्त झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
 
दिशा सालियान सुशांतसिंग राजपूत यांच्या माजी व्यवस्थापक होत्या. तिच्या मृत्यूबाबत सीबीआय यंत्रणेमार्फत तपास करण्यात आला आहे असंही चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
 
6. आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण
दिशा सालियन मृत्यू प्रकरण सूशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशीही जोडण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.
 
सुशांत सिंह राजपूत दिशाच्या मृत्यू प्रकरणी आवाज उठवणार होता आणि म्हणून त्याला शांत करण्यासाठी त्याचीही हत्या करण्यात आली असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
 
यापूर्वी ऑक्टोबर 2020 मध्ये नारायण राणे असं म्हणाले होते की, सुशांतची आत्महत्या नसून हा खून आहे. खुनाचे आरोपी गजाआड होतील. त्यातील एक मंत्री असेल. तो उद्धव ठाकरे यांचा पुत्र असेल, असा थेट आरोप नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन केला. सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं.
 
आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? असतील तर सादर करा, या प्रश्नाचं उत्तर देताना राणे म्हणाले, "सीबीआयने विचारणा केली तर मी हे पुरावे सीबीआयला देईन."
 
राणेंनी तिसऱ्यांदा आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. मात्र, पत्रकारांना पुरावे दाखवलेले नाहीत.
 
युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राणेंचे आरोप त्यावेळीच फेटाळून लावले होते. आदित्य ठाकरे म्हणाले होते, "सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही."
 
आदित्य ठाकरे यांच्यावर पोलिसांनी कोणतेही आरोप केलेले नाहीत तसेच त्यांना आतापर्यंत चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही.
 
7. 'सचिन वाझे प्रकरणाशी संबंध?'
नारायण राणे यांच्या आरोपांनंतर आता त्यांचे पुत्र नितेश राणे यांनीही या प्रकरणात खळबळजनक आरोप केले आहेत.
 
राज्य सरकारकडून या संदर्भात पडदा टाकण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
22 फेब्रुवारीला केलेल्या ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणतात, "दिशा सालियनला 8 जूनच्या रात्री काळ्या रंगाच्या मर्सिडीज गाडीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडेही काळ्या रंगाची मर्सिडीज आहे. ही गाडी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. त्यामुळे दिशा सालियन हिला याच गाडीतून घरी नेण्यात आले का?" असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
 
8. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंध?
14 जून 2020 ला सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं. तर दिशा सालियनचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. त्यामुळे या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचे आरोप होऊ लागले.
 
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर देशभरात त्याच्या चाहत्यांकडून चौकशीची मागणी झाली. सोबतच राजकीय नेत्यांनीही याप्रकरणाची दखल घेतली.
 
महाराष्ट्रात भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडीवर आरोप केले आणि तपास केंद्रीय यंत्रणांकडे देण्यास सांगितले.
 
आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीत भाजपकडून या प्रकरणात थेट मंत्र्यांचं नाव घेण्यात आलं. राणेंनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
 
दिशा सालियनच्या हत्येबाबत सुशांत राजपूतला माहिती मिळाली म्हणूनच त्याचीही हत्या करण्यात आली असा गंभीर आरोप राणेंनी केला आहे. पोलिसांनी मात्र या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध असल्याचा पुरावा आढळला नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. याप्रकरणात सर्व पुरावे तयार असल्याचा दावा आता चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा उलगडा होणार असून पुरावे तयार आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.