शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जानेवारी 2021 (16:15 IST)

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला कोण जबाबदार? चौकशी कुठवर आलीये?

मयांक भागवत
21 जानेवारी...2021 आज सुशांत सिंह राजपूतचा जन्मदिन. सुशांत आज 35 वर्षांचा झाला असता... पण, सुशांत आपल्यासोबत नाही. ऐन उमेदीत, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना सुशांतने जगाचा निरोप घेतला.
 
14 जून 2020 ला सुशांतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळून आला. त्याने आत्महत्या केल्याचं मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं होतं.
 
आत्महत्या? का? कशासाठी? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. सुशांतचे कुटुंबीय, मीडिया आणि फॅन्स त्याच्या मृत्यूची कारणं शोधू लागले. सुशांतचा मृत्यू सर्वांसाठी शॉक होता.
मुंबई पोलिसांकडून चौकशी
हे प्रकरण एका हायप्रोफाईल अभिनेत्याच्या मृत्यूचं होतं. सुशांतने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असलं. तरी, सुसाईड नोट मिळाली नव्हती. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मृतदेह मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला.
मुंबईचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी, "पोस्टमार्टम अहवालानुसार सुशांतचा मृत्यू 'Asphyxia due to hanging' म्हणजेच गळफास लावल्यामुळे गुदमरुन झाला," असल्याची माहिती दिली होती.
 
दरम्यान, सुशांतने आत्महत्या केली? का त्याची हत्या करण्यात आली? ही चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. कुटुंबीयांनी सुशांतच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं.
 
मुंबई पोलिसांनी सुशांतचा व्हिसेरा कलिना फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवला होता. फॉरेन्सिक लॅबने, 27 जुलै 2020 ला 'ही हत्या नाही. सुशांतच्या व्हिसेरा नमुन्यात ड्रग्ज किंवा हानीकारक केमिकल्स नाही,' असा अहवाल मुंबई पोलिसांना दिला होता.
 
सुशांतच्या गळ्याभोवती ज्या कपड्याचे धागे सापडले होते. तो कपडा घरातून पोलिसांनी जप्त केला होता. 'हा कपडा 200 किलोपर्यंत वजन घेऊ शकतो' असा रिपोर्ट फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी दिला.
 
मुंबई पोलिसांनी सुशांत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू ठेवली. सुशांत डिप्रेशनमध्ये होता अशी माहिती चौकशीत समोर आली.
 
मृत्यूचं कारण घराणेशाही?
सुशांतच्या मृत्यूचं कारण बॉलीवूडमध्ये सुरू असलेला घराणेशाहीचा वाद आहे अशी चर्चा सुरू झाली. बॉलीवूडमधील बडे दिग्दर्शक आणि अभिनेते फक्त आपल्या नातेवाईकांना संधी देतात. सुशांतला यामुळे अनेक चित्रपट मिळाले नाहीत. तो डिप्रेशनमध्ये होता. हे सुशांतच्या मृत्यूचं एक कारण आहे, असा आरोप करण्यात आला.
मुंबई पोलिसांनी या दिशेने तपास करत दिर्ग्दर्शक महेश भट्ट, संजय लिला भन्साळी, करण जोहर, आदित्य चोपरा यांच्यासह 40 लोकांचे जबाब नोंदवून घेतले.
 
सुशांतची मैत्रीण रियावर FIR
मुंबई पोलिसांची चौकशी सुरू होउन 40 दिवस उलटून गेले होते. दरम्यान, 29 जुलैला बिहारमध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला.
 
पाटणा शहर पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांनी सांगितलं होतं, "कुटुंबीयांच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची चौकशी सुरू आहे."
"सुशांतच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शॉकमध्ये होते. मुंबई पोलीस FIR करण्यास टाळाटाळ करत होते," त्यामुळे आता FIR केल्याची माहिती वकील विकास सिंह यांनी एएनआयशी बोलताना दिली होती.
 
बिहार पोलिसांच्या चौकशीवरून राजकारण
बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. बिहार पोलिसांना चौकशीचा अधिकार काय असा प्रश्न महाराष्ट्रातील नेत्यांनी उपस्थित केला. पोलीस अधीक्षक विनय तिवारी मुंबईत आले. तर, पालिकेने त्यांना क्वारंन्टाईन केलं. यावरून बिहार विरुद्ध महाराष्ट्र असा सामना रंगला होता. दोन्ही राज्यांचे पोलीस प्रमुख आणि नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या होत्या.
भाजपने सुशांत प्रकरणाचा मुद्दा बिहार विधानसभा निवडणुकीत उपस्थित केला. यावरूनही आरोपप्रत्यारोप झाले.
 
सीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली
मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. मुंबई पोलीस गुन्हा दाखल का करत नाहीत? प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असे आरोप झाले. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे.
 
सोशल मीडियावर CBI चौकशीसाठी कॅम्पेन सुरू झालं. तिकडे बिहारच्या राजकारण्यांनी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली.
ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला बिहार सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या गुन्ह्याची चौकशी CBI ला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला.
 
केंद्राने चौकशी सीबीआयला देण्याचा निर्णय घेतला. तर, महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशीची गरज नाही अशी ठाम भूमिका घेतली.
 
राज्य सरकारच्या हक्कांवर केंद्र सरकार घाला घातल असल्याचा आरोप राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.
 
आदित्य ठाकरेंवर आरोप
दरम्यान, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणी नाव न घेता युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंवर आरोप केले. सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव जोडलं जाऊ लागलं.
 
या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत, आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळून लावले होते.
 
सीबीआय चौकशीत काय हाती लागलं?
प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि योग्य पद्धतीने झाला पाहिजे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीची परवानगी दिली.
 
ऑगस्ट महिन्यात CBI ने सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास हाती घेतला. सीबीआयची चार सदस्यांची टीम मुंबईत चौकशीसाठी आली.
 
सीबीआयने सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती, सुशांतच्या घरी रहाणारा त्याचा सहकारी सिद्धार्थ पिठानी, स्वयंपाक करणारा निरज सिंह, दिपेश सावंत यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदवून घेतले.
सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली. हे शोधण्यासाठी सीबीआईने दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाची मदत घेतली.
 
सप्टेंबर महिन्यात सीबीआयची टीम सुशांतच्या घरी पोहोचली. सुशांतच्या मृत्यूचा दिवस कसा होता. याचा क्राइमसीन पुन्हा घडवून आणण्यात आला.
 
एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी मेडिकल बोर्ड स्थापन करण्यात आलं.
 
सप्टेंबर महिन्यात एम्सच्या डॉक्टरांनी आपला अहवाल सीबीआयला सुपूर्द केला.
 
एम्स फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, "सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यामुळे झाला. हे प्रकरण आत्महत्येचं आहे. सुशांतच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती."
 
त्यानंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून सुशांत प्रकरणी चौकशीच काय झालं असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर देताना सीबीआयने डिसेंबर महिन्यात 'या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सर्व पैलू तपासून पाहिले जात आहेत.' असं उत्तर दिलं होतं.
 
सीबीआयने सुशांत प्रकरणाचा तपास हाती घेऊन फेब्रुवारी महिन्यात सहा महिने पूर्ण होतील. पण, अद्यापही सीबीआयने या प्रकरणाची अधिकृत भूमिका मांडलेली नाही.
 
काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने चौकशी अहवाल तात्काळ दिला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं.
 
ईडीच्या चौकशीत काय निष्पन्न झालं?
सुशातच्या कुटुंबीयांनी रियाने 15 कोटी रूपयांची हेरफेर केल्याचा आरोप केला होता.
 
अंमलबजावणी संचलनालयाने या प्रकरणी PMLA अंतर्गत तपास सुरू केला. सुशांतच्या पैशांचा अपहार झाला का याची चौकशी केली जात होती.
7 ऑगस्टला ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं. सुशांतचे आर्थिक व्यवहार, इनव्हेस्टमेंट यांच्याबद्दल रियाकडून माहिती घेण्यात आली. रियाची मॅनेजर, सुशांतचा माजी हाऊस मॅनेजरची चौकशी करण्यात आली.
 
महिनाभराच्या चौकशीनंतर, 'रियाविरोधात मनी लॉन्डरिंगचा पुरावा मिळाला नाही. रिया सुशांतच्या पैशांची हेराफेरी करत असल्याचा पुरावा नसल्याची माहिती,' ईडीच्या सूत्रांनी दिली.
 
सुशांतच्या अकाउंटमधून रिया किंवा तिच्या कुटुंबीयांच्या अकाउंटमध्ये पैशांचा व्यवहार झाला नसल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.
 
अंमलबजावणी संचलनालनालयाने मात्र या वृत्ताला अद्यापही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
 
कुठपर्यंत आली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची चौकशी?
पीटीआयच्या माहितीनुसार, "ईडीने चौकशी दरम्यान रियाचे दोन फोन क्लोन केले होते. ज्यात ड्रग्जची खरेदी आणि सेवन याबाबत माहिती मिळाली होती. ईडीच्या रिपोर्टनंतर सुशांत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज सेवनाच्या दिशेने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने तपास हाती घेतला."
 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं. दोन दिवसांच्या चौकशीनंतर रियाला 8 सप्टेंबरला अटक करण्यात आली.
तर, एनसीबीचे उपमहासंचालक अशोक मुठा यांनी, 'रियाच्या घरातून ड्रग्ज मिळाले नाहीत. पण, अटक करण्यासाठी सबळ पुरावा असल्याची माहिती,' प्रसारमाध्यमांना दिली होती.
 
कोर्टासमोर सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये रियाने ड्रग्ज विकत घेण्यासंदर्भात सहभाग असल्याचं मान्य केलं असल्याचा दावा केला होता.
 
एक महिना तुरंगात राहिल्यानंतर रियाची बॉम्बे हायकोर्टाने जामीनावर मुक्तता केली.
हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, "नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रियाच्या जामीनाला विरोध करताना बॉम्बे हायकोर्टात, 'हे प्रकरण सुशांतशी संबंधित नाही. तो एक ग्राहक होता. पण, ही डील फक्त त्याच्यापुरती मर्यादित नाही."
 
"रिया ड्रग्ज विकत घेत होती. सुशांतच्या ड्रग्ज सेवनाची सवय तिने लपवली. रियाच्या वॉट्सअप चॅटवरून ती ड्रग्जच्या व्यवसायाशी संबंधित होती आणि ड्रग्ज ट्राफिकिंग करायची," असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आपल्या प्रतिज्ञापत्रात कोर्टाला सांगितलं होतं. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.
 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ड्रग्ज सेवनाप्रकरणी अभिनेत्री दिपीका पादुकोण, रकुलप्रीत सिंह आणि सारा अली खान यांची चौकशी केली.
 
ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची चौकशी अजून सुरू आहे.