बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 2 सप्टेंबर 2021 (15:47 IST)

सिद्धार्थ शुक्ला लहानपणी वडिलांना ठोसे मारून का रडला, त्यानेच सांगितलेला गोड किस्सा

प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं. सिद्धार्थ बिग बॉसच्या 13 व्या पर्वाचा विजेता होता. बिग बॉसच्या घरात असताना त्याने त्यांच्या बालपणीच्या वडिलांच्या काही आठवणींना उजाळा दिला होता.
 
"मला वडिलांचा राग आला की मी त्यांना खूप ठोसे मारायचो. पण नंतर मलाच त्याचं वाईट वाटू लागायचं आणि मला रडायला यायचं," असं सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या लहानपणीच्या आठवणी जागवताना सांगितलं.
 
बिग बॉसच्या घरात गोहर खान आणि हिना खान या दोन अभिनेत्रींशी झालेल्या या संभाषणादरम्यान सिद्धार्थने वडिलांची त्यांच्या मनात असलेली प्रतिमा नेमकी कशी होती ते सांगितलं होतं.
 
प्रत्येकासाठी आपले वडील हे हिरो असतातच. पण सिद्धार्थच्या मनात ती प्रतिमा तयार होणारे प्रसंग कोणते होते, ते त्यानं स्वतःच बिग बॉसमध्ये सांगितलं होतं.
 
'वडिलांना ठोसे मारून मीच रडायचो'
"लहानपणी मी पहिली दुसरीत असेल, तेव्हा माझे वडील बसलेले असायचे. मला कशाचा तरी प्रचंड राग आलेला असेल तेव्हा मला वडिलांना मारायचं असायचं.
 
मी वडिलांना पाठिवर, पोटावर ठोसे मारायचो. तेव्हा मी पाच सहा वर्षांचा असेल. माझ्यात जेवढी शक्ती आहे ती सर्व एकवटून मी त्यांना मारायचो. पण त्यांना काहीही होत नव्हतं."
 
"मी लहान होतो त्यामुळं त्यांना लागत नसायचं. पण मी दणा-दण त्यांना ठोसे मारायचो आणि मारून मारून थकायचो. तेव्हा माझे वडिल हसत असायचे. काही वेळानं मला आपण वडिलांना मारलं याचं वाईट वाटायला लागायचं आणि मी रडू लागायचो.
 
'पपा मी तुम्हाला मारलं, तुम्हाला लागलं असेल. तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्हाला लागलं असेल मला माहिती आहे मी जोरात मारलं," असं करून मी रडत असायचो असं सिद्धार्थनं सांगितलं होतं.
 
"माझं रडणं पाहून मला शांत करताना माझ्या वडिलांनाही रडू यायला लागायचं. मला काही झालं नाही असं मला समजवण्याचा प्रयत्न माझे वडील करायचे," असं तो म्हणाला होता.
माय डॅडी स्ट्राँगेस्ट
सगळ्या लहान मुलांना वाटतं तसं आपलेच वडील जगात सर्वात शक्तीशाली आहेत, असं मला या प्रसंगामुळे वाटल्याचं सिद्धार्थ यांनी यावेळी सांगितलं होतं.
 
"मला वाटलं मी तर पूर्ण ताकदीनं मारलं. पण डॅडी किती शक्तीशाली आहेत, त्यांना लागल्याचं ते सांगतच नाही. लहानपणी आपल्याला सगळ्यांनाच आपले वडीलच सगळ्यांत शक्तीशाली आहेत अशी भावना असते," असं सिद्धार्थ या दोघींशी बोलताना म्हणाला होता.
 
आपले वडील एवढे शक्तीशाली असल्याच्या भावनेमुळं ती घटना आणि ते दृश्यं एवढ्या वर्षांनंतरही माझ्या मनात घर करून असल्याचं, सिद्धार्थनं यावेळी सांगितलं होतं.
 
"जेव्हा कुणीतरी आपल्यातून निघून जातं तेव्हा आपल्याला त्यांच्याशी काय बोललो हे आठवणीत राहत नाही. पण एखादं दृश्य कायम आपल्या मनात राहिलेलं असतं," असं सिद्धार्थ म्हणाला होता.
 
वडिलांची हिरोसारखी इमेज
वडिलांची अशीच आणखी एक आठवण सिद्धार्थ शुक्लाने यावेळी गोहर आणि हिनाला सांगितली होती.
 
"आम्ही राहायचो ती बरीच लांब गल्ली होती. गल्लीच्या कोपऱ्यावर असलेल्या गेटवर माझी शाळेची बस यायची. माझे वडील ऑफिसला जाताना मला शाळेच्या बसमध्ये बसवून मग पुढे जायचे."
 
"एकेदिवशी आम्ही घरून निघालो होतो. डॅडीच्या हातात माझी बॅग होती. बॅग जड असायची म्हणून त्यांना ती हातात देऊन मी आरामात चालायचो.
 
आम्हाला उशीर झाला होता. त्यामुळे बस निघून जाण्याची शक्यता असल्याने अर्ध्या रस्त्यातून आम्ही धावायला लागलो. मी पूर्ण वेगानं धावत होतो आणि माझे डॅडही धावत होते."
 
"धावताना डॅड माझ्या पुढं जात होते. मी जोरात धावूनही ते पुढं होते. माझ्या बॅगचं ओझं आणि त्यांची बॅग हे घेऊनही ते एवढ्या वेगानं धावत होते. धावताना त्यांचे केस हवेनं उडत होते. तेव्हा त्यांना तसं पाहून मी भारावून गेलो होतो. मला माझ्या वडिलांचा प्रचंड अभिमान वाटला होता. हा माणूस किती भारी आणि शक्तीशाली आहे," असं तेव्हाच वाटल्याचं सिद्धार्थ म्हणाला.
वडिलांच्या वाढदिवसापूर्वी आली होती आठवण
सिद्धार्थने बिग बॉसच्या घरात या आठवणी सांगितल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या वडिलांचा वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाच्या तोंडावर वडिलांच्या या आठवणींनी सिद्धार्थ गहिवरला होता.
 
गोहर आणि हिना यांना सिद्धार्थने उद्या (14 ऑक्टोबर) माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे असं सांगितलं. त्यावर गोहरने त्यांचं निधन कधी झालं होतं, असं विचारलं. त्यावर 2005 मध्ये त्यांचं निधन झाल्यानं सिद्धार्थने सांगितलं होतं.