सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (19:04 IST)

22 वर्षांपूर्वी जन्मलेली आस्था अरोरा भारतासाठी एवढी महत्त्वाची का?

astha arora
  • गीता पांडे
तारीख 11 मे 2000. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात एका नवजात बाळाला भारतातील 1 अब्ज क्रमांकाचं बाळ म्हणून घोषित करण्यात आलं. यावेळी मंत्र्यांनी गुलाबी ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या त्या मुलीसोबत फोटोही काढले.
 
आस्थाचा जन्म होताच भारत 100 कोटी लोकसंख्या असणाऱ्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. या पंक्तीत आधी फक्त चीन होता. या प्रसंगी आयोजित समारंभात, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या फंडाचे भारताचे प्रतिनिधी मायकेल व्लासॉफ यांनी आस्थाचं वर्णन 'अतिशय खास आणि अद्वितीय' मूल म्हणून केलं.
 
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताला नव्यानं विचार करावा लागेल, असा इशाराही आस्थाच्या जन्मातून मिळाल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
आस्थाच्या जन्मानंतरचा उत्सव जगभरातील वृत्तपत्रांसाठी ठळक हेडलाईन बनला. दिल्लीतील नजफगढ भागातील आस्थाच्या घरी अनेक दिवस पत्रकारांची वर्दळ होती.
 
भारतातील सर्वांत कमी वयाच्या सेलिब्रिटीला भेट देण्यासाठी आणि तिची आई अंजना अरोरा यांच्याशी बोलण्यासाठी तिच्या घरी भेट देणाऱ्या बीबीसी टीमचा मी देखील एक भाग होते.
 
दोन दशकांनंतर 'ती खास मुलगी' कशी आहे आणि ती आता काय करते हे पाहण्यासाठी मी पुन्हा त्या भागात गेले.
 
आस्थाला आता ती खास आहे, असं वाटत नाही
रविवारी सकाळी 22 वर्षीय आस्थानं तिच्या घराचा दरवाजा माझ्यासाठी उघडला. काही वर्षांपूर्वीच तिला खास वाटणं थांबल्याचं ती सांगते. तिच्या जन्मावेळी नेत्यांनी अनेक आश्वासनं दिली, पण ती कधीच पूर्ण केली नाहीत, असं तिचं म्हणणं आहे.
 
ती मला रविवारी भेटली. कारण तिला आठवड्यातून फक्त एक दिवस सुट्टी मिळते, ती म्हणजे रविवारी. काही दिवसांपूर्वी तिनं हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरीला सुरुवात केलीय.
 
ती सांगते, "मला सायन्स शाखेचं शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचं होतं, पण माझ्या पालकांना खाजगी शाळेत शिक्षण घेणं परवडणारं नव्हतं. त्यामुळे मला परिचारिकेचं प्रशिक्षण घ्यावं लागलं."
 
आस्थानं मला तिच्या फोल्डरमध्ये ठेवलेले वर्तमानपत्राचे कात्रणं दाखवले. ते तिच्या पालकांनी जपून ठेवले होते. याद्वारे तिचा जन्म आणि त्यामुळे निर्माण झालेलं वातावरण तिला जाणून घेता आलं.
 
जन्मानंतर काही दिवसांपर्यंत ती चर्चेत राहिली. एका रिपोर्टनुसार, आस्था 11 महिन्यांची असताना भारताच्या आरोग्य मंत्रालय आणि UNFPA द्वारे सुरू केलेल्या वेबसाईटचं उद्घाटन करण्यासाठी तिला बोलावण्यात आलं होते.
 
आस्था तिच्या पहिल्या वाढदिवसानंतर कुटुंबासह अजमेरला गेली होती. एका स्थानिक वृत्तपत्रानं तिची सहल कव्हर केली आणि लिहिलं की, आस्थाला तिच्या पाच वर्षांच्या भावाचा गृहपाठ आणि पुस्तकं फाडणं आवडतं.
 
आस्था सांगते की, जेव्हा मी पहिल्यांदा शाळेत गेली तेव्हा मला माझ्या या खास दर्जाविषयी कळलं. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या दिनाच्या दिवशी, जेव्हा एक कॅमेरा क्रू माझ्या शाळेत आला, तेव्हा मी कदाचित चार किंवा पाच वर्षांची होते. तेव्हाच मी भारताचं एक अब्जावे मूल असल्याचं ऐकलं."
 
मीडियातील प्रसिद्धीचे फायदे
"एका मुलीसाठी टीव्हीवर येणं ही एक मोठी गोष्ट होती, मला हे अटेंशन आवडलं होतं," आस्था पुढे सांगते.
 
मीडिया अटेन्शनचे काही फायदेही होते. आस्थाचे वडील एका दुकानात सेल्समन होते. त्यांचं मासिक उत्पन्न चार हजारांहून कमी असल्यानं शाळेची फी भरणं त्यांना कठीण जात होतं.
 
आस्था सांगते, "दरवर्षी पत्रकार येऊन माझ्यावर बातमी करायचे. यातून शाळेला मोफत प्रसिद्धी मिळायची. त्यामुळे ते माझी दुसऱ्या इयत्तेपासूनची फी माफ करायचे."
 
आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे...
चांगले मार्क्स असूनही कुटुंबाच्या हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे आस्थाला अकरावीत सरकारी शाळेत प्रवेश घ्यावा लागला. "मी माझ्या शाळेबद्दल निराश होते आणि त्याचा माझ्या ग्रेडवर परिणाम दिसत होता," ती सांगते.
 
यामुळे तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं. तिचं कुटुंब गरीब होतं. आस्थाची आई सांगते की, जेव्हा आस्थाचा जन्म झाला तेव्हा मला वाटलं होतं की तिची सर्व स्वप्नं पूर्ण होतील.
 
अरोरा कुटुंबीयांचा दावा आहे की, "तत्कालीन महिला व बालकल्याण मंत्री सुमित्रा महाजन त्यांना रुग्णालयात भेटायला आल्या, तेव्हा त्यांनी आस्थाला मोफत शिक्षण, मोफत आरोग्यसेवा आणि रेल्वेचा मोफत प्रवास ही आश्वासनं दिली होती."
 
पण, याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाहीये.
 
अंजना अरोरा सांगतात की, "काही महिन्यांनंतर तत्कालीन खासदार साहिब सिंह वर्मा यांनी आस्थाच्या वडिलांना सरकारी नोकरीसाठी मदतीचं आश्वासन दिलं होतं. आम्ही अनेकदा त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकवेळी ते बाहेर असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं."
 
UNFPA निधीतून मिळाले पैसे
केवळ UNFPA च्या निधीतून दोन लाखांची मदत मिळाल्याचं आस्थाचे कुटुंबीय सांगतात. आस्था 18 वर्षांची झाली तेव्हा तिच्या महाविद्यालयीन अभ्यासासाठी या पैशांचा वापर करण्यात आला. ही रक्कम 7 लाखांपर्यंत वाढली आणि या रकमेमुळे तिच्या नर्सिंगच्या अभ्यासात मदत झाली.
 
माजी खासदार वर्मा यांचं 2007 मध्ये निधन झालं. पण कुटुंबाच्या दाव्याबाबत सुमित्रा महाजन यांच्याशी आम्ही बातचीत केली. 2019 मध्ये लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर महाजन यांनी आता सक्रिय राजकारणातून बाहेर पडल्या आहेत.UNFPA फंडाशिवाय त्यांना दुसरं कोणतंही आश्वासन दिल्याचं आठवत नसल्याचं महाजन सांगतात.
 
बीबीसीला महाजन यांनी सांगितलं, "मी त्यांना मंत्री म्हणून भेटायला गेले होते, वैयक्तिकरित्या नाही. मी फार काळ मंत्री नव्हते. मी दिल्लीत होते आणि राजकारणातही सक्रिय होते. पण आस्थाच्या घरच्यांनी कधीच माझ्याशी संपर्क साधला नाही. जर त्यांनी मला संपर्क साधला असता तर मी नक्कीच मदत केली असती."
 
आजही कुटुंबीयांनी संपर्क साधल्यास मी मदत करण्याचा प्रयत्न करेल, असंही महाजन सांगतात.
 
एक अब्जावे मुलाच्या जन्माचा उत्सव ही लोकसंख्या वाढ आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज, या दोन्ही बाबींकडे लक्ष वेधण्याची एक संधी होती. कारण वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकांना मूलभूत सुविधा आणि चांगलं जीवन देणं सरकारला अवघड झालंय.
 
2000 मध्ये जेव्हा आस्थाचा जन्म झाला, तेव्हा 2045 मध्ये भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त होईल, असा अंदाज सरकारनं व्यक्त केला होता. या वर्षी जुलैमध्ये संयुक्त राष्ट्रांनी 1.4 अब्ज लोकसंख्या असलेला भारत पुढच्याच वर्षी चीनला मागे टाकेल, असं म्हटलं होतं.
 
आस्था म्हणते, "सध्या सगळीकडे खूप स्पर्धा आहे. शाळा, कॉलेज आणि नोकरीमध्ये प्रत्येक जागेसाठी अनेक जणांमध्ये स्पर्धा, संघर्ष सुरू आहे."
 
"मी एक अब्जावे मूल होते, लवकरच दोन अब्ज क्रमांकाचे मूलंही येईल. पण, मला आशा आहे की आपण तिथपर्यंत कधीच पोहोचू नये."
Published By -Smita Joshi