शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

World Malaria Day: दोन मिनिटाला एक बळी घेणाऱ्या रोगाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?

मलेरिया खरंतर टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. पण तरीही मलेरियाच्या नावाने आजही धडकी भरते. त्याला कारणही तसंच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाने आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो तर दरवर्षी मलेरियाच्या 20 कोटी प्रकरणांची नोंद होते.
 
गेल्या दशकभरात मलेरियाला आळा घालण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात यशही आलं. मात्र, 2015पासून मलेरियाविरोधातल्या लढ्याला खीळ बसली. जागतिक आरोग्य संघटनेने 2018मध्ये 'जागतिक मलेरियाविषयक अहवाल' सादर केला. या अहवालातल्या माहितीनुसार 2015 ते 2017 या दोन वर्षात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत फारशी घसरण झालेली नाही.
 
25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस आहे. त्यानिमित्ताने या आजाराविषयी जाणून घेऊया.
 
P. falciparum, P. malariae, P. ovale and P. vivax या चार प्रकारच्या प्लॅसमोडियम प्रजातीच्या पॅरासाईट्समुळे (विषाणुंमुळे) जीवघेणा मलेरिया होऊ शकतो.
अनिफिलास डासांच्या माद्यांना 'मलेरिया व्हेक्टर' म्हणतात. या मादी मलेरियाचे पॅरासाईट्स म्हणजेच परजीवी विषाणु मानवी शरिरात सोडतात.
मलेरिया या आजाराला आळा घालता येऊ शकतो आणि तो पूर्णपणे बराही होऊ शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार 2017मध्ये 87 देशांमध्ये एकूण 21 कोटी 90 लाख जणांना मलेरियाची लागण झाली होती.
तर त्याच वर्षी जवळपास 4 लाख 35 हजार जणांचा मलेरियामुळे मृत्यू झाला.
यात सर्वात जास्त रुग्ण हे आफ्रिकेतले आहे. 2017 साली मलेरियाचे 92% रुग्ण तर 93% मृत्यू एकट्या आफ्रिकेत झाले.
मलेरियाला प्रतिबंध आणि त्याच्या उच्चाटनासाठी 2017 साली 3.1 कोटी डॉलर खर्च करण्यात आले.
मलेरियाची लक्षणं
ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, ही मलेरियाची प्राथमिक लक्षणं आहेत. मलेरियाचा डास चावल्यानंतर 10-15 दिवसात ही लक्षणं दिसतात.
 
ही लक्षणं कधीकधी सुप्त किंवा कमी तीव्रतेची असतात आणि चटकन लक्षात येत नाही. मात्र, त्यावर 24 तासात उपचार घेतले नाही जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.
मलेरियाचा सर्वाधिक धोका कुणाला?
2017 साली जगातल्या जवळपास निम्म्या लोकसंख्येला मलेरियाचा धोका होता. पाच वर्षांखालील मुलांना मलेरिया होण्याचा सर्वाधिक धोका असतो. 2017साली जगभरात मलेरियाने झालेल्या मृत्यूंमध्ये 61% प्रमाण हे पाच वर्षांखालच्या मुलांचं होतं. याशिवाय गरोदर महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांनाही मलेरिया होण्याची शक्यता अधिक असते.
 
सर्वाधिक मलेरिया प्रभवित क्षेत्रं कोणती?
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्युची नोंद आफ्रिकेत होते. मात्र, दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व भूमध्यप्रदेशातील देश, प्रशांत महासागराच्या पूर्व आणि पश्चिमेकडचे देश आणि अमेरिकेतही मलेरियाचा मोठा फैलाव होतो. 2017 साली मलेरियाच्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण जगातल्या पाच देशांमध्ये आढळले. नायजेरिया (25%), काँगो (11%), मोझांबिक (5%), भारत (4%), आणि युगांडा (4%).
 
मलेरियाचा फैलाव
अनोफिल्स डासांच्या मादीमुळे मलेरिया होतो. अनोफिल्स डासांच्या 400हून जास्त प्रजाती आहेत. यातल्या जवळपास 30 प्रजाती मलेरियाच्या फैलावासाठी कारणीभूत ठरतात. हे डास सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी येतात. त्यावेळी मलेरिया पसरवणारे हे मलेरिया व्हेटर चावण्याची शक्यता सर्वाधिक असते. अनोफिल्स डासांच्या मादी पाण्यात अंडी घालतात. त्यातून लारव्हा बाहेर येतो. पुढे त्यातून डास तयार होतात. या अंड्यांच्या भरणपोषणासाठी मादीला रक्ताची गरज असते.
प्रतिबंधात्मक उपाय
ज्या उपायांची परिणामकारकता सिद्ध झाली आहे, असा उपायांचा अवलंब करणे सर्वांत योग्य, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. मलेरियापासून संरक्षणाचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे डासांपासून बचाव करणाऱ्या जाळीचा (insecticide-treated mosquito nets - ITN) वापर आणि घरात डासांसाठीचा स्प्रे (indoor residual spraying - IRS) वापरणे. जाळीमुळे (ITN) डांसाचा थेट संपर्क टाळता येतो. तर IRSमध्ये घरात किंवा इमारतीत कीटकनाशकांची फवारणी केली जाते. वर्षातून एक किंवा दोन वेळा अशी फवारणी करता येते. प्रवास करणारे, गर्भवती महिला आणि बालकांना मलेरियाला प्रतिबंध करणारे औषधही देतात.
 
मलेरिया : निदान आणि उपचार
मलेरियावर उपचार करून तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. मायक्रोस्कोप किंवा रॅपिड डायग्नोस्टिक टेस्ट या दोन पद्धतीने पॅरासाईटवर आधारित निदान करता येतं. या पद्धतीने अर्धा तास किंवा त्याहूनही कमी वेळेत एखाद्याला मलेरिया आहे किंवा नाही, याचं खात्रीशीर निदान करता येतं. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जितक्या लवकर निदान करून उपाचर होईल तेवढी आजार बळावण्याची आणि रुग्ण दगावण्याची शक्यता कमी होते. तसंच मलेरियाच्या प्रसारालाही अटकाव घालता येऊ शकतो. मलेरियाच्या उपचारासाठी आरटेमिसिनिन या औषधा किंवा त्याच्या संयुगाचा सर्वाधिक वापर होतो.
 
औषध आणि कीटकनाशक ठरत आहे निष्प्रभ
सध्या असलेली कीटकनाशक आणि औषधं अनोफिल्स डासांसाठी निष्प्रभ ठरत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे मलेरिया अधिक बळावतोय. मलेरियाला अटकाव करणारी जी प्रतिबंधात्मक औषधं सध्या उपलब्ध आहेत ती पूर्णपणे निष्प्रभ ठरण्याची भीती आहे. 2010-2017 या काळात मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पाचपैकी एका कीटकनाशकाचा आता डासांवर काहीही परिणाम होत नसल्याचं 68 देशांनी सांगितल्याची माहिती जागतिक मलेरियाविषयक अहवालात देण्यात आली आहे.
 
मलेरियाला प्रतिबंध आणि त्याच्या उच्चाटनासाठी औषधांची परिणामकारकता टिकवून ठेवणं मोठं आव्हान आहे आणि जिथे जिथे मलेरियाचा फैलाव होतो, अशा देशांमध्ये त्यावर नियमित लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. कुठली औषधं निष्प्रभ ठरत आहेत, हे लवकरात लवकर कळणे आणि त्यावर तात्काळ आणि परिणामकारक तोडगा काढणे, हा यामागचं उद्देश आहे.