शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (09:53 IST)

Bhangarh Fort : भानगढचा किल्ला 'मोस्ट हाँटेड' म्हणून ओळखला जाणारा किल्ला

Bhangarh Fort : एक होता राजा...एक होती राणी...त्यांच्या राज्यात प्रजा सुखी होती, सगळा आनंदीआनंद होता...पण एकेदिवशी एक दुष्ट मांत्रिक आला...त्याने राजा-राणीला शाप दिला आणि मग..
लहानपणापासून चांदोबासारख्या पुस्तकांमधून आपण अशाच जादूच्या गोष्टी वाचलेल्या असतात. कपोलकल्पित कथा म्हणून आपण त्या वाचतो आणि सोडून देतो...पण असंही एखादं ठिकाण आहे, ज्यानं अशीच एक गोष्ट वर्षानुवर्षे खरी मानली असेल तर?
 
लोकमानसात या गोष्टीचा इतका जास्त पगडा असेल की ती सगळी जागाच ‘झपाटलेली’ म्हणूनच ओळखली जात असेल तर?
 
जयपूरपासून 118 किलोमीटर दूर असलेला भानगढ किल्ला...त्याच्या भोवती असलेलं रहस्य आणि गूढ कथा...नेमकी गोष्ट कोठे संपते आणि इतिहास कुठे सुरू होतो हे समजणं अवघड व्हावं इतकी झालेली सरमिसळ... अनेक वेबसाइट्स आणि ब्लॉगवर या जागेचा उल्लेख भारतातील ‘मोस्ट हाँटेड’ जागा म्हणून आहे.
 
भानगढचा इतिहास
जयपूरजवळच असलेल्या आमेरचा राजा होता भारमल. आमेरचे राजे स्वतःला कछवाह राजपूत म्हणून घ्यायचे.
 
राजा भारमलच्या मुलाचं नाव भगवानदास. त्याला दोन मुलं. मानसिंह (जो अकबराच्या दरबारात होता आणि मुघलांचा सेनापती होता) आणि माधोसिंह.
 
अकबर आणि मानसिंह यांच्या मोहिमांमध्ये माधोसिंह हा सहभागी होऊन लढला होता. 1574 मध्ये अकबराने जेव्हा पूर्वेकडील मोहीम काढली होती, तेव्हाही माधो सिंह त्याच्यासोबत होता. त्याने अकबर आणि राजा मान सिंह सोबत काश्मिर, अफगाणिस्तान, पंजाबच्या मोहिमांमध्येही सहभाग घेतला होता.
 
भानगढ ही याच माधो सिंहची जहागीर होती. भगवानदासने आपल्या मुलाच्या म्हणजेच माधो सिंहच्या निवासासाठी भानगढ बांधला होता, असं सांगितलं जातं. आसपासच्या परिसरात राजधानी वसवली गेली होती.
 
भानगढच्या किल्ल्याबद्दल माहिती देताना आर्किओलॉजिस्ट डॉ. विनय कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, 1570 मध्ये भानगढचा किल्ला बांधायला सुरुवात झाली असावी. 1600 च्या सुमारास किल्ल्याचं बांधकाम पूर्ण व्हायला आलं असेल.
 
या शहराची रचना पाहिल्यानंतर जाणवतं की प्रत्येक गोष्टीचं नियोजन काटेकोरपणे केलं होतं.
 
किल्ल्याची रचना
तुम्हाला या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला तीन तटबंदी ओलांडून जावं लागतं. या किल्ल्याला पाच दरवाजे होते.
 
किल्ल्यात बाजारपेठ होती. तिथे रोजच्या वापरासाठीच्या गोष्टी विकत मिळायच्या. सोन्याचांदीच्या दागिन्यांचा जोहरी बाजारही होता.
 
मनोरंजनासाठी नर्तिकेचा महालही असायचा. राज्याच्या मंत्र्यांची निवासस्थानं, काही धनिकांची घरंही किल्ल्यात होती. युद्धात हत्ती घोड्यांचा वापर व्हायचा. त्यामुळे किल्ल्यात स्वाभाविकपणे घोड्यांचे तबेले, अश्वशाळा होत्या.
शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता यावी म्हणून किल्ल्यात वॉच टॉवर किंवा टेहेळणीचा बुरूज असायचा. भानगढच्या किल्ल्यातही असाच बुरूज आहे. कैद्यांसाठी जेलही आहे.
 
एकूणच राजाच्या राजधानी प्रमाणे भानगढचा थाट होता. 1720 पर्यंत इथे जवळपास 9 हजार घरं होती. चांगलं नांदतं-जागतं शहर होतं हे.
 
मग अचानक काय झालं की, हा किल्ला ओस पडायला लागला? इतका ओसाड झाला की, इथे भूताखेतांचा वास आहे असं बोललं जाऊ लागलं आणि आज या किल्ल्याची प्रसिद्धीच तशी आहे?
 
साधूच्या शापाची कथा
भानगढच्या भग्नावस्थेशी अनेक वदंता, दंतकथा जोडलेल्या आहेत. त्यांपैकी दोन कथा सर्वांत प्रसिद्ध आहेत. एक आहे साधूच्या शापाची.
 
माधोसिंहने भानगढचा किल्ला बांधायला घेण्याच्याही खूप आधीपासून ही जागा बाबा बलाऊ नाथ नावाच्या साधूची ध्यानाची जागा होती. पण त्यानं एक अट घातली. किल्ल्यातली कोणतीही इमारत, वास्तू ही त्याच्या घरापेक्षा उंच नसली पाहिजे. जर कोणत्याही वास्तूची सावली त्याच्या घरावर पडली तर तो किल्ला निर्मनुष्य होईल.
 
माधो सिंहचा नातू अजाब सिंह साधूची ही अट विसरला. त्याने किल्ल्याची उंची वाढवली. त्याची सावली साधूच्या घरावर पडली आणि मग भानगढचा विध्वंस झाला.
 
राणी रत्नावतीची कहाणी
भानगढची दुसरी प्रसिद्ध कहाणी आहे राजकुमारी रत्नावतीची. ती अतिशय सुंदर होती. एका मांत्रिकाचं मन तिच्यावर जडलं.
 
राजकुमारी एकदा तिच्या मैत्रिणींसोबत बाजारात गेली होती. मांत्रिकाने तिला अत्तर खरेदी करताना पाहिलं. त्याने अत्तर बदलून त्या जागी प्रेमाचा अर्क ठेवला. राजकुमारीला हा कावा कळला आणि तिने मांत्रिकानं बदलेला अर्क एका शिळेवर ओतला. ती शिळा गडगडत त्या मांत्रिकावर कोसळली. तो त्याखाली चिरडून मेला. पण मरण्यापूर्वी त्याने या शहराला उद्धवस्त होण्याचा शाप दिला. नंतर मुघलांनी या शहरावर आक्रमण केलं. शहराचा संहार केला आणि अनेक लोक यात मारले गेले. राजकुमारी रत्नावतीही बचावली नाही. याच शापाची संहाराची छाया भानगढवर दिसते.
इथे टूर गाईड म्हणून काम करणाऱ्या संतोष प्रजापत यांनीही एका तांत्रिकाची गोष्ट सांगितली.
 
“ माधोसिंह इथला राजा होता आणि त्याची राणी होती रत्नावती. या माधोसिंह राजाची राजधानी होती भानगढ. साडे चारशे वर्षांपूर्वीचा हा किल्ला आहे. सिंगा सेवाडा नावाचा एक तांत्रिक होता. एक दिवस, एक रात्र म्हणजेच चोवीस तासांत हा किल्ला उद्ध्वस्त होईल अशी जादू त्यानं केली होती. इसवीसन 1605 मध्ये त्यावेळी भानगढमध्ये 14 हजार लोक राहात होते. तांत्रिकाच्या शापानंतर राजा आणि निम्मी प्रजा 24 तासांच्या आत इथून बाहेर पडले. उरलेली प्रजा या शापाला बळी पडली.”

ही जी जागा होती, ती जुनं जयपूर म्हणूनही ओळखलं जात होतं. कारण इथले जे लोक होते, ते आमेरला जाऊन राहिले. त्यानंतर तिथून त्यांनी जयपूर शहर वसवलं. त्यामुळे ते नवीन जयपूर आणि हे आहे जुनं जयपूर, असंही प्रजापती यांनी सांगितलं.
 
प्रजापत सांगतात, “ इथे सुपरनॅचरल, पॅरानॉर्मल गोष्टी घडतात. हा किल्ला झपाटलेला आहे असं सांगितलं जातं. रात्री या किल्ल्यातून चित्रविचित्र आवाज येतात. इथे जो कोणी येतो, तो परत जात नाही तो मरतो किंवा गायब होतो असं इथले स्थानिक सांगतात. इथे आधी जे लोक मृत्यूमुखी पडले होते, त्यांचे आत्मे भटकतात असंही लोक बोलतात.”
अनेक शतकं लोकमानसामध्ये रुजलेल्या या तांत्रिका-मांत्रिकांच्या, शापांच्या कथांमुळेच भानगढचा लौकिक ‘मोस्ट हाँटेड’ असा झाला का?
 
या किल्ल्यात सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तनंतर प्रवेश बंद आहे. यामागचं कारण काय? लोक सांगतात त्याप्रमाणे इथे खरंच काही चित्रविचित्र अनुभव येतात?
 
या किल्ल्यात खरंच भूताखेतांचा वास?
इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचे सिद्धार्थ बांटवाल याबद्दल सांगतात, “भानगढबद्दल तुम्हाला काही कॉमन दंतकथा ऐकायला मिळतात. त्यांपैकी एक आहे. राणी रत्नावतीची. ही सुंदर राणी त्या किल्ल्याची स्वामिनी होती. एका तांत्रिकाचं मन तिच्यावर जडलं. त्याला ती हवीशी वाटत होती. त्याला ती आपल्या आयुष्यात हवी होती. त्यानं तिला मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याला यश मिळालं नाही. शेवटी त्यानं तिथल्या सगळ्या लोकांना एक शाप दिला. त्यानंतर हा किल्ला झपाटलेला बनला.
 
"आम्ही अनेक वेळा भानगढला गेलो आहोत. 2012 साली आमची टीम पहिल्यांदा भानगढला गेली होती. एखादी पॅरानॉर्मल टीम भानगढला जाण्याची ती पहिलीच वेळ होती. आम्ही तिथे रात्रभर राहिलो होतो आणि सगळ्या किल्ल्याची खूप बारकाईने तपासणी केली.”
 
"आम्ही जो काही प्राथमिक तपास केला तो सगळा ज्या गोष्टी वाचल्या होत्या. त्यावर आधारलेला होता. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास आम्हाला तिथे काहीही अनैसर्गिक गोष्टी आढळल्या नाहीत," असं सिद्धार्थ बांटवाल यांनी सांगितलं.
 
भानगढचा हा किल्ला राजस्थानमधल्या सारिस्का व्याघ्र प्रकल्पाला लागूनच आहे. या किल्ल्यात पाण्याचे छोटे छोटे साठे आहेत. त्यामुळे इथं पाणी प्यायला जनावरं येतात.
टूर गाईड प्रजापत सांगतात की, "सारिस्का व्याघ्रप्रकल्पाच्या हद्दीत असल्याने या भागात दिवे नाहीयेत. आधीच ओस पडलेला किल्ला आणि त्यातून अंधार त्यामुळे इथे मोठ्या संख्येनं वटवाघळं आहेत. इतरही पशूंचाही वावर असतो. त्यामुळे इथं रात्री येणं धोकादायक आहे.
 
सिद्धार्थ बांटवाल सांगतात, "की या किल्ल्यात माकडं आहेत, जी झाडांवर राहतात. त्यांच्या हालचालींमुळे पानांचे, फांद्या कुरकुरल्याचे आवाज येतात. शांततेत येणारे असे आवाज, या किल्ल्याबद्दल पसरलेल्या कथा, तिथे राहणाऱ्या लोकांकडून ऐकायला मिळणाऱ्या गोष्टी या सगळ्याचा एक मानसिक परिणाम होतो. "
 
आताच्या घडीला भानगढचा किल्ला पाहिला, तर निम्म्याहून अधिक किल्ल्याची पडझड झाली आहे.
 
आर्किओलॉजिस्ट डॉ. विनय कुमार गुप्ता म्हणतात, “पुरातत्त्व शास्त्राचा विचार केला, तर एखादी जागा ओस का पडते? तिथे जर जगण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी उपलब्ध होत नसतील, तर ती जागा ओसाड होते. किंवा लोकांना ती जागा सोडूनच जावी लागेल असा जोरदार हल्ला झाला तरी ती जागा निर्मनुष्य होते. भानगढच्या बाबतीत या दोनपैकी एक शक्यता असू शकते.
 
किंवा दुसरी अशीही एक शक्यता असू शकते की दुष्काळामुळे तिथले पाण्याचे स्रोत आटले असतील. एखादा तीव्र दुष्काळ पडला असेल आणि किल्ल्यातले पाण्याचे स्रोत आटले असतील. हा किल्ला त्यामुळेही ओसाड पडला असेल.”
 
ऐतिहासिक, भौगोलिक किंवा इतर कोणतीही कारणं असोत, भानगढचा किल्ला ओस पडत गेला. त्यामुळेच कधीकाळी वैभवशाली असलेल्या या नगराची प्रसिद्धी ‘ओसाडवाडीच्या भूतां’मुळेच होत आहे. पण त्यामुळेच इथला इतिहास झाकोळला जातोय हे खरं

Published By- Priya Dixit