गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. बॉलीवूड 2009
Written By वेबदुनिया|

लेखाजोखा 2009 चा

बॉलीवूडसाठी 2009 हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. ब्लॉकबस्टर किंवा सुपर डुपर हिट असे म्हणता येईल असा एकही चित्रपट या वर्षी प्रदर्शित झाला नाही. अपेक्षा असणार्‍या चित्रपटांना प्रेक्षकांनी थारा दिला नाही. काहींवर झालेला खर्चच अतिप्रचंड असल्याने तो वसुल झाला नाही. काही चित्रपटाच्या कलावंतांना उगाचच जास्त किंमत दिली गेली, त्यामुळे चित्रपटाची भांडवल वसुली करणे जिकिरीचे गेले. कम्बख्त इश्क आणि ब्ल्यू ही त्याची उदाहरणे.

सुपरहिट चित्रपट
या श्रेणीत यावर्षाचा एकही चित्रपट घेता येणार नाही. गझनीचा समावेश करता येईल. पण तो गेल्या वर्षीच्या शेवटच्या आवड्यात रिलीज झाला होता. या वर्षी मात्र असा सणसणीत हिट चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार झाला नाही. सुपरस्टार शाहरूख खान आणि ह्रतिक रोशन यांचा एकही चित्रपट या वर्षी रिलीज झाला नाही. आमिर खानचा थ्री इडियट्स येत्या २५ डिसेंबरला रिलीज होईल. त्याची कामगिरी जाणून घेण्यासाठी पुढच्या वर्षाची वाट पहावी लागेल.

हिट चित्रपट
हॉलीवूडच्या २०१२ या चित्रपटाला रसिकांनी जोरदार गर्दी केली. इंग्रजीसह हिंदी व इतर भाषांतही तो रिलीज झाला. चित्रपट जोरदार चालला. रणबीर कपूर- कतरीना कैफ यांच्या अजब प्रेम की गजब कहानी यांनीही चांगले यश कमावले. रणबीरची किंमत बॉलीवूडमध्ये वाढली. सलमान खान अभिनित वॉंटेडही हिट ठरली. सलमानचा एक्शन हिरो लोकांना आवडला. आता त्याचा सीक्वेल बनविण्यात येत आहे.

सेमी हिट चित्रप
सैफ अली खानने निर्माता म्हणून या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्याच्या 'लव्ह आज कल' या चित्रपटाला शहरांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. संगीतही हिट ठरले. 9/11 च्या घटनेवर आधारीत न्यूयॉर्कही हिट ठरला. कतरीना कैफ, मधूर संगीत आणि कबिर खानचे दिग्दर्शन या जमेच्या बाजू ठरल्या. यशराज फिल्म्सचा हा वर्षातील एकमेव यशस्वी चित्रपट. स्लमडॉग मिलिनियरला ऑस्कर मिळाले तरी भारतात त्याला फार मोठे यश मिळाले नाही. केवळ प्रसिद्धीच्या जोरावर हा चित्रपट सेमी हिट या श्रेणीत टाकता येईल. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या 'पा' ला सेमी हिट म्हणता येईल. सतरा कोटी रूपयांत तयार झालेला हा चित्रपट अजूनही कमाई करतो आहे.

साधारण हिट
दे दना दन आणि ऑल दी बेस्ट बर्‍यापैकी चालले. ऑल दी बेस्टची सुरवात चांगली झाली नव्हती. पण पुढे माऊथ पब्लिसिटीचा फायदा मिळाला. दे दना दनच्या काही मंडळींना चक्क तोटा झाला. इमरान हाशमीचा 'राज- द मिस्ट्री कंटिन्यूज' ला बर्‍यापैकी यश मिळाले.

फ्लॉप चित्रप
अयशस्वी ठरलेल्या चित्रपटांची यादी मोठी आहे. त्यात बडे चित्रपटही अनेक आहेत. अक्षय कुमार व करीना कपूर अभिनित 'कम्बख्त इश्क' हा त्यापैकीच एक. चित्रपट पार आपटला. ब्ल्यू हा भारतातील महागड्या चित्रपटांपैकी एक होता. पण दणकून पडला. दहशतवादावर बनविलेल्या कुर्बान च्या पार चिंधड्या उडाल्या. 'रॉकेटसिंह-द सेल्समन ऑफ द इयर' चे रॉकेटच उडाले नाही. आशुतोष गोवारीकरच्या राशीला यंदा 'व्हॉट्स यूवर राशी'च्या निमित्ताने अपयश लागले. अलादिनचे यश बाटलीतच राहिले. मधूर भांडारकरच्या जेलच्या निमित्ताने अपयश पहावे लागले. सलमान व करीना कपूर यांचा 'मै और मिसेस खन्ना' वर तर चक्क चार दिवसांत टिव्हीवर डिटीएच सर्व्हिसद्वारे दाखविण्याची वेळ आली. या चित्रपटातून कोट्यवधीचे नुकसान झाले.

कौतुकाचे धनी
वेक अप सिड, कमीने, दिल्ली ६ आणि लक बाय चान्स हे चित्रपट समीक्षकांत चर्चिले गेले. पण निर्मात्यांना मात्र त्यातून काहीच फायदा झाला. तोटा व्हायचा तो झाला.