म्हणून अजय देवगणने त्याचे नाव बदलले
सर्वसामान्यांपासून ते अगदी सेलिब्रेटींपर्यंत प्रत्येकाची स्वतःची एक ओळख असते. ही ओळख त्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तित्त्व, नोकरी/व्यवसाय यातून जशी होत असते तशीच ती त्या व्यक्तीच्या नावावरूनही होत असते. खरंतर नावात काय आहे? असे दस्तुरखुद्द शेक्सपिअर म्हणून गेले असले तरी नावातच सगळे काही असल्याचा अनुभव बॉलिवूडच्या तारे-तारकांचा आहे. रुपेरी पडावर पदार्पण करताना बॉलिवूडच्या काही कलावंतांनी आपले खरे नाव बदलले आणि आता तेच त्यांचे खरे नाव झाले आहे. यामध्ये बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगणचाही समावेश आहे. नाव बदलण्यामागचे कारण स्वतः अजयनेच एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. एका मुलाखतीतत्याने सांगितले की, 'माझे खरे नाव विशाल आहे. मात्र, पदार्पणापूर्वी मला हे नाव बदलावे लागले. त्यावेळी 1991 मध्ये विशाल या नावाचे दोन-तीन अभिनेते बॉलिवूडध्ये पदार्पण करत होते. त्यापैकीच एक होता मनोज(कुमार) साहब यांचा मुलगा. दोघांपैकी एकाला नाव बदलणे गरजेचे होते. म्हणून मी माझे नाव बदलले.'