मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : बुधवार, 27 मार्च 2019 (14:59 IST)

तानाजी- द अनसंग वारियरसाठी करावी लागणार प्रतीक्षा

अजय देवगणचा बहुप्रतिक्षीत चित्रपट 'तानाजी- द अनसंग वारियर' कायम चर्चेत आहे. गत 25 सप्टेंबरला या चित्रपटाचे शूटिंग सुरु झाले. यानंतर चित्रपटाचे 60 टक्के शूटिंग पूर्ण झाल्याची बातमी आली. पाठोपाठ याचवर्षी 22 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होईल, अशी बातमी आली. पण आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल एक मोठा खुलासा झालाय. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली आहे. होय, 
 
'तानाजी- द अनसंग वारियर' आता यंदा नाही तर पुढील वर्षी 10 जानेवारीला रिलीज होईल, असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच चित्रपटाची रिलीज डेट दोन महिने लांबणीवर टाकत आली आहे. एकंदर काय तर अजयच्या चाहत्यांना 'तानाजी'साठी 2020 ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 'तानाजी-द अनसंग वारियर' हा एक बिग बजेट चित्रपट आहे. 150 कोटी रूपये खर्चून हा चित्रपट बनवण्यात येणार आहे. व्हीएफएक्सवरही मोठा खर्च होणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित या चित्रपटात अजय देवगण मराठी योद्धा तानाजी मालुसरेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. अजय दीर्घकाळापासून या प्रोजेक्टवर काम करत होता. स्वतः अजय या चित्रपटाबद्दल कमालीचा उत्सुक आहे. कोंढाणा जिंकूण आणण्यासाठी तानाजींनी प्राणांची बाजी लावली होती. तानाजी हे बारा हजार हशांचे (पायदळ) सुभेदार होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या काही सहकार्‍यांनीदेखील शेवटच्या श्र्वासापर्यंत स्वराज्य मिळवण्यासाठी लढण्याची शपथ घेतली होती. तानाजी हे शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकार्‍यांपैकी एक होते.