अमिताभ यांना नवी दिल्ली बार कौन्सिलकडून नोटीस
एका जाहिरातीमध्ये अमिताभ यांनी वकिलाचे कपडे घातल्यामुळे त्यांनी नवी दिल्ली बार कौन्सिलकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. एका जाहिरातीसाठी बीग बींनी पांढरा शर्ट, काळा कोट असा वकिलाचा वेश परिधान केला होता. मात्र, त्यावर आक्षेप घेत बार कौन्सिलनी त्यांच्यासह एव्हरेस्ट मसाले, युट्यूब आणि जाहिरातीसंबंधीच्या मीडिया हाऊसला नोटीस पाठवली आहे.
अशाप्रकारच्या खासगी जाहिरातीमध्ये गणवेश घालण्यापूर्वी त्यांनी योग्य ती काळजी घेतलेली नाही. त्यामुळे ही जाहिरात तातडीने ऑफ एअर करावी अर्थात बंद करावी असा आदेश या नोटिसमध्ये देण्यात आला आहे. याशिवाय यापुढे कोणत्याच खासगी जाहिरातीमध्ये अशाप्रकारे गणवेश वापरला जाणार नाही याची संबंधितांनी काळजी घ्यावी, असंही सांगण्यात आलं आहे. भविष्यात आम्ही वकिलांचा गणवेश परवानगीशिवाय वापरणार नाही, असं लिखीत स्वरुपात देण्याची मागणीही बार कौन्सिलनं केली आहे. या सर्व प्रक्रियेसाठी बार कौन्सिलने अमिताभ बच्चन आणि जाहिरातीशी संबंधित अधिकाऱ्यांना १० दिवसांची मुदत दिली आहे.