शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (15:04 IST)

अभिनेता राजपाल यादवविरोधात तक्रार दाखल; काय आहे नेमके प्रकरण

rajpal yadav
मुंबई : बॉलीवूड अभिनेता राजपाल यादव अडचणींत सापडला असल्याची बातमी समोर आली आहे. राजपाल यादवच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कर्नलगंजमध्ये सोमवारी गोंधळ झाला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कॉमेडी अभिनेता राजपाल यादववर एका विद्यार्थ्याने गाडीने धडक दिल्याचा आरोप केला आहे. उलट राजपाल यादवने देखील विद्यार्थ्यावर आरोप केले आहेत. या प्रकरणामुळे राजपाल यादवचे चाहते चिंतेत पडले आहेत.
 
राजपाल यादव उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराजच्या कटरा एरियामध्ये चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंग दरम्यान त्याला मोटरबाईक चालवायची होती. यादरम्यान त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने एका विद्यार्थ्याला गाडीने ठोकले. यानंतर विद्यार्थ्याने सिनेमाच्या टीमवर आरोप करत पोलिसांकडे थेट यांसदर्भात तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी राजपाल यादवने देखील पोलिसांकडे काही लोक शूटिंगमध्ये व्यत्यय आणत होते, अशी तक्रार दाखल केली आहे.
 
या प्रकरणामध्ये आता पोलिसांचे म्हणणे आहे की अभिनेता एक जुनी मोटर बाईक चालवत होता, ज्याचे क्लच वायर तुटले आणि चुकून अभिनेत्याने मोटरबाईकने विद्यार्थ्याला ठोकले. विद्यार्थ्याला या घटनेत दुखापत झालेली नाही असे देखील पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. हा गोंधळ उडाल्यानंतर काही काळाने पुन्हा शूटिंगला सुरुवात करण्यात आली आहे.
 
काय आहे नेमके प्रकरण 
मिळालेल्या माहितीनुसार, राजपाल यादवचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी टॉकीज’ मधील एका सीक्वेन्सचे शूटिंग सुरू आहे. हे शूटिंग खूप सकाळी होत होते. सिनेमाचे शूटिंग पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी तेथे झाली होती. तिथे काही शालेय विद्यार्थी देखील होते. राजपाल यादव मोटरबाईक चालवत होता, परंतु अचानक त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याने त्या विद्यार्थ्याला गाडीने धडक दिली. विद्यार्थ्याने त्यानंतर आरोप केला आहे की, या प्रकरणानंतर सिनेमाच्या टीमने त्याची माफी मागितली नाहीच उलट त्याला शिवीगाळ केली आणि मारले देखील. तर सिनेमाच्या टीमने आरोप केला की लोकांना सिनेमाच्या शूटचे रेकॉर्डिंग करू नका असे सांगून देखील काही लोक तिथे मोबाईलने शूट करत होते.
 
राजपाल यादव बॉलीवूडचा प्रसिद्ध विनोदी कलाकार आहे. त्याला ‘वक्त’, ‘डरना मना है’, ‘ढोल’ अशा सिनेमातून आपण पाहिलेले आहे. तो सिनेमांमुळेच नाही तर अनेकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आला आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor