गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (14:49 IST)

अॅनिमलमधला रणबीर कपूरचा 'अल्फा मेल' आहे काय? तो धोकादायक का आहे?

नासिरुद्दीन
 
सध्या सगळीकडे अॅनिमल या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वानगा रेड्डी आहेत; तर रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
 
आता हा चित्रपट हिट झाल्याचा आणि बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवत असल्याचा दावा केला जातोय. खरं तर कमाईवर चित्रपटाचं यश मोजलं जातं.
 
पण हे पैसे कमवण्यासाठी कोणत्या धाटणीचे चित्रपट बनवले जातात हे पाहणं मनोरंजक आहे.
 
चित्रपटातून नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला जातोय? चित्रपट कोणता संदेश देण्यात यशस्वी झाला आहे? त्यांनी कोणत्या समाजाची कल्पना केलीय?
 
साधी कल्पना जरी केली तरी हा चित्रपट धोकादायक वाटतो. यातून कोणत्याही प्रकारे मनोरंजन होत नाही. सामाजिक स्तरावर तर हा चित्रपट धोकादायक आहेच, पण यातून पूर्वग्रहांना बळकटी मिळते.
 
यात आधुनिक स्त्रियांविषयी सांगितलं गेलंय, पण त्यांच्या आयुष्यावर त्यांचं नियंत्रणच नाहीये. मुस्लिमांची एक वेगळीच प्रतिमा तयार केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातून हिंसक पुरुषत्वाला बळ दिलं जातंय.
 
हिंसेचा धोकादायक भ्रम
या चित्रपटाचा मूळ विषय आहे बदल्याची भावना आणि हिंसाचार. आणि यात काही किरकोळ मारामारी किंवा हिंसा नाही. तर अगदीच पुढच्या पातळीची हिंसा यात दाखवली आहे. पडद्यावर चारी बाजूंनी गोळ्या, रक्त हिंसाचाराचा आभास निर्माण होतो.
 
यात हिंसाचाराचं अत्यंत बीभीत्स रूप पाहायला मिळतं. सर्वात क्रूर वागणूक दिली जाते. खुनाच्या भयानक पद्धती पाहायला मिळतात. हे सर्व केवळ खलनायक करत नाही, तर नायक हे सगळं करताना दिसतो.
 
नायक जे काम करतो त्यातून त्याची गुणवत्ता समजते. कधीकधी बाहेरील जगात त्याच्या वागण्याचं अनुकरण देखील केलं जातं.
 
मग स्वाभाविकपणे प्रश्न पडतो की चित्रपटात केवळ हिंसा का दाखवली आहे? चित्रपटात हिंसाचाराचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलाय की त्यातून धडा घेतला पाहिजे?
 
या चित्रपटात असं काहीही दिसत नाही. उलट, उपाय म्हणून देखील त्यांनी हिंसाचारच दाखवला आहे. या अर्थाने ही हिंसा कोणत्याही परिस्थितीत असह्य व्हायला हवी.
 
पण प्रेक्षक त्या हिंसाचारात आणि रक्तात गुंतून जातात. तो हिंसाचार आणि त्याच्या चेहऱ्यावर पसरलेल्या रक्ताचा आनंद घेतो.
 
'अल्फा मेल'ची रचना
चित्रपटात एक शब्द वारंवार आलाय - अल्फा मेल! हा अल्फा मेल काय आहे?
 
चित्रपटात, रणबीर कपूरचा आणि रश्मिकाचा संवाद सुरू असतो. यात तो तिला सांगतो की, "सदियों पहले अल्फा मर्द कैसे होते थे- स्ट्राँग बंदे! मर्द बंदे! जंगलों में घुसकर शिकार कर लाते थे. वह शिकार बाकी सब में बँटता था."
 
चित्रपटाचा नायक नायिकेला सांगतो की, स्त्रिया जेवण बनवायच्या. त्या मुलांना आणि सगळ्यांना खाऊ घालायच्या.
 
त्या फक्त जेवणच बनवायच्या नाहीत तर आपल्याला कोणत्या शिकारी पुरुषापासून मुलं होतील, त्यांच्यासोबत कोण राहणार आणि त्यांचं संरक्षण कोण करणार? हे देखील ठरवायच्या. समाज असाच चालतो.
 
तो पुढे तिला सांगतो, की त्याउलट दुबळे पुरुष देखील होते. ते काय करायचे? स्त्रिया त्यांच्याकडे कशा जाणार? त्यामुळे त्यांनी कविता करायला सुरुवात केली. स्त्रियांना भुरळ घालण्यासाठी ते आपल्या कवितांमध्ये चंद्र-तारे आणू लागले.
 
समाजासाठी जे काही करतात ते फक्त अल्फा पुरुषच करतात. दुबळे पुरुष फक्त कविता लिहितात.
 
एवढंच नाही तर त्याच्या मते शारीरिकदृष्ट्या कमी बलवान लोक समाजासाठी निरुपयोगी असतात. त्यांचा काही उपयोग नाही. त्यामुळे समाजात अशीच माणसे जन्माला यायला हवीत जी ताकदवान असतात.
 
ही कल्पनाच मुळात प्रचंड धोकादायक आहे.
 
एका क्षणी नायक नायिकेकडे बघतो आणि इंग्रजीत म्हणतो, "तुझा पार्श्वभाग मोठा आहे. तू तुझ्या शरीरात सुदृढ बाळाला वाढवू शकतेस."
 
नायिकेचा दुसऱ्या एका तरुणासोबत साखरपुडा ठरलेला असतो. नायक तिला सांगतो की, तो तरुण कविता करणारा पुरुष आहे. तर नायक स्वतःला अल्फा पुरुष मानतो. त्यामुळे तिने त्या तरुणाला सोडून माझ्याकडे यावं असं नायकाचं म्हणणं असतं. नंतर ती त्याच्याकडे येते आणि त्याच्याशी लग्नही करते.
 
हा अल्फा पुरुष महिलांना काय सांगण्याचा प्रयत्न करतोय?
आजच्या स्त्रियांना शतकानुशतके जुन्या गोष्टी का सांगितल्या जात आहेत? तिने पुरुषासोबत कसं राहावं हे पुरुष तिला का सांगतोय? कोण नेमका पुरुष आहे आणि कोण नाही हे आजच्या मुलींना का सांगितलं जातंय?
 
चित्रपटात ही गोष्ट स्पष्ट होते.
 
रणबीर कपूरला एक मोठी बहीण असते. तिने परदेशातून एमबीए केलेलं असतं. लग्न झाल्यावर ती घरी राहत असते. रणबीरला तिचा नवरा आवडत नाही.
 
तो म्हणतो, "मी लहान होतो, नाहीतर तुझं लग्न होऊ दिलं नसतं."
 
त्याचा मेहुणा त्याच्या वडिलांच्या हत्येच्या कटात सहभागी असतो. अशा प्रकारे चित्रपटात बहिणीचा निर्णय कसा चुकीचा आहे हे दाखवलं आहे. नायकाचा मुद्दा बरोबर दाखवला जातो.
 
म्हणूनच तो त्याच्या धाकट्या बहिणीला म्हणतो, "तुझ्या गळ्यात जो कोणी मंगळसूत्र घालेल, त्याच्या हातावरची एकेक रेष मी तपासेन. मी तुझ्यासाठी स्वयंवरच आयोजित करेन."
 
एवढंच नाही तर तो आपल्या बहिणीला मुलगी म्हणून कोणती दारू प्यावी हे देखील सांगतो. हे पितृसत्ताक समाजाचं एक प्रेमळ रूप आहे. इथे प्रेम दाखवून लोकांच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवलं जातं.
 
अल्फा म्हणजे दबंग, गुंडगिरी, विखारी पुरुषत्व
असे पुरुष दबंग असतात, गुंडगिरी करतात. ते लोकांवर, महिलांवर नियंत्रण ठेवतात. लोक त्यांना घाबरतात. भीतीने त्यांचा आदर करतात.
 
वास्तविक या चित्रपटाचा नायक सर्वांचा रक्षक बनण्याचा प्रयत्न करतो. कोणत्याही अडचणीवर त्याच्याकडे हिंसा हा एकमेव उपाय असतो.
 
तो शाळेत असतो तेव्हा देखील हेच करतो. त्याच्या बहिणीला कॉलेजमधील काही मुलं त्रास देत असतात.
 
रणबीरला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा तो मोठ्या बहिणीसोबत तिच्या वर्गात जातो. वर्गात बंदूक चालवतो. आणि मोठ्या गर्वाने म्हणतो, 'मी तुझ्या सुरक्षेसाठी काहीही करू शकतो.'
 
थोडक्यात मोठ्या बहिणीची सुरक्षा लहान भाऊ करतोय असं दाखवलं. हे सर्व समजल्यानंतर वडील अनिल कपूर यांना खूप राग येतो.
 
मग तो आपल्या वडिलांना म्हणतो, "अशा संपत्तीचा काय उपयोग, जर मला माझ्या बहिणीचं रक्षणच करता येत नसेल? त्याच्या वडिलांनंतर तोच आहे जो कुटुंबाचं रक्षण करू शकतो."
 
का? कारण तो 'पुरुष' आहे...जरी वयाने लहान असला तरी.
 
पितृसत्ताक पद्धतीवर आधारित चित्रपट
आपल्या समाजात पितृसत्ताकतेची मुळं किती खोलवर रुजली आहेत हे पाहायचं असेल तर ते या चित्रपटात दिसतं.
 
पितृसत्ताक पद्धती कशी चालते याचं हे उदाहरण आहे. बाप, बाप आणि बाप...या चित्रपटाच्या मूळ गाभ्यामध्येच याचा समावेश आहे.
 
चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच मुलाची वडिलांविषयी ओढ दिसून येते. पण ही आसक्ती म्हणजे सामान्य पिता-पुत्राचे प्रेम नाहीये. त्याला आपल्या वडिलांसारखं व्हायचं असतं. त्याच्या आयुष्यात आई गौण आहे.
 
वडिलांसाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त भेट म्हणून तो त्याचे लांब केस कापतो.
 
पुढे तो रागात घर सोडतो, पण जेव्हा त्याच्या वडिलांवर हल्ला होतो तेव्हा तो बदला घेण्यासाठी परदेशातून येतो. चित्रपटात वडिलांचे वडील, त्यांचे भाऊ, भावांचे मुलगे... म्हणजेच पुरुषांचं सक्रिय जग आहे. त्या जगात स्त्रिया कठपुतळ्यांसारख्या दिसतात.
 
या समानतेमुळे स्त्रियांच्या पदरात काहीच पडणार नाही
चित्रपटात अनेक ठिकाणी नायिका नायकाशी वाद घालताना आणि एक-दोन ठिकाणी कानाखाली मारताना दिसते. याला समानता म्हणायची का?
 
या समानतेला काही अर्थ नाही. कारण इतकं करूनही शेवटी ती त्याच्याच इशाऱ्यावर चालते.
 
एके ठिकाणी नायक म्हणतो, लग्नात भीती असली पाहिजे. जर ती भीती संपली, तर मग सगळं संपलं.
 
चित्रपटात नायिका स्वत:च्या इच्छेनुसार गाऊनसारखा पोशाख घालते तर यावर नायक आक्षेप घेतो.
 
संपूर्ण चित्रपटात नायिका एकतर सलवार कुर्ता किंवा साडीत दिसते. ती संस्कारी असून धार्मिक प्रथा परंपरा पाळणारी आहे, असं दाखवलं आहे.
 
अल्फा पुरुषत्व आणि लैंगिकता
प्रबळ पुरुषत्वाचा लैंगिकतेशी खोल संबंध असतो. तो लैंगिक संबंधांबद्दल खूप चिंतेत आहे असंही दाखवलं आहे. तो लैंगिक संबंधांमध्ये किती श्रेष्ठ आणि ताकदवान आहे हेही दाखवलं आहे.
 
त्याच्या लैंगिक इच्छा किती तीव्र आहेत हे तो त्याच्या कृतीतून दाखवतो. ही गोष्ट या चित्रपटात अनेक पातळ्यांवर पुन्हा पुन्हा पाहायला मिळते.
 
केवळ नायकच नाही तर खलनायकही त्याला वाटेल तेव्हा आणि कुठेही शरीर संबंध ठेवत असतो. इतकंच नाही तर त्याचे पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीशी संबंध असतात. तिच्या अंगावर उमटलेले व्रण तो अभिमानाने पाहतो.
 
त्याच्यासाठी हे अल्फा मॅनचं लक्षण आहे. याउलट स्त्रिया निष्क्रिय दिसतात. जे काही करतात ते पुरुषच करतात. चित्रपटाची दूसरी एक बाजू म्हणजे त्यात दाखवलेले लैंगिक संबंध.
 
शत्रू धर्म बदलतो
ज्या कुटुंबात रणबीर कपूरचा जन्म झाला ते बऱ्यापैकी श्रीमंत असतात. वडील अनिल कपूर यांचा स्टीलचा व्यवसाय असतो. स्वस्तिक असं कंपनीचं नाव असून सत्ता, प्रगती, विजय हे त्याचं सूत्र असतं.
 
त्यांचं मोठं संयुक्त कुटुंब असतं. मालमत्तेच्या वादातून कुटुंबातील एक भाऊ विभक्त होतो.
 
तो परदेशात जाऊन मुस्लिम बनतो. चित्रपटात असं दाखवायचं आहे की शत्रू धर्म बदलतो किंवा दुसऱ्या धर्माचे लोक शत्रू असतात.
 
तो मुस्लीम झाल्यानंतर त्याला अनेक बायका आणि अनेक मुलं दाखविण्यात आली आहेत.
 
एवढंच नाही तर त्याच्या मुलालाही तीन बायका आहेत. तुमच्या काही लक्षात येतंय का? यावरून काही द्वेषपूर्ण घोषणा लक्षात येतात का?
 
'जसं की हम पाच, हमारे पच्चीस.'
 
मुस्लिम झालेल्या या कुटुंबाला स्वस्तिक कंपनी मिळवायची आहे. ते खूप क्रूर असून इतरांसाठी धोका आहेत असं चित्रपटात दाखवलं आहे.
 
त्याला संपवण्यासाठी कुटुंबातील उर्वरित सदस्य एकत्र येतात. ते एका मोठ्या मुस्लिम शत्रूला संपवतात.
 
पण या शत्रूचा धोका कायम आहे. स्वस्तिक वाचलं असलं तरी भविष्यात धोका उत्पन्न होऊ शकतो.
 
यातून आपल्या समाजाबद्दल काही सांगितलं आहे का?
 
आज सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, हा चित्रपट इतका लोकप्रिय कसा होतोय? चित्रपटाच्या प्रेक्षकांमध्ये मुली आणि महिलांचाही मोठा वर्ग आहे, त्या असा पुरुषीपणा कसा खपवून घेऊ शकतात?
 
चित्रपट हे एक सशक्त माध्यम आहे. त्याचा लोकांच्या मनावर परिणाम होतो. हा समाजाचा आरसा आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचा समाज घडवायचा आहे हे सांगण्याचं माध्यम आहे.
 
आपला देश आणि समाज सध्या पुरुषी वर्चस्वाच्या टप्प्यातून जात आहे. अशा पुरुषत्वाचा परिणाम राष्ट्र, धर्म, समाज, संस्कृती यांमध्ये दिसून येतो.
 
स्त्रिया यापासून अलिप्त राहू शकत नाहीत.
 
या चित्रपटाची चर्चा महत्त्वाची आहे, कारण...
खरं तर या हिट चित्रपटावर चर्चा होणं गरजेचं आहे कारण असे चित्रपट सहसा वादाला तोंड फोडतात. ती चर्चा स्त्रियांना किती स्वातंत्र्य असावं आणि पुरुष कसा असावा याविषयी आहे.
 
अशा चित्रपटांमुळे आपण कशा समाजाची कल्पना करतो याचा अंदाज येतो. 'अ‍ॅनिमल' नावाचा हा चित्रपट ज्या प्रकारचा अल्फा मेल दाखवतोय, तो पुरुषांना एका विशिष्ट चौकटीत कैद करतोय.
 
इतकंच नाही तर अल्फा मेल महिलांनाही एका भूमिकेत बंदिस्त करतो. तो तिला स्वातंत्र्य तर देतो, पण त्याची दोरी स्वतःच्या हाती ठेवतो.
 
मुलींनी आधुनिक शिक्षण घ्यावं, पण त्यांच्या प्राथमिक जबाबदाऱ्या काय आहेत, हे अल्फा मेल ठरवतो. आई, बहिण किंवा पत्नी या सगळ्याच स्त्रियांनी घरातील लोकांची काळजी घेण्याचं काम करावं.
 
तिने कोणता पोशाख घालायचा, काय प्यायचं हे ती न ठरवता तो ठरवणार. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शतकानुशतके पुरुषांच्या हातात होती आणि आजही आहे. कारण ते साधेसुधे पुरुष नाहीयेत, ते अल्फा आहेत. शारीरिकदृष्ट्या मजबूत. बदला घेणारे.
 
चित्रपटानुसार हे गुण नसलेले पुरुष दुर्बल आहेत. ते कविता करतात. पण ही एक धोकादायक कल्पना आहे. समाजातील बहुतेक पुरुष असेच आहेत.
 
अल्फा जन्मला येत नाहीत, अल्फा तयार होतात. अल्फा पुरुष तयार होणं महिला आणि समाजासाठी हानिकारक आणि धोकादायक आहे.
 
या चित्रपटात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांची सविस्तर चर्चा करता येईल.
 
आणि शेवटी माणसाला 'अॅनिमल' अर्थात पशू म्हणावं का? आणि म्हणायचं तर ते कोणत्या प्रकारचे पशू आहेत? अशा लोकांच्या गुणांची यादी बनवायची तर ती कशी बनेल?
 
ती यादी पाहिल्यानंतर पशूंच्या समूहातील एखाद्याने हरकत घेतल्यास काय करणार? पशुंसोबत होणारी ही तुलना खरोखरच योग्य असेल का?
 
एवढंच नाही तर ज्याला पशू म्हणून संबोधलं जातंय त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण करण्यासाठीच हा चित्रपट आहे. तोच नायक आहे.
 
म्हणजे जर अशा विखारी पुरुषी स्वभावाला कोणी पशू म्हणत असेल तर ती टीका न मानता त्याला स्तुती म्हटलं पाहिजे.