मोहर सिंह मीणा
अनेक दिवसांपासून माध्यमांमध्ये बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ या जोडीच्या लग्नाच्या बातम्या येत आहेत. या दोघांनीही याला दुजोरा दिलेला नाही. मात्र, राजस्थानात प्रशासनानं या दोन्ही सेलिब्रिटींच्या लग्नासाठी कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी तयारी सुरू केली आहे.
सवाई माधोपूरमध्ये शुक्रवारी ( 3 डिसेंबर) जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांच्या अध्यक्षतेत एक बैठक बोलण्यात आली. त्यात वेडिंग प्लानर्स, हॉटेलचे मालक, पोलिस अधीक्षक यांच्यासह सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
"स्थानिक प्रशासनाची बैठक घेतली आहे. चौथ का बरवाडामध्ये स्वच्छता आणि कायदा तसंच सुव्यवस्था राखण्यासाठी निर्देश दिले आहेत. काही घटना घडू नये आणि वाहतूक सुरळीत चालावी यासाठी चर्चा करण्यात आली आहे," असं बैठकीनंतर सवाई माधोपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांनी बीबीसीबरोबर बोलताना म्हटलं.
लग्नाचा सोहळा 7 ते 10 डिसेंबरपर्यंत चालेल आणि त्यात 120 पाहुणे उपस्थित असतील, असं त्यांनी सांगितलं. या दरम्यान कोरोनाबाबतची काळजी घेतली जाईल, अशी माहितीही देण्यात आली.
"कोव्हिडच्या दिशानिर्देशांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांचे दोन डोस पूर्ण झालेले असणं गरजेचं आहे. हॉटेल व्यवस्थापनही त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी हेल्प डेस्कची व्यवस्था करत आहेत. पाहुण्यांची आरटीपीसीआर चाचणीही आवश्यक असेल. लसीकरण नसेल त्याला जाऊ दिलं जाणार नाही," असं जिल्हाधिकारी राजेंद्र किशन म्हणाले.
यापूर्वी सवाई माधोपूर जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी सुरेश गुप्ता यांनी बीबीसीबरोबर बोलताना या बैठकीबाबत बोलताना सवाई माधोपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एक पत्र मिळाल्याच्या वृत्ताला दुजोराही दिला.
"अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री कॅटरीना कैफ यांच्या विवाह सोहळ्याच्या आयोजनाआधी गर्दीवर नियंत्रण आणि कायदा तसेच सुव्यवस्थेच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करता, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 3.12.2021 रोजी सकाळी 10:15 वाजता बैठक आयोजित केली आहे," असं सवाई माधोपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. सूरज सिंह नेगी यांनी या पत्रात स्पष्ट लिहिलं आहे.
राजस्थानात सवाई माधोपूर जिल्हा मुख्यालयापासून 18 किलोमीटर अंतरावर चौथ का बरवाडामध्ये एका डोंगरावर असलेल्या जवळपास 700 वर्षे जुन्या किल्ल्याचं रुपांतर हॉटेलमध्ये केल्यानंतर प्रथमच याठिकाणी होत असलेल्या विवाहाबाबत देशभरात चर्चा सुरू आहे.
मात्र, कॅटरिना किंवा विक्की कौशल यांनी अद्याप या लग्नाबाबत घोषणा केलेली नाही. पण लग्नाच्या कार्यक्रमांसाठी चार डिसेंबरपासून पाहुणे यायला सुरुवात झाली आहे.
बरवाडा फोर्टमध्ये लग्नासाठी पाहुण्यांसाठी चार ते बारा डिसेंबरपर्यंत रूम, सुईट बूक करण्यात आले आहेत.
लग्नासाठी पाहुणे चार डिसेंबरपासून दाखल व्हायला सुरुवात झालीय. मात्र, मिडिया रिपोर्ट्सनुसार कॅटरिना कैफ आणि विक्की कौशल सहा डिसेंबरला सवाई माधोपूरला पोहोचतील.
लग्नाबाबत हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर, त्यांनी याबाबत काहीही माहिती देण्यास नकार दिला.
हॉटेलमध्ये सहा ते आठ डिसेंबरपर्यंत रूम बूक करण्यासाठी संपर्क केला असता हॉटेल व्यवस्थापनानं सात ते आठ डिसेंबरपर्यंत फोर्टमध्ये बुकींग नसल्याचं सांगत स्पष्ट नकार दिला.
एका स्थानिक पत्रकाराच्या मते, पाहुण्यांच्या सुरक्षेत तैनात बाऊन्सर आणि गाड्यांच्या ड्रायव्हरसाठी जवळच्या हॉटेल आणि धर्मशाळांमध्ये बुकींग करण्यात आलं आहे.
700 वर्षे जुन्या किल्ल्यात होणार लग्न
राज्यातील शाही विवाह सोहळ्यांचा विचार करता उदयपूरमध्ये अनेक मोठे उद्योगपती आणि बॉलिवूड सेलिब्रिटीजचे विवाह झालेले आहेत. मात्र, सवाई माधोपूरमध्ये प्रथमच विवाह होत आहे.
सवाई माधोपूरमध्ये चौथ का बरवाडामध्ये बरवाडा फोर्टमध्ये एक आलिशान हॉटेल तयार करण्यात आलं आहे. रिपोर्टनुसार नुकत्याच सुरू झालेल्या याच हॉटेलमध्ये कॅटरिना आणि विक्की कौशल यांचा विवाह सोहळा होणार आहे.
या हॉटेलचा शुभारंभ याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात झाला होता. त्याच्या उद्घाटनासाठी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा याठिकाणी आली होती.
या किल्ल्याप्रमाणेच सवाई माधोपूरमध्ये प्रथमच विवाह सोहळा होत आहेत.
कॅटरिना आणि विक्की कौशल यांच्या मॅनेजरच्या टीम हॉटेलमध्ये लग्नाची सर्व तयारी करत आहेत, अशी माहिती मिळत आहे.
एका स्थानिक पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार, बरवाडा फोर्टमध्ये 48 रूम, सुईट आहेत. एका दिवसासाठी त्याचं भाडं 50,000 ते 7 लाख रुपयांपर्यंत आहे.
कॅटरिना आणि विक्की कौशलसाठी वेगवेगळे सुईट बूक करण्यात आले आहेत. त्याचं एका दिवसाचं भाडं सात लाख रुपयांपर्यंत आहे.
"लग्न सोहळ्यात 120 पाहुणे सहभगी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच सात ते दहा डिसेंबरपर्यंत विवाह सोहळ्याचे कार्यक्रम असतील, असं मला सांगण्यात आलं आहे," असं सवाई माधोपूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र किशन यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
विवाह सोहळ्याची सुरुवात 7 डिसेंबरला संगीतच्या कार्यक्रमानं होईल. तर लग्न सोहळा 9 डिसेंबरला होईल. मेंदीचा कार्यक्रम 8 डिसेंबरला होईल, असंही सांगण्यात आलं आहे. त्यासाठी जगप्रसिद्ध सोजतची मेंदी मागवण्यात आली आहे, असं एका स्थानिक पत्रकारानं हॉटेलच्या एका सूत्राच्या हवाल्यानं सांगितलं.
"आमच्या मॅनेजरला जयपूरच्या एका इव्हेंट कंपनीचा कॉल आला होता. त्यांनी कॅटरीना कैफच्या लग्नासाठी मेंदीबाबत चर्चा केली होती," असं सोजतच्या मेंदीसाठी प्रसिद्ध पाली जिल्ह्यातील नॅचरल हर्बल कंपनीचे नीतिश अग्रवाल यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं. याबाबत अधिक सांगण्यास त्यांनी नकार दिला.
विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची नावं समोर आलेली नाहीत. मात्र या सोहळ्यात बॉलिवूडसह उद्योग जगत आणि राजकारणाशी संबंधित बड्या हस्तीही सहभागी होतील, असं सांगितलं जात आहे.
"अद्याप आमच्याकडे पाहुण्याची यादी आलेली नाही. तसंच आम्ही यादी मागितलेलीही नाही. जो मार्ग असेल त्यावर सुरक्षा व्यवस्था तैनात असेल," असं पाहुण्यांच्या व्हीआयपी सुरक्षा व्यवस्थेबाबत सवाई माधोपूरचे पोलिस अधीक्षक राजेश सिंह यांनी बीबीसीबरोबर बोलताना सांगितलं.
मीडिया रिपोर्ट्सनुसार सोहळ्यात सहभागी होणाऱ्या पाहुण्यांनाही माहिती सार्वजनिक करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.