सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 8 जानेवारी 2024 (12:32 IST)

मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल - आशुतोष गोवारीकर

चित्रपट महोत्सव हा माझ्यासाठी मास्टर क्लास - आशुतोष गोवारीकर
९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप
 
छत्रपती संभाजीनगर: आपण जेंव्हा गुजराती आणि बंगाली चित्रपटांबद्दल बोलत असतो तेंव्हा तो एका विशिष्ट राज्याचा असतो. मात्र, इथे विभागीय चित्रपटांसह जागतिक चित्रपट पाहायला मिळत आहेत. मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनू शकेल, जिथे चित्रपट येतील आणि ते राष्ट्रीय स्तरावर पोहचतील असे प्रतिपादन सुप्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी यावेळी केले.
 
जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत संपन्न झाला, यावेळी गोवारीकर बोलत होते. 
 
या समारोप समारंभास विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, भारतीय सिनेमा स्पर्धा गटाचे ज्युरी चेअरमन धृतिमान चॅटर्जी, फ्रिप्रेस्की इंडियाचे ज्युरी चेअरमन एन मनू चक्रवर्थी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक अशोक राणे, महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सव संयोजक निलेश राऊत आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश झोटिंग व पूर्वी भावे यांनी केले, तर प्रास्ताविक नंदकिशोर नंदकिशोर कागलीवाल यांनी व आभार प्रा. शिव कदम यांनी मानले.
 
गोवारीकर पुढे म्हणाले, आपल्याकडे इतकी राज्ये आहेत, प्रत्येक राज्याची एक भाषा आहे, संस्कृती आहे, विशेषता आहे आणि या संबंधित भागातील प्रत्येक जण आपली संस्कृती चित्रपटाच्या माध्यमातून दाखवीत असतो. तसे हॉलीवूडच्या बाबतीत नाहीये. विशेषत: आपण इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊनही आपल्या देशाची एकता जपत सिनेमा बनवतो.  
 
मी अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात येऊन मनस्वी आनंदी झालो आहे. कमी कालावधीत या महोत्सवाने खूप प्रगती केलेली आहे. या महोत्सवात ‘मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा’ पाहून मी आश्चर्यचकित झालो. अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या पाहायला या भागामध्ये मी दहा वर्षापूर्वी आलो होतो. त्यानंतर पानिपतच्या निर्मितीच्यावेळी देवगिरी किल्ला पाहण्यासाठी आलो होतो आणि आता आपल्या या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी आलो आहे. याचा अर्थ माझी दिवसेंदिवस प्रगती होत आलेली असल्याचे गोवारीकर म्हणाले. 
 
मला चित्रपट महोत्सव आवडतात आणि माझी जडणघडण अशाच महोत्सवातून झालेली आहे. चित्रपट महोत्सव हा माझ्यासाठी मास्टर क्लास असतो. ही  एक अशी जागा आहे, जिथे तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत केवळ चित्रपट पाहत असतात. मोठ्या प्रमाणात रसिकांनी अशा महोत्सवात सहभागी व्हायला पाहिजे. महोत्सवात असलेले सिनेमे ओटीटीवरती पाहायला मिळत नाहीत. विशेषत: ओटीटी या माध्यमांवर एकट्याने चित्रपट आपण पाहत असतो. मात्र, महोत्सवात चित्रपट आपण सर्वांसोबत पाहू शकतो. या माध्यमातून अनेक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, असेही गोवारीकर म्हणाले. 
 
कोणतीही कला ही जीवनाचा भाग असून चित्रपट हा समाजाचा आरसा असतात. चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोचविण्याचे एक मोठे माध्यम म्हणून आपण चित्रपटांकडे पाहतो, असे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यावेळी म्हणाले. 
 
मनपा आयुक्त जी. श्रीकांत यावेळी बोलताना म्हणाले की, चित्रपटातून आपल्याला प्रेरणा मिळते. विशेषतः मी जिल्हाधिकारी झालो यामध्ये सिनेमाचे योगदान आहे. स्वदेश चित्रपट पाहून सरकारी योजना आम्ही लातूरमध्ये बनवली ज्याचा फायदा अनेक नागरिकांना झालेला आहे. येत्या चित्रपट महोत्सवात महानगरपालिकेचा सहभाग असेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
 
जेंव्हा हा महोत्सव सुरू झाला तेंव्हा कोणाला वाटले नसेल की हा महोत्सव इतका यशस्वी होईल. मात्र, आज या महोत्सवाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव केलेले आहे. पुढच्या वर्षी महोत्सवाचे १० वे वर्ष असणार असून अतिशय चांगल्याप्रकारे आणि आणखी मोठ्या स्वरूपात हा चित्रपट महोत्सव आपण साजरा करूया, असे संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल यावेळी बोलताना म्हणाले. 
 
महोत्सव संचालक अशोक राणे यावेळी बोलताना म्हणाले की, हा चित्रपट महोत्सव आज खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी होताना दिसतो आहे, याचे श्रेय आमच्या संपूर्ण आयोजन समितीला जाते. मराठवाड्यातील चित्रपटांना जागतिक सिनेमाशी स्पर्धा करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. जे विद्यार्थी चित्रपट समीक्षक बनू पाहत आहेत, त्यांच्यासाठी 'यंग क्रिटिक लॅब' या वर्षीपासून सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 
 
अत्यंत कमी कालावधीत महोत्सवाने एक वेगळी उंची प्राप्त केलेली आहे. नवीन चित्रपट बनविणाऱ्या मंडळीसाठी आदर्श असणाऱ्या पद्मभूषण जावेद अख्तर, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, दिग्दर्शक आर. बाल्की, दिग्दर्शक अनुभव सिन्हा ही मंडळी या शहरात येऊन त्यांनी मार्गदर्शक केले. दरवर्षी महोत्सवाचा दर्जा वाढत आहे. पुढच्या वर्षीच्या महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी माहे फेब्रुवारी २०२४ पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा महोत्सवाचे कलात्मक संचालक चंद्रकांत कुलकर्णी यांनी यावेळी केली.
 
९ व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पारितोषिक विजेते चित्रपट/कलाकार :
 
१. सुवर्ण कैलास पारितोषिक (सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट) : स्थळ 
दिग्दर्शक – श्री.जयंत दिगंबर सोमलकर 
२. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्कृष्ट अभिनेता - भारतीय चित्रपट ) : श्री. देवा गाडेकर (वल्ली)
दिग्दर्शक – मनोज शिंदे
३. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - भारतीय चित्रपट ) विभागून 
अ) वर्षा. एस. अजित (वल्ली)  दिग्दर्शक – मनोज शिंदे 
ब) नंदिनी चिकटे (स्थळ) दिग्दर्शक – श्री.जयंत दिगंबर सोमलकर 
 
४. रौप्य कैलास पारितोषिक (सर्वोत्कृष्ट संहिता - भारतीय चित्रपट ) : नेलीयर कोथा ( दि नेलीए स्टोरी )
दिग्दर्शक – पार्थजित बरूह 
५. स्पेशल ज्यूरी मेन्शन ( भारतीय चित्रपट ) : कायो कायो कलर? ( व्हीच कलर?)
दिग्दर्शक - शारूखखान चावडा  
६. बेस्ट शॉर्ट फिल्म (मराठवाडा स्पर्धा) : दोन ध्रुव 
दिग्दर्शक - हृषीकेश टी.दौड
७. मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा स्पेशल मेन्शन : नायिका 
दिग्दर्शिक – श्रीया दीक्षित आणि रोहित निकम  
८. मराठवाडा शॉर्ट फिल्म स्पर्धा स्पेशल मेन्शन : इनफानाईट नाईटमेयर 
दिग्दर्शक – दीपेश बीटके  
९. एमजीएम शॉर्ट फिल्म स्पर्धा (बेस्ट शॉर्ट फिल्म ) : तलवार 
दिग्दर्शक - सिद्धांत राजपूत 
१०. फ्रिप्रेसी इंडिया अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट चित्रपट ) : स्वीट ड्रिम्स
 दिग्दर्शक – ईना सेंडीजरेव्हीक 
११. फ्रिप्रेसी इंडिया स्पेशल मेन्शन : व्हेअर दि रोड लिड
दिग्दर्शक – निना ऑंजानोविक  
१२. फ्रिप्रेसी स्पेशल मेन्शन अवॉर्ड : वल्ली दिग्दर्शक – मनोज शिंदे 
१३. ऑडियन्स चॉईस अवॉर्ड (सर्वोत्कृष्ट चित्रपट ) : फालेन लीव्हस्  
दिग्दर्शक – अकी कौरीसमकी