शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (00:10 IST)

बाबांचं स्टारडम हवं!

बॉलिवूडमधल्या स्टार्सच्या मुलांना भरपूर ग्लॅमर मिळतं. ही मुलं सतत प्रकाशझोतात असतात. त्यांची छोट्यातली छोटी गोष्टही उघड होते. वडिलांचं स्टारडम अनुभवतच ती मोठी होतात. 
 
बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असलेल्या शाहरूख खानच्या मुलांच्या बाबतीतही असंच म्हणता येईल. आर्यन आणि सुहाना यांनी शाहरूखचं स्टारडम अनुभवलं. शाहरूखचा प्रवास त्यांनी पाहिला. सुपरस्टारची मुलं असल्याचा अनुभव काय असतो हे त्यांनी जाणलं. पण अबराम अजून लहान आहे. त्याला हे सगळं अनुभवायचं आहे. म्हणूनच आपल्या वडिलांनी वलयात राहावं, आपलंस्टारडम हरवू देऊ नये असं आर्यनला वाटतं. शाहरूखने भरपूर काम करावं अशी त्याची इच्छा आहे. हे सगळं अबरामसाठी व्हावं, असं त्याला वाटतं. त्यालाही वडिलांचं महत्त्व कळायला हवं. त्यांच्या वलयाचा लाभ त्यालाही व्हायला हवा असं आर्यन म्हणतो. 
 
शाहरूखनेच एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. तो म्हणतो, कुटुंबाला माझ्या भविष्याची काळजी वाटते. कुटुंबातलं कोणीच काही म्हणत नाही. पण त्यांच्या काळजीची मला जाणीव आहे. अबरामही आमच्याप्रमाणेच मोठा व्हायला हवा. आमच्या लहानपणी आम्हाला जे मिळालं तेच त्यालाही मिळायला हवं आणि त्यासाठी तुम्ही भरपूर काम केलं पाहिजे, असं माझ्या मुलांचं म्हणणं आहे. 
 
दरम्यान, सुहानाने ग्लॅमरच्या विश्वात प्रवेश केला आहे. एका मासिकाच्या मुखपृष्ठावर तिची छबी उमटली आहे. आर्यनही लवकरच ग्लॅमरच्या विश्वात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पण शाहरूखच्या ग्लॅमरची तुलना त्यांच्याशी होऊ शकत नाही हेच खरं!
 
चिन्मय प्रभू