गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जानेवारी 2024 (17:41 IST)

राशिद खान आणि त्यांच्या सुप्रसिद्ध 'आओगे जब तुम सजना' गाण्याची गोष्ट

Ustad Rashid khan
- इक़बाल परवेज
चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटासाठी 'आओगे जब तुम ओ सजना...' हे गाणं गाणारे प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचं मंगळवारी वयाच्या 55 व्या वर्षी कोलकाता येथे निधन झालं.
 
उस्ताद राशिद खान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर बॉलिवूड आणि शास्त्रीय संगीत जगतात शोककळा पसरली.
 
राशिद खान यांच्या मैत्रिण आणि शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध नाव असलेल्या डॉ. सोमा घोष म्हणाल्या, "त्यांनी जावं असं त्यांचं वय नव्हतं. खरंतर या वयात संगीत तरुण होतं. राशिद यांचं गाणं आता कुठे बहरू लागलं होतं."
 
तेच दुसरीकडे बॉलीवूड आणि शास्त्रीय गायिका कविता सेठ म्हणाल्या की, "त्यांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यापासून उदास वाटू लागलं आहे. अचानक आलेल्या या बातमीने आम्हा सर्वांनाच हादरवून सोडलंय."
 
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर कोलकाता येथील पियरलेस रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या महिन्यातच त्यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या, त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलं होतं.
 
गेल्या काही दिवसांपासून ते आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर होते. यापूर्वी त्यांच्यावर मुंबईतील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण नंतर ते कोलकात्याला परतले. तिथेच त्यांचं निधन झालं.
 
बॉलीवूडचे प्रसिद्ध गीतकार फैज अन्वर यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले की, "ते इतक्या लवकर निघून गेले ही शास्त्रीय संगीतासाठी अत्यंत दुःखद बातमी आहे."
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "उस्ताद राशिद खान यांना बंदुकीची सलामी देऊन निरोप देण्यात येईल. त्यांचे पार्थिव रवींद्र सदन मध्ये ठेवलं जाईल, जेणेकरून त्यांच्या चाहत्यांना त्यांना अखेरचा निरोप देता येईल."
 
उस्ताद राशिद खान यांची जगभरात असलेली प्रसिद्धी
उस्ताद राशिद खान यांना शास्त्रीय संगीत जगतातील बादशाह म्हटलं जातं. आपल्या भारदस्त आवाजाने त्यांनी देशातच नव्हे तर जगभरात प्रसिध्दी मिळवली.
 
त्यांनी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या 'जब वी मेट' चित्रपटासाठी 'आओगे जब तुम' हे गाणं गायलं होतं, जे आजही लोकांचं तितकंच आवडतं आहे.
 
यासोबतच त्यांनी शाहरुख खानच्या 'माय नेम इज खान', 'राज 3', 'मंटो' आणि 'शादी में जरूर आना' सारख्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत.
 
डॉ. सोमा घोष म्हणाल्या, "राशिद यांनी चित्रपटांमध्ये फारच कमी गाणी गायली, पण त्यांनी गायलेली गाणी लोकांच्या मनाला भिडली. 'आओगे जब तुम सजना' हे गाणं विसरण्यासारखं नाही. ते स्वतः मध्येच एक अप्रतिम गीत आहे."
 
गीताचे बोल फैज अन्वर यांनी लिहिले होते. आणि हे गीत त्यांनी उस्ताद राशिद खान यांच्यापर्यंत पोहोचवलं. तो प्रसंग त्यांनी बीबीसीला सांगितला.
 
फैज अन्वर सांगतात, "आओगे जब तुम सजना हे गाणं आज इतक्या वर्षांनंतरही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असतं. जोपर्यंत संगीत आहे तोपर्यंत हे गाणं अस्तित्वात राहील."
 
चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या 'जब वी मेट' चित्रपटाला संगीत दिलं होतं प्रीतम यांनी. पण 'आओगे जब तुम' या गाण्याचे संगीतकार होते संदेश शांडिल्य.
 
या गाण्याची आठवण करून देताना फैज अन्वर म्हणाले, "चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी हे गाणं गाण्यासाठी उस्ताद राशिद यांची निवड केली. हे गाणं तयार होत असतानाच त्यांना असं वाटलं की, हे गाणं लोकांना आवडेल. पण हे गाणं इतकं प्रसिद्ध होईल याची कल्पना ना मला होती ना राशिद खान यांना होती."
 
फैज अन्वर म्हणतात, "आओगे जब तुम सजना हे गाणं येण्याआधी 15 वर्ष, चित्रपटांमधून शास्त्रीय संगीत जवळपास हद्दपार झालं होतं. पण हे गाणं आल्यावर लोकांच्या मनात घर करून गेलं."
 
या गाण्याच्या आठवणीत कविता सेठ म्हणतात, "आम्ही अनेक शास्त्रीय गाणी ऐकली आहेत, पण 'आओगे जब तुम सजना' हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर आहे."
 
पार्ट्यांचे शौकीन असलेले राशिद खान
गाण्याव्यतिरिक्त राशिद खान आपल्या वैयक्तिक आयुष्यात अगदी सामान्य माणसांसारखेच होते. त्यांची मित्रमंडळी खूप होती. ते नव्या गायकांना योग्य मार्ग दाखवायचे. त्यांना पार्ट्यांचाही शौक होता.
 
डॉ. सोमा घोष सांगतात, "राशिद यांना पार्ट्यांची खूप आवड होती. मित्रांसोबत मैफिल जमवायला त्यांना आवडायचं. इतकंच नाही तर ते अनेकदा आपल्या हातानं आम्हाला भिंडी मटण खाऊ घालायचे."
 
त्यांची आठवण काढताना कविता सेठ म्हणतात, "मी त्यांना अनेकदा भेटले. त्यांचं लहान मुलांवर खूप प्रेम होतं. संगीताबद्दल भरभरून बोलायचे."
 
फैज अन्वर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "त्यांचं मन अगदी निर्मळ आणि प्रेमळ होतं. खूपच दयाळू व्यक्तीमत्व होतं."
 
गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून घेतलं प्रशिक्षण
उस्ताद राशिद खान यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तरप्रदेशच्या बदायूं येथील सहसवान येथे झाला. त्यांनी आपले आजोबा उस्ताद निसार हुसेन खान यांच्याकडून सुरुवातीचं प्रशिक्षण घेतलं.
 
लहानपणी त्यांना गायनाची फारशी आवड नव्हती, पण त्यांचे मामा गुलाम मुस्तफा खान यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि नंतर त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यात सुधारणा केली.
 
राशिद खान यांनी पहिला स्टेज परफॉर्मन्स वयाच्या 11 व्या वर्षी दिला. ते रामपूर-सहसवान घराण्याचे गायक होते.
 
डॉ. सोमा घोष यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "राशिद यांनी त्यांच्या या प्रवासात खूप मेहनत घेतली. मुस्तफा खान यांच्याकडून ते खूप काही शिकले, खूप सराव केला. खूप मेहनत केल्यानंतरच ते इतरांपेक्षा वेगळे आणि उठून दिसले. जगभरात त्यांना खूप सन्मान मिळाला."
 
राशिद खान स्वतः आपल्या मामा-आजोबांप्रमाणे विलंबित खयालमध्ये गायचे. उस्ताद अमीर खान आणि पंडित भीमसेन जोशी यांच्या गायनाचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. राशिद खान यांनी स्वरसाधना केली. प्रत्येक नोटसाठी तासनतास किंवा पूर्ण दिवस सराव केला.
 
फैज अन्वर यांच्या म्हणण्यानुसार, "या देशात हजारो शास्त्रीय गायक होऊन गेले, आजही हजारो गायक आहेत, पण राशिद खान सगळ्यांपेक्षा वेगळे होते. शास्त्रीय गायनात त्यांची वेगळी ओळख होती.
 
त्यांचा एक वेगळा दर्जा होता. त्यांचा आवाज आणि त्यांची शैली यामुळे ते सगळ्यांपेक्षा उजवे ठरले. त्यांची तयारी इतकी जोरदार असायची की ते कोणतंही गाणं अतिशय उत्तम पद्धतीने सादर करायचे."
 
कविता सेठ सांगतात, "जिथे त्यांचा कार्यक्रम असायचा तिथे मी आवर्जून जायचे. त्यांच्या गायकीतून मला धडे मिळायचे. त्यांची गाण्याची वेगळी शैली होती जी फार कमी लोकांकडे आहे."
 
उस्ताद राशिद खान यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
2012 मध्ये त्यांना बंगभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि 2010 मध्ये त्यांना ग्लोबल इंडियन म्युझिकल अकादमी पुरस्कार (GIMA) देखील मिळाला.