शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 21 मार्च 2024 (15:40 IST)

सिद्धू मुसेवालाच्या आईच्या आयव्हीएफ उपचारांनंतर पंजाब सरकारने आरोग्य सचिवांना नोटीस का पाठवली? वाचा

पंजाबी पॉप गायक शुभदीप सिंग उर्फ सिद्धू मुसेवालाची 2022 मध्ये हत्या झाली. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या आई-वडिलांनी पुन्हा पालक होण्याचा निर्णय घेतला होता आणि आता मुसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाल्याची माहिती सोशल मीडियावरून सांगितली आहे. मात्र आता यावरुन नवा वाद निर्माण झाला असून मुसेवाला कुटुंब आणि पंजाब सरकार यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. सिद्धू मुसेवालाचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, "शुभदिपच्या लाखो करोडो चाहत्यांच्या आशीर्वादाने ईश्वराने आम्हाला शुभदिपचा छोटा भाऊ दिला आहे." "मी आमच्या शुभचिंतकांचे आभार मानतो आणि वाहेगुरूने आम्हाला दिलेल्या या आशिर्वादाबाबत ऋण व्यक्त करतो." सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर यांना आयव्हीएफ उपचारांबद्दल केंद्र सरकारने पाठवलेल्या नोटिशीबद्दल आपल्याला का कळवले नाही असा प्रश्न पंजाब सरकारने राज्याच्या आरोग्य सचिव अजय शर्मा यांना विचारला आहे. शर्मा यांना पाठवलेल्या नोटिशीत म्हटलं आहे, "जेव्हा केंद्र सरकारनं या संदर्भात अहवाल मागितला तेव्हा तुम्ही संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री यांना का कळवलं नाहीत? हे सरळसरळ नियमांचं उल्लंघन आहे. तुम्ही याचे दोन आठवड्यांत उत्तर द्यावे अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल"
सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर जवळपास दोन वर्षांनी त्याच्या आई-वडिलांनी एका नव्या बाळाचं घरात स्वागत केलं. मात्र त्यांनी घेतलेल्या आयव्हीएफ उपचारप्रणालीबद्दल केंद्र सरकारने अहवाल मागितल्यावर त्यावर चर्चा वाढली. मुसेवालाचे वडील बालकूर सिंग यांनी एका व्हीडिओ संदेशात आपल्य़ाला या मुलाच्या वैधतेवरुन प्रशासन त्रास देत आहे असं म्हटलं आहे. नियमांनुसार अशा उपचारांसाठी आईचे वय 50 पेक्षा कमी आणि वडिलांचे वय 55 पेक्षा कमी असलं पाहिजे. चरण कौर यांचं वय 60 असताना त्यांनी हे उपचार घेतले आहेत. मुसेवालाचे वडील बालकूर यांनी हे उपचार पूर्ण होण्याची तरी दया दाखवावी, असं आवाहन व्हीडिओत केलं असून नंतर आपण सर्व कागदपत्रं जमा करू, आपण कोणताही कायदा मोडलेला नाही असं सांगितलं. तसेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सिंह यांचं नाव घेत तुमचं आजवरचं रेकॉर्ड फक्त यू टर्न घेण्याचंच आहे, तुमचे सल्लागार तुम्हाला जे सल्ला देतात त्यावर विसंबून तुम्ही फार काळ टिकून राहू शकणार नाही. असा वाद निर्माण झाल्यावर मात्र पंजाब सरकारने आपल्या भूमिकेत बदल केल्याचं दिसतं. केंद्रातल्या भाजप सरकारने अहवाल पंजाब सरकारकडून मागितला आहे, "मुख्यमंत्री भगवंत मान हे पंजाबी लोकांच्या भावना आणि भावनांचा मनापासून आदर करतात, परंतु या कागदपत्रांची केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. सर्व पंजाबी आणि सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांनी अफवांपासून सावध राहण्याची विनंती करत आहोत." असं ट्वीट पंजाब सरकारने केलं आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाच्या मदतीने या बाळाचा जन्म झाला असून, सिद्धू मुसेवालाच्या आईने 58 व्या वर्षी हे बाळ जन्माला घातले आहे. मुसेवाला दाम्पत्य हे उतारवयात आई-बाबा होणार असल्यामुळे काही माध्यमांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. त्याबाबत बीबीसी प्रतिनिधीने त्यांना प्रतिक्रिया विचारली असता मुसेवाला कुटुंबाने सांगितलं की ही त्यांची वैयक्तिक आणि कौटुंबिक बाब आहे. त्यांना याबद्दल अधिक माहिती द्यायची नाहीये असं सांगितलं होतं. 28 वर्षीय सिद्धू मुसेवालाला गायक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळाली होती. 29 मे 2022 रोजी भरदिवसा त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं. ही घटना मनसा जिल्ह्यातील जवाहरके गावात घडली. 15 मे 2020 रोजी सिद्धू मुसेवालाने त्याच्या आईसाठी समर्पित असं 'डिअर ममा' गाणं रिलीज केलं होतं. आईच्या वाढदिवसानिमित्त त्याने हे गाणं रिलीज केलं होतं. या व्हिडिओमध्ये सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर आणि वडीलही दिसत होते. या गाण्याचे बोल होते, 'माँ माँ लाला रहे में जमा तेरे वरगा आं'. यूट्यूबवर रिलीज झालेलं हे गाणं आतापर्यंत 143 मिलियन पेक्षा जास्त वेळा पाहिलं गेलंय.
 
आईने लढवली होती सरपंच पदाची निवडणूक
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिद्धू मुसेवालाची आई 58 वर्षांची असल्याचं सांगितलं जातंय. 2018 मध्ये त्यांनी मनसा जिल्ह्यातील मुसा गावातून सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती आणि त्यात त्या विजयी झाल्या होत्या. सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याचे वडील बलकौर सिंह आणि आई चरण कौर यांनी मुलाच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गोष्टींसंबंधी जाहीर वक्तव्यं केली होती. 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सिद्धू मुसेवालाने काँग्रेस पक्षाकडून मनसा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाच्या उमेदवाराकडून त्याचा पराभव झाला.
 
आयव्हीएफ तंत्रज्ञान काय आहे?
जेव्हा नैसर्गिक गर्भधारणा होत नाही किंवा गर्भधारणेच्या इतर सर्व पद्धती अयशस्वी होतात तेव्हा आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आयव्हीएफ तंत्राची सुरुवात 1978 मध्ये झाल्याची माहिती डॉ. नयना पटेल यांनी बीबीसीशी बोलताना दिली. गुजरातमधील आकांक्षा हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैद्यकीय संचालक डॉ. पटेल म्हणाल्या, "आयव्हीएफचा वापर अशा महिलांसाठी केला जातो ज्यांच्या गर्भनलिका (फॅलोपिअन ट्युब) संसर्गामुळे किंवा इतर कारणांमुळे खराब झाल्या आहेत." त्यांनी सांगितलं की, अशावेळी भ्रूण तयार करण्यासाठी अंडी आणि शुक्राणू यांचं मिलन केलं जातं. ही प्रक्रिया प्रयोगशाळेत केली जाते. जेव्हा हे भ्रूण तयार होतं तेव्हा ते संबंधित महिलेच्या गर्भाशयात सोडलं जातं. पटेल सांगतात की, या तंत्रज्ञानामुळे अनेक जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळाला असून अनेक महिलांवरील वंध्यत्वाच्या अडचणीवर मात झाली आहे.
 
कायद्याने निश्चित केलेली वयोमर्यादा
भारतामध्ये 2021 साली सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (एआरटी) कायदा लागू झाला. डॉ. सुनिता अरोरा या दिल्लीतील ब्लूम आयव्हीएफ केंद्रातील आयव्हीएफ तज्ज्ञ आहेत. या विषयावर त्यांनी बीबीसीशी संवाद साधला. डॉ. सुनीता अरोरा सांगतात, या कायद्यानुसार आईचं कमाल वय 50 आणि वडिलांचं वय 55 वर्षं असावं. डॉ. अरोरा म्हणतात, "हे वय निश्चित करण्याचं एक कारण म्हणजे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न. समजा मूल 15 -20 वर्षांचे झाले आणि आई-वडील 70 वर्षांचे झाले तर ते त्याची काळजी कशी घेतील? पण सर्वांत मोठं कारण म्हणजे पन्नाशीनंतर आई होणं हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही." त्या सांगतात की, "आम्ही 45 वर्षांवरील आयव्हीएफ प्रकरणांमध्ये महिलांच्या आरोग्याकडे खूप लक्ष देतो. कारण गरोदरपणात हृदयावरील दाब वाढतो आणि रक्तदाबही सातत्याने वर-खाली होत असतो. काही वेळा स्त्रिया असे बदल सहन करण्याच्या स्थितीत नसतात." डॉ. पटेल ही सांगतात की, उतारवयात आयव्हीएफचा अवलंब करू नये. परंतु काही प्रकरणांमध्ये एक-दोन वर्षांची सूट मिळावी असं त्यांचं म्हणणं आहे. उदाहरण देताना त्या म्हणतात, "जर पत्नीचं वय 40-45 वर्ष आणि पतीचं वय 56 वर्षं असेल किंवा पत्नीचं वय 51 वर्ष आणि पतीचं वय 53 वर्ष असेल, तर फिटनेसच्या आधारावर आयव्हीएफची शिफारस करता येऊ शकते.
 
यात बाळ होण्याची हमी आहे का?
यावर डॉ. नयना पटेल सांगतात की, 35 वर्षांखालील महिलांच्या बाबतीत 80 टक्के हमी असते. जर महिलेचं वय 35 ते 40 दरम्यान असेल तर मूल होण्याची शक्यता 60 टक्क्यांपर्यंत असते. आणि जर वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर केवळ 18 ते 20 टक्के प्रकरणं यशस्वी होताना दिसतात.
 
Published By- Dhanashri Naik