आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्षाला प्रवेश
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत ०३ मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेवून आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेड मधून १० वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणत: १० हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईतील विद्यालंकार तंत्रनिकेतन विद्यालयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्यावत संकेतस्थळाचे पुन:लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर श्री. सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.