मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: शनिवार, 22 फेब्रुवारी 2020 (13:36 IST)

वाईल्डलाईफ बायोलॉजीविषयी..

wildlife biology
तुम्हाला प्राणी आवडतात का? ऑस्ट्रेलियातल्या जंगलांना अलीकडेच लागलेल्या आगीत काही लाख प्राण्यांचा मृत्यू झाला. बर्‍याच प्राण्यांची, पक्ष्यांची संख्या खूप कमी झाली आहे. अशा प्राण्यांची, पक्ष्यांची गणना दुर्मीळ प्रजातींमध्ये केली जाते. अशा सजीवांना वाचवण्याबरोबरच संख्या वाढवण्यासाठीही देश-विदेशात बरेच प्रयत्न होतात, संशोधन केलं जातं. तुम्हालाही या क्षेत्रात रस असेल तर वाईल्डलाईफ बायोलॉजी म्हणजे वन्यप्राणी जीवशास्त्र या विषयाचा अभ्यास करता येईल.
 
वाईल्डलाईफ बायोलॉजी ही बायोलॉजी अर्थात जीवशास्त्राचीच एक शाखा आहे. यात वन्य प्राण्यांचा अभ्यास केला जातो. वन्य प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या वागणुकीची माहिती घेणं गरजेचं आहे. प्राणी, पक्षी काय खातात, कुठे राहतात, त्यांना कशाचा त्रास होतो ही सगळी माहिती जाणून घेतल्यानंतर संशोधन करणं सोपं जातं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वाईल्डलाईफ बायोलॉजी या अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.
 
वाईल्डलाईफ बायोलॉजिस्ट झाल्यानंतर तुम्ही प्राण्यांचा अभ्यास करू शकता. यासाठी तुम्हाला जंगलात राहावं लागतं. विशिष्ट प्रजातीचा अभ्यास करणारे बरेच प्रयोग करतात. त्यामुळे हे धाडसी करिअर आहे. यात तुम्ही काही तरी वेगळं करू शकता. बीएससी केल्यानंतर वाईल्डलाईफ बायोलॉजीमध्ये एएससी करता येईल. वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स, सेंटर फॉर वाईल्डलाईफ स्टडीज अशा संस्थांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता.