सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. संवाद
  4. »
  5. मुलाखत
Written By भीका शर्मा|

पा पाकच्या जमिनीवर हिंदूस्तानी शायरीचे बीज: राहत इंदोरी

उर्दू शायरीच्या माध्यमातून भारताततच नव्हे तर जगभरात ज्यांचे नाव पोहोचले अशा शायरांमध्ये राहत इंदोरी यांचे नाव घ्यावे लागेल. बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांतील गाण्यांना इंदोरी साहेबांनी शब्द दिले. शब्दांशी खेळणारा हा कवी मनस्वी आहे. त्यांच्याशी भीका शर्मा यांनी साधलेला हा संवाद....

राहत साहेब, आपण कवी आहात, पण त्याचवेळी चित्रकारही कसे?
चित्रकार हा माझा छंद नाही, तो माझा मूळ व्यवसाय आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर ती माझी व्यावसायिक गरजही आहे. प्रोफेशनल आर्टिस्ट होण्यासाठीच मी वयाच्या नवव्या वर्षीच हातात ब्रश घेतला होता. अनेक वर्षांपासून मी हेच काम करत होतो. या दरम्यान मी चित्रपटांचे बॅनर्स रंगवण्याचेही काम केले.

आपल्याला पहिली शायरी कधी सुचली?
माझे शिक्षण उर्दूत झाले. माझी स्मरणशक्ती खूप चांगली होती. त्यावेळी उर्दू शायरीचे कुठलेही पुस्तक एकदा वाचले तरी त्यातील सर्व शायरी माझ्या लक्षात राहायच्या. दुसर्‍यांचे शेर वाचता वाचता मी स्वत: शायरी लिहायला लागलो आणि काळाच्या ओघात मी शायर कसा झालो, हे कळलेच नाही. मी असेच जे मनात येईल उलट- सुलट लिहित गेलो. परंतु, ते लोकांना आवडले. हळूहळू माझ्यावर शायर म्हणून शिक्का बसला आणि मी पेंटरचा शायर झालो.

महाविद्यालयीन जीवनात आपल्या शायरीला कसे प्रोत्साहन मिळाले?
1972-73 दरम्यान महाविद्यालयीन कार्यक्रमांमध्ये मी माझी पहिली शायरी सादर केली. मध्य प्रदेशातील देवास येथे आयोजित कवी संमेलनातही मला आमंत्रित करण्यात आले होते. तोच माझ्या आयुष्यातील 'टर्निंग पॉंईंट' ठरला. श्रोत्यांनी चांगली दाद देऊन मला प्रोत्साहित केले. माझा कधीच कुणी 'गॉड फादर' राहीला नाही. दोन वर्षाच्या काळातच मी सार्‍या परिसरात माझ्या शायरीने माझी ओळख जनमानसात करून दिली.

आपल्या पहिल्या पाकिस्तान दौर्‍याचे काही किस्से सांगू शकाल?
युध्दामुळे त्या काळात भारत-पाक यांच्यात दरी निर्माण झाली होती. बरीच वर्षे उलटल्यानंतर 1986 या वर्षी शायरांचा एक चमू पाकिस्तानात गेला होता. त्यात महान शायर सरदार कौर, महेंद्रसिंह बेदी, फजा निजामी, प्रोफसर जगन्नाथ आजाद आदी होते. या सगळ्यांत मी एक नवोदीत शायर होतो. आम्ही पहिल्यांदा गेलो तेव्हा कराचीमधील एका क्लबमध्ये वीस हजार श्रोते उपस्थित होते. त्यावेळी एवढा मोठा जनसागर गोळा होणे हा भारतीय शायरांचा प्रभाव दर्शविणारा क्षण होता. पाकिस्तानातील जमिनीवर शायरीचे बीज हिंदुस्तानने रोवले आहे, हे मी अभिमानाने सांगू शकेल.

जगात इतरत्र कुठे कुठे कार्यक्रम केले? श्रोत्यांकडून कसा प्रतिसाद मिळाला?
जगातल्या कुठल्याही देशात मुशायरा केला तरी इथून तिथून श्रोतावर्ग समान आढळला. आजमगढ, लखनौ, हैदराबाद, न्यूयार्क, न्यू जर्सी किंवा नार्वे कुठेही कार्यक्रम असो. रसिक सारखेच होते. कलाकार हा कुठल्याही प्रांतातला असो त्याच्यातली कला ही ग्लोबल असते. तेव्हा त्याच्याकडे हिंदुस्तानी किंवा पाकिस्तानी म्हणून पाहिले जात नाही. श्रोत्यांमध्ये विचार करण्याची, समजण्याची पध्दत निराळी असते. परदेशात श्रोत्यांची संख्या कमी असते. पण येणारे श्रोते दर्दी असतात. त्यात भारत व पाक या दोन्ही देशातील लोकांची संख्या मोठी असते. एक लाख श्रोते तासनतास शायरी ऐकण्यात तल्लीन झालेले आम्ही पाहिले आहेत. मी आतापर्यंत 40-45 देशात मुशायरा केला आहे.

आपण चित्रपटांकडे कसे वळाला?
मला चित्रपटाची विशेष आवड नाही. एकदा गुलशन कुमार 'शबनम' हा चित्रपट करत होते. माझ्या शायरीतील दोन ओळी त्याच्या चित्रपटाच्या थीममध्ये एकदम फिट बसल्या. त्यांच्याकडून आलेल्या बर्‍याच आंमत्रणानंतर मी मुंबईला गेलो. त्यांनी एका आठवड्यात माझी 14 गाणी अनुराधा पौडवाल यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करून 'आशियाना' नामक एल्बम तयार केला. खरं सांगायचे झाले तर चित्रपटात काम करण्यासाठी मला कधीच स्ट्रगल करावा लागला नाही. चित्रपट निर्माता महेश भट्ट यांच्यासोबत खूप चित्रपट केले. 'सर' हा पहिला चित्रपट मी त्यांच्यासोबतच केला.

आपण कोणकोणत्या चित्रपटांसाठी आतापर्यंत गीते लिहिली ?
माझे आतापर्यत 33 चित्रपट रिलीज झाले आहेत. त्यातील दहा गोल्डन जुबली ठरले आहेत. 'इश्क', 'मुन्नाभाई-एमबीबीएस', 'खुद्दार', 'मैं ‍खिलाडी तू अनाड़ी', 'मिशन कश्मीर' व 'मर्डर' हे सर्व चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले आहेत. मुन्नाभाई-एमबीबीएस'ची सर्व गाणी हिट झाली आहेत.

नवोदित शायरांना आपण काय संदेश देऊ इच्छिता?
नवोदित शायरी लेखकांनी लेखणीतून शायरीचा झरा वाहता ठेवला पाहिजे. समाजात घडणार्‍या घटनांचा वेध घेतला पाहिजे.

आपला अवडता शायर कोण?
मी बरेच शायर वाचले आहेत. परंतु, प्रवासात जंक्शन स्टेशनवर थोडे थांबावेच लागते. त्यातील पहिले जंक्शन म्हणजे गालिब. ते जरा जास्तच थांबून पुढे निघावे लागते. त्यानंतर फिराक गोरखपुरी यांच्या रूपात दुसरे जंक्शन लागले. त्यानंतर आमचा जमाना आला. त्यात अनेक महान शायर आहेत. कालिदासपासून तर महादेवी वर्मा यांच्यापर्यंत अनेक जंक्शन आहेत चांगले शायर आहेत.