बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: मंगळवार, 7 मे 2019 (00:12 IST)

लहान मुलांंमध्ये समस्या कांजिण्यांची

कांजिण्या हा जीवघेणा आजार नाही, मात्र हा अत्यंत त्रासदायक आजार आहे. एकदा कांजिण्या आल्यानंतर त्या शरीरावर आठवडाभर राहतात. त्याची तीव्रताही अधिक असते. तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलावदेखील होतो आणि अन्य लोकांनादेखील त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवावे लागते. त्याचे लसीकरण लहानपणीच केले जाते, मात्र त्यानंतरही हा आजार होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. स्वच्छतेच्या अभावामुळे हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. आपण काही प्रमाणात खबरदारी घेतल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो. 
 
कांजिण्यांचा फैलाव कसा होतो?
 
कांजिण्या हा व्हेरिसला जोस्टर नावाच्या व्हायरसने पसरतो. त्याचे विषाणू पीडित नागरिकांच्या शरिरातील फुफ्फुसापर्यंत पोचतात. लक्षात ठेवा, हवा आणि खोकल्याच्या माध्यमातून हा आजार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे जातो. विशेषतः लहान मुलांना अशा प्रकारचा आजाराची लागण चटकन होते. कारण त्याची प्रतिकार क्षमता तुलनेने कमी असते. म्हणून मुलांना आजार होऊ नये, यासाठी पालकांनी खबरदारी घ्यायला हवी. कांजिण्या पीडित मुलांना घराबाहेर नेण्याचे टाळावे. या खबरदारीमुळे कांजिण्यांचा फैलाव होणार नाही. रुग्णाजवळचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आग्रही असावे. त्याचे कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. दररोज कपडे बदलावेत जेणेकरून आजाराची तीव्रता लवकरात लवकर कमी होईल.
 
कांजिण्यांचे लक्षणः कांजिण्या हा एक व्हायरल इन्फेक्शनने होणारा आजार आहे. हा पाण्याच्या माध्यमातून पसरतो. पीडित व्यक्तीने तंदुरुस्त व्यक्तीला  स्पर्श केल्यानंतरही हा आजार पसरतो. अतिउष्ण भागातील रुग्णांच्या शरीरावर लहान पुरळ येतात आणि त्यानंतर संपूर्ण भागात ते पुरळ दिसू लागतात. कालांतराने त्याचे रुपांतर काळ्या डागात होते. त्यातून ताप, डोकेदुखी, कोरडा खोकला येतो. अशा प्रकारची लक्षण दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.