बाळाची बेंबी बाहेर आलीय?
अनेक जन्मजात बाळांची बेंबी किंवा नाभी बाहेर आलेली असते. ही एक नैसर्गिक बाब असली तरी काही वेळा ती सामान्य स्थितीपेक्षा अधिक बाहेर आलेली असते आणि मोठी असते. त्याचे कारण अॅम्बिकल हार्निया असू शकते. वस्तुतः बाळांमध्ये ही समस्या आपोआप बरी होते. मात्र 3-4 वर्षांपर्यंत बाळाची बेंबी बाहेर आलेली, मोठी दिसत असेल तर मात्र हे अम्बिकल हार्नियाचे संकेत असू शकतात. काय आहे ही समस्या जाणून घेऊया.
बाळाची बेंबी : बाळाचा जन्मापूर्वी आईच्या पोटात असताना जो विकास होतो त्यासाठी आवश्यक पोषक घटक आईशी जोडलेल्या नाळेतून मिळतात. ही नाळ बाळाच्या बेंबीशी जोडलेली असते. जन्मानंतर बाळासमवेत ही नाळ बाहेर येते. तेव्हा तीबांधली जाते आणि कापून टाकली जाते. नाळेमध्ये कोणतीही नस किंवा रक्तवाहिनी नसते. त्यामुळे बाळाला त्याच्या काही वेदना होत नाहीत. नाळ बांधली नाही तरीही आपोआप बंद होते.
अॅम्बिलिकल हार्निया का होतो? जन्मानंतर 3 वर्षांपर्यंत बाळाच्या अंतर्गत अवयवांचा विकास होत असतो. पोटाच्या कमजोर भागावर एखाद्या अंतर्गत अवयवाने दाब दिला तर तो भाग वर येतो. त्याला अॅम्बिलिकल हार्निया म्हणतात. मुलांमध्ये हार्नियाची ही समस्या सामान्यपणे आढळते. मात्र, मोठ्यांमध्येही ही समस्या आढळून येते. सुरुवातीच्या काळात 10 टक्के मुलांत ही समस्या निर्माण होते. बहुतेक मुलांमध्ये ही समस्या आपोआप बरी होते.
वर आलेल्या बेंबीवर उपचार - बाहेर आलेली बेंबी 3-4 वर्षे वयापर्यंत नीट न झाल्यास शस्त्रक्रियेची गरज भासते. अनेकदा या हार्नियामुळे मुलांना पोटात दुखते. किंवा रक्ताभिसरणाची समस्या निर्माण होते. तेव्हाही शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. आतड्यांना पीळ पडल्यानेही मुलांना पोटात दुखते. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क करणे उत्तम.
अॅम्बिलिकल हार्नियाची तपासणी- सर्वसाधारणपणे बाळाची बेंबी पाहूनच डॉक्टर अॅम्बिलिकल हार्नियाविषयी निदान करतात. अनेक प्रकरणात एक्स रे आणि अल्ट्रासाऊंड तपासणी करुनही अॅम्बिलिकल हार्नियामुळे शरीरात काही त्रास किंवा कोणत्याही अंतर्गत अवयवांवर दबाव तर पडत नाही ना याची तपासणी केली जाते. त्याशिवाय रक्तातील संसर्ग किंवा एस्केमिया असल्याची शंका आल्यास रक्ताची तपासणी केली जाते.
डॉ. प्राजक्ता पाटील