बुधवार, 6 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (10:14 IST)

वर्धात ऑगस्ट अखेरपर्यत २१ हजार व्यक्तींना कोरोना होऊन गेला

वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यत २१ हजार व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊन गेल्याचे स्पष्ट झाले आहे. संसर्गाचे हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच १.५० टक्के असल्याचे यातून आढळून आले आहे.
 
सेवाग्रामच्या महात्मा गांधी आर्युविज्ञान संस्था व जिल्हा आरोग्य विभागातर्फे ऑगस्ट महिन्यात सिरो म्हणजेच प्रतिपिंडे सर्वेक्ष करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चाचण्यांमधून केवळ २०५ कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली होती. मात्र, त्याचवेळी २१ हजार लोकांना संसर्ग झाल्याचे अभ्यासातून पुढे आले आहे. तसेच संसर्गाचे हे प्रमाण अत्यल्प म्हणजे १.५० टक्के असून जिल्ह्यातील लोकसंख्येची रोगप्रतिकारशक्ती तयार होण्यास बराच कालावधी लागणार असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.
 
लोकसंख्येच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा संसर्ग प्रत्यक्षात दिसू शकत नाही. म्हणून खऱ्या संक्रमणापेक्षा रूग्णाची संख्या कमी दिसते. लोकसंख्येच्या प्रमाणात खऱ्या संसर्गाच्या टक्केवारीची माहिती देणारा अभ्यास म्हणजे प्रतिपिंडे सर्वेक्षण होय. वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातल्या सर्वसाधारण लोकांव्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या तसेच संसर्गाची जोखीम असणाऱ्या व्यक्तींचा या अभ्यासात समावेश करण्यात आला होता.
 
या सर्वेक्षण पथकाने तीस गावं, दहा शहरी प्रभाग व वीस निष्क्रिय प्रतिबंधित क्षेत्रांचा अभ्यास केला. प्रामुख्याने आरोग्य सेवा कर्मचारी, पोलीस व सुरक्षा कर्मचारी, भाजीपाला व दुध विक्रेते, औद्यगिक कामगार व प्रसिध्दी माध्यमातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये अभ्यास करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण लोकसंख्येत १.५० टक्के (ग्रामीण १.२० टक्के व शहरी भागात २.३४ टक्के) संसर्गदर दिसून आला. एकूण बाधित असलेल्या प्रत्येक रूग्णामागे शंभर लोकांना संसर्ग होऊन गेल्याचे हा अभ्यास सांगतो.