आणि संपुर्ण देश रात्री 9 वाजता एकत्र आला
कोरोना व्हायरस विरूध्द लढण्यासाठी संपुर्ण देश रविवारी रात्री 9 वाजता एकत्र आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केल्यानंतर महामारीच्या अंधकाराला आव्हान देण्यासाठी भारतीयांनी एकजुट दाखवत दीप प्रज्वलन केले आहे. देशात सर्वच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. पुण्यात देखील नागरिकांनी घरातील लाईटचे दिवे बंद करून मेणबत्ती, दिवे आणि टॉर्च तसेच मोबाईल फ्लॅश लावला होता. एक वेगळेच वातावरण पहावयास मिळाले. नरेंद्र मोदी यांनी स्वत: घरातील लाईट ऑफ करुन दीपक लावले. एवढेच नाही तर त्यांच्या मातोश्री हीराबेन यांनीही दीपक पेटवून कोरोनाशी दोन हात करणाऱ्या देशवासीयांचा आत्मविश्वास वाढवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवे लावण्याच्या केलेल्या आवाहनाला नवी मुंबईत देखील चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. नवी मुंबईत सिडको एक्सिबिशन सेंटर मध्ये उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातील नागरिकांनी देखील मेणबत्ती, फ्लॅश लाईट लावून या आवाहनाला प्रतिसाद दिला. या निवारा केंद्रात 240 नागरिकांना ठेवण्यात आले असून त्यांनी देखील आपण एक असून कोरोनाविरुद्ध सर्व मिळून ताकदीने लढण्याचा संदेश दिला. यावेळी नागरिकांनी टाळ्या देखील वाजवत पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला.