शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मे 2020 (14:46 IST)

कोरोना लॉकडाऊन: मोलकरणी घरकामाला येणार की नाही? त्यांना परवानगी मिळवावी लागेल का?

दिपाली जगताप
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात झोननिहाय निर्बंध लावण्यात आले आहेत, त्यात राज्यभरात काही ठिकाणी काही गोष्टी सुरू झाल्या आहेत.
 
राज्य सरकारने काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत दिलेल्या यादीत मोलकरणीचा समावेश नसल्याने त्या घरकामारसाठी जाऊ शकतात की नाही, याबाबत जरा संभ्रम आहे.
 
पण कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन वगळता इतर ठिकाणी घरकामासाठी जाण्याकरिता मोलकरणींना परवानगीची आवश्यकता नाही, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने बीबीसी मराठीला दिली आहे.
 
कोरोना नियंत्रक कक्षाचे मुख्य समन्वयक आणि IAS अधिकारी भूषण गगराणी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना यासंबंधी नियम स्पष्ट केले. ते म्हणाले, "कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्र वगळता इतर सर्व ठिकाणी मोलकरणीला कामावर जाण्यासाठी परवागनीची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ, मुंबई शहर रेड झोनमध्ये आहे, पण मुंबईतील धारावी, वरळी हे भाग कंटेनमेंट (प्रतिबंधित) क्षेत्रात येतात. अशा ठिकाणी कुणालाही जाण्याची अथवा येण्याची परवानगी नाही. त्यामुळे कंटेनमेंट परिसर वगळून इतर झोन्समध्ये मोलकरीण कामासाठी जाऊ शकते.
 
मोलकरणीला प्रवासासाठी विशेष सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे कामाच्या ठिकाणी पायी जाण्याचा पर्याय आहे. दुचाकी वाहनांवर दोन जणांना परवानगी नाही. त्यामुळे मोलकरीण स्वत: चालक असेल तर दुचाकी वाहनाने प्रवास करू शकते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
आणि जर मोलकरीण घरमालकांच्या घरात राहणारी असेल तर परवानगीची आवश्यकता नाही, असंही त्यांनी सांगितलं.
 
हाऊसिंग सोसायट्यांकडून परवानगी नसेल तर?
सध्या कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हाऊसिंग सोसायट्यांकडून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबई, पुण्यासारख्या शहरांत जिथे मोठ्या कॉम्प्लेक्सची संख्या अधिक आहे, अशा ठिकाणी सोसायट्यांकडून बाहेरून येणाऱ्या व्यक्तींबाबत नियमावली तयार करण्यात येते.
मात्र हाऊसिंग सोसायटीला जर एखाद्याला आतमध्ये येण्याची परवानगी द्यायची नसेल तर त्यासंबंधी ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात, पण परवानगी नाकारताना त्यांच्याकडे ठोस कारण हवं, असंही गगराणी यांनी अधोरेखित केलं.
 
मुंबईतल्या सायन येथील एका सोसायटीचे सचिव विनय धात्रक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "आम्ही सध्याच्या वातावरणात मोलकरणींना सोसायटीच्या आवारात येण्याची परवानगी देऊ शकत नाही. एक मोलकरीण ही एकापेक्षा अधिक घरांमध्ये कामासाठी जात असते. अशा परिस्थितीमध्ये हे त्यांच्या आणि सोसायटीमध्ये राहणाऱ्या अशा दोन्ही कुटुंबासाठी धोक्याचे आहे."
 
ते सांगतात, "स्वच्छता पाळून मोलकरीण काम करू शकते, असा युक्तिवाद काही रहिवासी करत असले तरी प्रत्येक मोलकरीण स्वच्छता पाळेलंच असं नाही. त्यांच्यासाठी प्रत्यक्षात ते कितपत शक्य आहे, याचा अंदाज आपल्याला येत नाही. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका नाकारता येत नाही."
 
"मोलकरीण ही पोटापाण्यासाठी हे काम करते, याची आम्हाला जाणीव आहे. पण सगळ्यांचं आरोग्यही महत्त्वाचं आहे. आम्ही रहिवाशांना त्यांचे पगार पूर्ण देण्याचं आवाहन केलं आहे," असंही धात्रक म्हणाले.
 
'आमच्या पगारावर घर चालतं, आता आम्ही कसं जगायचं?'
लॉकडाऊनची ही वेळ प्रत्येकालाच अडचणीत टाकते आहे. अशात आधीच काटकसरीनं जगणाऱ्या मोलकरणींना आणखी त्रास सहन करावा लागतो आहे.
 
गीता परब या पाच घरांमध्ये मोलकरीण म्हणून कामाला जातात. नवरा आजारी असल्याने त्यांच्या पगारावरच घर आणि मुलांचं शिक्षण सुरू आहे.
 
"नवरा कामावर जात नाही. त्यामुळे मलाच चार घरची धुणी-भांडी, स्वयंपाक करून पैसे कमवावे लागतात. आता महिना उलटून गेला काम बंद आहे. काही घर मालकांनी केलेल्या कामाचेही पैसे दिले नाहीत," ही व्यथा त्यांनी मांडली.
त्या सांगतात, "नवऱ्याच्या डायलेसिसलाही आता पैसे नाहीत. पुन्हा कामावर घेणार की नाही? काम कधी सुरू होणार? आम्हाला काहीच कल्पना नाही. मग आम्ही कसं जगायचं?"
 
हा केवळ एका मोलकरणीचा प्रश्न नाहीय. तर अशा असंख्या मोलकरणी सध्या अशाच तणावपूर्ण वातावरणातून जात आहेत.
 
'मोलकरणींसाठी सरकारने वेगळा विचार करावा'
"मोलकरणींचा खूप मोठा वर्ग सध्या आर्थिकदृष्ट्या हतबल झाला आहे. आम्ही ज्या मोलकरणींशी बोलत आहोत त्या प्रचंड तणावात आहेत. अधिकतर मोलकरणींचे पगार देण्यात आलेले नाहीत. काहींना पगार कापून देण्यात आला आहे," असं कोरो या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक सुप्रिया सोनार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
"बायांना पुन्हा कामावर घेतले जाईल का, याबाबतही संभ्रम आहे. जर सरकार त्यांना कामावर जाण्याची परवानगी देत असेल तर त्यांना सर्व खबरदारी घेऊन घरमालकांनी त्यांना कामावर घ्यायलं हवं ही आमची भूमिका आहे.
 
"पण कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत समाजात खूप गैरसमज आहेत. झोपडपट्टीतून किंवा दाटीवाटीच्या भागातून आलेल्या व्यक्तींकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे," असंही त्या म्हणाल्या.
 
...तर कोरोनाचा धोका वाढेल?
अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडू नये यासाठीच सरकारने काही अंशी लॉकडाऊन शिथील केलं आहे. पण स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही तर संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेल्या राज्याचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "मोलकरीण मुळातच स्वच्छता करण्यासाठी येते. त्यामुळे जर तिने आणि घरातल्या व्यक्तींनी नियम पाळले तर संसर्गाचा धोका उद्भवणार नाही. वारंवार हात धुतले, मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज घालून काम करणं गरजेचे आहे."