मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 10 एप्रिल 2020 (12:22 IST)

दहावीचा भूगोलाचा पेपर न घेता सरासरी गुण द्या

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमुळे इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर न घेता विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्याकडे त्यांनी मागणी केली.

या प्रकरणी येत्या 4 दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासनही गायकवाड यांनी दिले आहे. दहावीचा भूगोलाचा पेपर 23 मार्च रोजी घेण्यात येणार होता. मात्र, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पेपर रद्द करण्यात आला. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे तसेच कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे तो पेपर घेणे शक्य नसल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून हा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्यात यावे, अशी भूमिका मुनगंटीवार यांनी प्रा. गायकवाड यांच्याशी दूरध्वनीद्वारे झालेल्या चर्चेदरम्यान केली. या मागणीच्या अनुषंगाने सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रा. गायकवाड यांनी दिले आहे.