आशियाई विकास बँकेकडून १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर
करोना व्हायरसच्या संकटात आशियाई विकास बँकेनं भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आशियाई विकास बँकेनं करोना व्हायरस विरोधात सुरू असलेल्या लढाईत आर्थिक संसाधनांना मदत करण्यासाठी १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे. “या संकटकाळात संघटना भारत सरकारच्या सर्व कामांना समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे कर्ज या संकटात त्वरित आवश्यक असलेल्या मदतीसाठी आहे,”असं मत आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी व्यक्त केलं.
करोनावर नियंत्रण मिळवणं, त्यापासून बचाव करणं आणि गरीब, तसंच आर्थिकरित्या मागासलेल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. “त्वरित वितरित करण्यात येणारा निघी म्हणजे आशियाई विकास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या पॅकेजचा एक भाग आहे,” असं असाकावा यांनी म्हटलं आहे.