1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (08:50 IST)

औरंगाबादमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनची टंचाई

shortage
औरंगाबाद जिल्ह्यातील रुग्णसंख्या वाढत असतानाच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या पुरवठय़ावर आता परिणाम झाला आहे. दोन दिवसांपासून निर्माण झालेला तुटवडा सोमवारी सुरळीत होऊ शकतो, असे अन्न व औषधी विभागातील अधिकाऱ्यांचे मत आहे. दरम्यान, कृत्रिम प्राणवायूचा पुरवठा अगदी हातघाईवर आला नसला तरी वाहतुकीमध्ये थोडा जरी अडथळा आला तरी त्याचे परिणाम होऊ शकतात. मागणी केलेला कृत्रिम प्राणवायू आणि इंजेक्शन शिल्लक उरत नसल्याने प्रशासनाच्या कसरतीचा काळ सुरू झाला आहे. दरम्यान ‘आयनॉक्स’ या एकमेव ‘ऑक्सिजन’ उत्पादन कंपनीबरोबरच आता ‘लिंडे’ व ‘जेएसडब्ल्यू’ या कंपन्यांकडूनही कृत्रिम प्राणवायू मागविण्यात आला आहे.
 
गेल्या दोन दिवसापासून रेमडेसिवीर या इंजेक्शनच्या केवळ १६० कुप्या आल्या होत्या. तत्पूर्वी हे प्रमाण २४० एवढे होते. त्यामुळे इंजेक्शनची कमतरता भासत असल्याचे विविध रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. 
 
शहरातील विविध रुग्णालयांची कृत्रिम प्राणवायूची गरज सध्या ४७ टन एवढी आहे. त्यातील खासगी रुग्णालयांना होणाऱ्या पुरवठय़ाचे करार असल्याने त्यांना तो सुरळीत आहे. मात्र, काही रुग्णालयांना मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरुन काढताना धावाधाव करावी लागते. नव्याने ‘लिंडे’ कंपनीकडून होणारा ऑक्सिजन पुरवठा जालना, नांदेड आणि औरंगाबाद या शहरांसाठी होणार आहे.