राज्यात कोरोनाबाधितांची संख्या १४ हजाराच्या वर
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १४ हजार ५४१ झाली असून त्यात नव्याने ७७१ रुग्णांचे निदान झाले आहे. आकडेवारीमध्ये मुंबई वगळता इतर जिल्हे तसेच मनपा यांच्याकडील आकडेवारी ही आयसीएमआर वेबपोर्टल यादीनुसार अद्ययावत करण्यात आली आहे यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ५४१ झाली आहे. राज्यात ३५० कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात २४६५ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख ७६ हजार ३२३ नमुन्यांपैकी १ लाख ६२ हजार ३४९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १४ हजार ५४१जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ९८ हजार ४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आज राज्यात ३५ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मधील १८, पुण्यातील ७, अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १आणि नांदेड शहरात १ मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी २२ पुरुष तर १३ महिला आहेत. आज झालेल्या ३५ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील १३ रुग्ण आहेत तर १९ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ३ जण ४० वर्षांखालील आहे. या पैकी दोघांच्या इतर आजारांबद्दलची माहिती अप्राप्त आहे. उर्वरित ३३ रुग्णांपैकी २३ जणांमध्ये (७० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे आजार होते.